मुंबईतील सूक्ष्मकण प्रदूषण (पीएम २.५ आणि पीएम १०) हा वायू प्रदूषणाचा मुख्य घटक आहे, जो सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करतो. या श्वेतपत्रिकेत मुंबईतील सूक्ष्मकण प्रदूषणाचे स्त्रोत तपासले आहेत, ज्यात वाहतूक क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. वाहतूक, उद्योग, रस्त्यांवरील धूळ, ऊर्जा उत्पादन आणि निवासी क्षेत्रातून पीएम २.५ व पीएम १० उत्सर्जित होतात. या उत्सर्जनातील घटक आणि ईव्हीचे (इलेक्ट्रिक वाहन) रूपांतर केल्याने प्रदूषण कमी होण्याची शक्यता असून, आरोग्य आणि आर्थिक लाभ देखील प्राप्त होऊ शकतात.
मुंबई शहरातील वाढते प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी व शहरात विद्युत वाहनांचा वापर वेगाने वाढावा, याला चालना देण्यासाठी सरकारतर्फे जोमाने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी पालिकेने एक समर्पित इलेक्ट्रिक वाहन सेल सुरू केले होते. शहरात चार्जिंग स्टेशनची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या विद्युतीकरणावरही भर दिला गेला. परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होणारी नवीन मॉडेल्स आणि वाढत्या जागरूकता यामुळे इव्हीच्या विक्रीला गती मिळत असली तरी सार्वजनिक वाहने इव्ही होणे वेगळे व खासगी वाहने इव्ही घेणे यात खूपच फरक आहे. आजही त्याला खूप मर्यादा येत आहेत. महाराष्ट्र सरकारने २०२० मध्ये सुधारित इव्ही धोरण आणले आहे. ज्यानुसार २०२८ पर्यंत मुंबई-पुणे नाशिकसारख्या शहरी भागांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विद्युत करण्याचे उद्दिष्ट आहे, मात्र या सेवांना सरकारचे आर्थिक पाठबळ तरी आहे, मात्र छोट्या सार्वजनिक सेवांचे काय? यामागील सरकारचे उद्दिष्ट पूर्ण होण्याइतपत तरी वाटचाल सुरू आहे का? याच विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न गेल्या आठवड्यात जागतिक इव्ही दिवशी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालाने करून दिला आहे. गेल्या आठवड्यात जागतिक इव्ही दिवस साजरा करण्यात आला. मुंबईतील रिक्षा व टॅक्सीचालकांचा इलेक्ट्रिक वाहनांना असलेला पाठिंबा व ईव्हीचा पर्याय स्वीकारण्यासाठी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे लागेल याचा या अहवालात उल्लेख होता. मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत शेवटच्या टप्प्यात सुविधा पुरवणारी वाहने विजेवर आधारित करण्यासाठीच्या 'व्हील्स ऑफ चेंज' मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये इव्हीच्या स्वीकार्यतेबाबत प्रत्येक बाबतची भूमिका या अहवालातून समजून घेण्यात आली. मुंबईतील ८५ % ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचालकांना इलेक्ट्रिक वाहनाबद्दल माहिती असली तरी चार्जिंग सुविधा, वित्तीय सहाय्य आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे अनेकांनी इलेक्ट्रिक वाहनांचा अजूनही पर्याय स्वीकारलेला नाही. परिणामी मुंबईत शाश्वत सार्वजनिक वाहतूक प्रणाली निर्माण करण्याची प्रक्रिया मंदावत असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. हा अहवाल 'वातावरण फाऊंडेशन' आणि 'क्लायमेट रिसर्च कन्सल्टन्सी' यांच्या संयुक्त विद्यमाने 'असर सोशल इम्पॅक्ट आणि सस्टेनेबल मोबिलिटी नेटवर्क' यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला होता. या अभ्यासाअंतर्गत शहरातील वाहतूक व्यवस्थेत शेवटच्या टप्प्यात सुविधा पुरवणाऱ्या वाहनांमध्ये तातडीने ईव्हीच्या वापराची गरज अधोरेखित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रभागांमध्ये एकूण १ हजार २०० ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. डिजिटल डेटा संकलनासाठी आणि भौगोलिक विश्लेषणासाठी ओजीआयएसचा वापर करण्यात आल्या अभ्यासातून ५५ % ऑटो रिक्षाचालक आणि ४५ % टॅक्सी चालकांच्या मुलाखतींद्वारे वेगवेगळे पैलू जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पहिल्या आणि शेवटच्या टप्प्यात कार्यरत असलेल्या रिक्षा व टॅक्सी चालकांच्या प्रश्नांच्या महत्त्वपूर्ण नोंदी आणि शिफारसी या अभ्यासातून समोर आल्या आहेत. वित्तीय सहाय्य आणि चार्जिंग विषयक त्यांची चिंता योग्य असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे लागेल. संपूर्ण महाराष्ट्रात चार्जिंग नेटवर्क स्थापन करण्याचे काम वेगाने सुरू असून सर्व पार्टनर्स आणि भागधारकांसोबत वित्त पुरवठ्याबाबतच्या नवीन शिफारशींचा पर्यायाने तत्परतेने विचार करावा लागेल. प्रदूषण विरहित वाहतूक व्यवस्थेकडे जाण्याचे ध्येय मोठे असले तरी ते सर्वसमावेशक असले पाहिजे आणि आपण सर्वजण एकत्रितपणे मुंबई शहरासाठी निरोगी आणि अधिक सक्षम भविष्याची निर्मिती करण्यासाठी वचनबद्ध राहण्याची गरज आहे.
