
५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल !
मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत असलेल्या 'दशावतार’ ने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सर्वत्र प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून थिएटरमध्ये ‘दशावतार’ ची जादू अनुभवण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी वाढत आहे. चित्रपट समीक्षक, मराठी सिनेसृष्ट व प्रेक्षकांकडून या चित्रपटावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला जातोय. प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने ५ कोटी २२ लाख रुपयांची कमाई करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रदर्शनापुर्वीच चित्रपटाने सर्वत्र चांगली हवा निर्माण केली होती यामुळेच पोस्टरपासून चित्रपटाबद्दल निर्माण झालेलं कुतुहल पुढे टिझरमधून अधिकच वाढलं गेलं आणि नंतर आलेल्या ट्रेलरमुळे ही उत्सुकता शिगेला पोहोचली. आणि त्याचीच प्रचिती हि चित्रपट प्रदर्शनानंतर मिळणाऱ्या प्रतिसादातून बघायला मिळत आहे. सुरुवातीला एकूण ३२५ स्क्रिन्समधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या दशावतारचे ६०० शोज् होते, शनिवारी हा आकडा ८०० एवढा झाला तर रविवारी यामध्ये वाढ होऊन तो ९७५ असा झाला. सर्वत्र हाऊसफुल्ल बोर्ड झळकत असून प्रेक्षकांकडून 'दशावतार' ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ‘दशावतार’ च्या माध्यमातून प्रेक्षकांना कोकणातील समृद्ध संस्कृती, परंपरा आणि लोककलेचा अप्रतिम संगम पाहायला मिळतोय. चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवत असून, कलाकारांचा दमदार अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा असा आहे. यासोबतच गाणी, देखावे आणि दिग्दर्शनातील भव्यता ही चित्रपटाची खरी ताकद ठरली आहे. निर्माते, दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणतात, '' दशावतार’ ला मिळणारा हा प्रतिसाद म्हणजे आमच्यासाठी स्वप्न साकार झाल्यासारखं आहे. दशावतारमधून कोकणातील कला आणि संस्कृतीसोबतच पर्यावरणाच्या रक्षणाबद्दल केलेल्या भाष्याला प्रेक्षकांनी उचलून धरलं आहे. यामुळे प्रामाणिकपणे सांगितलेल्या गोष्टीला प्रेक्षक खुल्या मनाने स्विकारतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद बघून प्रत्येकाने घेतलेली मेहनत सार्थकी लागल्याचे आम्हाला समाधान आहे.'' झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले, “ मराठी प्रेक्षक हा कायमच चांगल्या कलाकृतीच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. केवळ मुंबई-पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे बेळगाव, बेंगळुरु, इंदौर, हैद्राबाद आणि गोव्यातही हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला आहे. दशावतार मुळे मराठी चित्रपटांचा आणि मराठी सिनेसृष्टीचा दबदबा पुन्हा एकदा निर्माण होईल असा विश्वास आम्हाला आहे. या चित्रपटाला मिळालेला हा प्रतिसाद अभूतपूर्व असून याबद्दल प्रेक्षकांचे झी स्टुडियोजच्यावतीने आभार मानतो.” चित्रपटाची भव्यता, नेत्रदीपक दृश्यं आणि ताकदीचं कथानक यामुळे प्रेक्षक पुन्हा पुन्हा थिएटरकडे वळत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील हा एक मैलाचा दगड ठरत असून 'दशावतार' ने केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही, तर प्रेक्षकांच्या मनातही राज्य करायला सुरुवात केली आहे. प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहून थिएटर मालकही मराठी चित्रपटांना प्राधान्य देत शोज वाढवताना दिसून येत आहेत. झी स्टुडिओजची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले असून त्यांच्यासह सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी चित्रपटाचे निर्माते आहेत. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहेत. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.