महामुंबईमहत्वाची बातमी
सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले
September 15, 2025 08:11 PM
पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते.
डोंबिवली: भारताने आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ७ विकेट्सने शानदार विजय मिळवला. कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी हा विजय पहलगाम हल्ल्यातील बळींना समर्पित केला असला तरी, या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी टीम इंडियाने हा सामना खेळायलाच नको होता अशी ठाम प्रतिक्रिया दिली आहे.
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले डोंबिवलीचे संतोष जगदाळे, यांची पत्नी प्रगती जगदाळे यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये काल खेळल्या गेलेल्या आशिया कप २०२५ सामन्याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हंटले, "भारतीय खेळाडूंनी दबावाखाली पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी माझी इच्छा आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळायला नकोच होते."
काय म्हणाल्या प्रगती जगदाळे?
प्रगती जगदाळे पुढे म्हणाल्या की, मी सूर्यकुमार यादवला सांगू इच्छिते की, पहलगाम हल्ल्यातील बळींना हा विजय समर्पित करण्याऐवजी, टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध खेळायला नको होते. जर भारताने हा सामना खेळला नसता तर आम्हाला अधिक अभिमान वाटला असता, परंतु टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला, ज्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत.
त्या पुढे म्हणाल्या की, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ जणांचा बळी घेतला आहे. याआधी झालेल्या सर्व दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे दहशतवादी होते. आपल्याला
माहिती आहे की पाकिस्तान आपला शत्रू आहे. आपण
त्यांच्यासोबत खेळायला नकोच. टीम इंडियाने विजयासह हा सामना पहलगाम हल्ल्यातील बळींना समर्पित केला आहे, परंतु जर ते जिंकले नसते तर आमच्या खेळाडूंना पश्चात्ताप झाला असता. भारतीय खेळाडूंनी दबावाखाली पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी माझी इच्छा आहे"
रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी संघाला भारताने १२७/९ च्या धावसंख्येवर रोखले. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने सर्वाधिक ४० धावा केल्या, तर शाहीन आफ्रिदीने संघाच्या खात्यात ३३ धावांचे योगदान दिले. भारताकडून कुलदीप यादवने ३ बळी घेतले. त्याच्याशिवाय जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल भारताने केवळ १५.५ षटकांत विजय मिळवला. कर्णधार सूर्यकुमार यादवने ३७ चेंडूत ४७ धावा काढत नाबाद राहिला, तर तिलक वर्माने संघाच्या खात्यात ३१ धावांचे योगदान दिले. या विजयासह 'सुपर फोर'मध्ये भारताचा प्रवेश जवळजवळ निश्चित झाला आहे.