
मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच महामुंबईतील दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास दसऱ्याच्या मुहूर्तावर २ ऑक्टोबरला मेट्रो मार्गिकेचा वरळी ते कफ परेड हा अंतिम टप्पा आणि मंडाळे ते चेंबूर (डायमंड गार्डन) पर्यंतचा मेट्रो २ ब मार्गिकेचा पहिला टप्प्या प्रवाशांसाठी खुला होऊ शकतो.
मेट्रो-३ मार्गिकेचा वरळी ते कफ परेड हा अंतिम टप्पा आणि मेट्रो- २ ब या मार्गिकेचा मंडाळे ते चेंबूर (डायमंड गार्डन) पर्यंतचा पहिला टप्पा हे दोन्ही टप्पे लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. यातील मेट्रो-३ या ३३.५ किमी मार्गिकेचा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा वर्षभरापूर्वी सुरू झाला आहे. त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर यावर्षी मे महिन्यात बीकेसी ते वरळी हा टप्पा सुरू झाला. आता वरळी ते कफ परेड या अंतिम टप्प्याची कामे पूर्ण झाली आहेत व कमिशनर फॉर मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) यांच्याकडून चाचणी करून घेण्यासाठी एमएमआरसीएलने तयारी सुरू केली आहे.
मेट्रो २ ब ही २३.६४ किमीची मार्गिका आहे. यात २० स्थानके आहेत. या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात कुर्ला पूर्व, पूर्व द्रुतगती मार्ग, चेंबूर, डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल, मानखुर्द व मंडाळे डेपो ही स्थानके आहेत. या मार्गिकेवर मेट्रोची पहिली चाचणी १५ एप्रिलला करण्यात आली होती. त्यांनी मेट्रोच्या कामासंदर्भात काही सूचना केल्या होत्या. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर आता सीएमआरएसकडून अंतिम चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही मेट्रो मार्गिका दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होऊ शकतात.