Monday, September 15, 2025

Nasik News: नामांकित शाळेत बॉम्ब असल्याचा धक्कादायक मेल, शाळा प्रशासनात खळबळ!

Nasik News: नामांकित शाळेत बॉम्ब असल्याचा धक्कादायक मेल, शाळा प्रशासनात खळबळ!

नाशिक: नाशिक शहरातील एका नामांकित शाळेला मध्यरात्री पावणे दोन वाजता थरकाप उडवणारा मेल प्राप्त झाला. या मेलमध्ये शाळेच्या शौचालयात तब्बल तीन बॉम्ब ठेवले असल्याची माहिती देण्यात आली होती. सकाळी दहा वाजता शाळा प्रशासनाच्या निदर्शनास हा मेल आल्यानंतर एकच खळबळ उडाली. प्रशासनाने तत्काळ इंदिरानगर पोलिस ठाणे आणि बॉम्ब शोध पथकाला त्याची तात्काळ माहिती देत पालकांना देखील याबद्दल सूचित केले.

त्यानंतर बॉम्ब शोध पथकाने शाळेची पूर्ण तपासणी केली व त्यांना आक्षेपार्ह असे काहीच आढळून आले नाही असे शाळेतर्फे कळविण्यात आले आहे. मात्र, मिळालेल्या मजकूर प्रकरणी इंदिरानगर पोलीस स्टेशनकडून अधिक तपास सुरु आहे. या मेलमुळे मात्र शाळेच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पालकांसोबत आलेल्या विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले, तसेच काही विद्यार्थ्यांना शाळेच्या बसमध्ये बसून दूर अंतरावर नेण्यात आले.

या घटनेनंतर शाळेच्या मुख्याध्यापिका विजया राहणे यांनी अधिकृत माहिती देत पालकांना धीर दिला. मात्र अचानक शाळेतून मुलांना घरी घेऊन जाण्याचा अधिकृत मेसेज आल्यानंतर पालकांचा एकच गोंधळ उडाला होता.

अचानक आलेल्या बॉम्बच्या मेलमुळे शाळा परिसरात सकाळपासून तणावग्रस्त वातावरण होतं. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस, श्वानपथक आणि बॉम्बशोध पथकाने शाळेच्या परिसराची कसून पाहणी देखील केली. मात्र तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू त्यांना आढळून आली नाही. त्यामुळे हा मेल केवळ खोडसाळपणा असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. या घटनेमुळे सकाळपासून पालकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण होतं. आता या मेलमागील खरी सत्यता काय, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment