
मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत. सध्याच्या १२ जलवाहतूक मार्गांचा सुधारणेसह विस्तार केला जाणार असून कोची रेल मेट्रोच्या डीपीआर सादर करणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) अंतर्गत मेरिटाईम बोर्डाने विद्यमान १२ जलवाहतूक मार्गांच्या सुधारणा आणि विस्तारासोबतच १० नवीन मार्गांवर जलमार्ग सेवांचा प्रस्ताव मंजूर केला आहे
जलमार्ग सेवेसाठी सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याच्या निविदा प्रक्रियेत कोची मेट्रो रेल लिमिटेड ही एकमेव संस्था निवडली गेली. त्यांच्या अहवालानुसार, हे नवे मार्ग स्पीडबोट्स, रो-पॅक्स वाहने आणि जलटॅक्सी सेवांद्वारे कार्यान्वित होणार असून, शहरातील वाहतूक गर्दी कमी करण्यास मदत होईल. विशेषतः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला चार स्वतंत्र जलमार्गांनी जोडले जाणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना जलद आणि सोयीस्कर प्रवास उपलब्ध होणार आहे.हे नवे मार्ग मुंबईतील विविध भागांना जोडतील. वसई ते काल्हेर मार्ग वसई-मीरा भाईंदर-फाउंटन जंक्शन-गायमुख-नागला बंदरमार्गे असेल. कल्याण ते कोलशेत मार्गाने कल्याण-मुंब्रा-काल्हेर-कोलशेत जोडले जाईल. काल्हेर ते नवी मुंबई विमानतळ मार्ग काल्हेर-मुलुंड-ऐरोली-वाशीमार्गे असेल, तर वाशी, बेलापूर आणि गेटवे ऑफ इंडियापासून विमानतळापर्यंत स्वतंत्र मार्ग येतील. इतर मार्गांमध्ये गेटवे ऑफ इंडिया ते वाशी, वसई ते मार्वे, बोरीवली ते बांद्रा (बोरीवली-मार्वे-वर्सोवा-बांद्रा) आणि बांद्रा ते नरिमन पॉइंट (बांद्रा-वरळी-नरिमन पॉइंट) समाविष्ट आहेत.