
कल्याण: माजी आमदार गणपत गायकवाड यांना एक मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. २०१४ मध्ये कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात राडा केल्याच्या प्रकरणात गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे पदाधिकारी निलेश शिंदे यांच्यासह अन्य पाच जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्यांअभावी कल्याण न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
काय आहे प्रकरण?
२०१४ मध्ये कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोंधळ घातल्याचा आरोप गणपत गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांवर होता. पोलिसांनी स्वतः हा गुन्हा नोंदवून त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र, बचाव पक्षाने न्यायालयात असा युक्तिवाद केला की, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन केल्याच्या रागातून हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कल्याण न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत गणपत गायकवाड आणि इतर चारही आरोपींना निर्दोष मुक्त केले.
उल्हासनगर गोळीबार प्रकरण अजूनही प्रलंबित
या प्रकरणातून मुक्तता मिळाली असली तरी, गणपत गायकवाड आणि कुणाल पाटील हे सध्या एका दुसऱ्या गंभीर प्रकरणात कारागृहात आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये त्यांनी माजी आमदार महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात महेश गायकवाड यांच्या शरीरात सात गोळ्या घुसल्या होत्या. या प्रकरणात गणपत गायकवाड यांच्यावर हत्येचा प्रयत्न आणि इतर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरू आहे.
२०१४ च्या या जुन्या प्रकरणातील निर्दोष मुक्तता हा गणपत गायकवाड यांच्यासाठी मोठा दिलासा असला, तरी उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणाची पुढील सुनावणी आता काय रूप घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.