या अहवालात असे आढळून आले आहे, की मुंबईतील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी विजेवर आधारित करण्यासाठी सुरुवातीला वारेमाप खर्च आणि चार्जिंगच्या पायाभूत सुविधांचा अभाव हे प्रमुख अडथळे आहेत. एकूण ६४ % ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी अनुदानासाठीच्या पर्यायांचा शोध घेतला आहे आणि ५३ % लोकांना वित्तपुरवठा करणारी सुधारित व्यवस्था सुलभ संक्रमणासाठी फायदेशीर असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. चार्जिंग आणि बॅटरी अदलाबदल करण्यासाठीचे जाळे, वित्तीय सहाय्य आणि कृतिशील आराखडा या बदलासाठी आवश्यक गोष्टी आहे. केवळ स्वच्छ हवेसाठीच नव्हे तर हजारो कुटुंबाच्या उपजीविकेसाठी सुद्धा हे बदल अत्यावश्यक आहेत. या अहवालातून असे निदर्शनास आले की ६२ टक्के चालकांनी चार्जिंग सुविधा अपुरे असल्याचे नमूद केले तर ६० % चालकांना विजेवरील नवीन वाहनांच्या किमती भरमसाठ असल्याचे वाटते. २८ % चालकांनी वाहने किती किलोमीटर धावतील याबाबत चिंता व्यक्त केली, तर २४ % चालकांना देखभाल दुरुस्ती खर्चाबद्दलही चिंता होती. यातील काही चालकांना ईव्हीचे थेट फायदे दिसत असले तरी आर्थिक पायाभूत सुविधा आणि धोरणातील तफावतीमुळे अनेकजण हा पर्याय अजूनही स्वीकारण्याबाबत साशंक आहे.
३९ % चालकांच्या मते ईव्ही चालवणे सोपे आणि कमी खर्चिक आहे. ३९ टक्के चालकांना त्याच्या उत्पन्नात वाढ होईल असेही वाटते, तर ४५% चालक इव्हीचा वापर व देखभाल प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासही आता तयार आहेत या खरच सकारात्मक बाबी असल्याचेही या अहवालात नमूद केले आहे. या अहवालात ईव्हीचा वापर वाढण्यासाठी काही प्रमुख शिफारसी करण्यात आल्या आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या भागांमध्ये जलद चार्जिंग आणि बॅटरी अदलाबदलीचे जाळे तयार करणे तसेच वित्तीय पुरवठ्यासाठी कमी व्याजदराने कर्ज आणि अनुदान मिळवण्याचे सोपे मार्ग अशा नावीन्यपूर्ण उपयोजना करणे आवश्यक आहे. झोपडपट्ट्यांसह राखीव पार्किंग आणि चार्जिंग सुविधाही निर्माण केली पाहिजे, तसेच दीर्घकालीन आणि सुस्पष्ट धोरण तयार करून चालक व गुंतवणूकदारांना आश्वस्त करणे ही आवश्यक आहे. जुनी वाहने टप्प्याटप्प्याने मोडीत काढण्यासाठी स्क्रॅपिंग व रिसायकलिंगसाठी प्रोत्साहन देणेही काळाची गरज आहे.
मुंबईची हवा शुद्ध ठेवण्यासाठी आणि उत्सर्जन कमी करण्यासाठी ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचे विजेवर चालणाऱ्या वाहनांमध्ये संक्रमण घडवून आपण एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलू शकतो अशी धोरणे अचूकपणे आखण्यासाठी, योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी आणि मुंबईला प्रदूषण विरहित भविष्यातील अधिक सर्वसमावेशक सार्वजनिक वाहतुकीच्या दिशेने वाटचाल करण्यास त्यांना चालना दिली गेली पाहिजे. इव्हीबाबतच्या चर्चांमध्ये चालकांची मते अनेकदा दुर्लक्षित राहतात ही पोकळी भरून काढण्यास मदत करेल. आपण हे देखील लक्षात घेतले पाहिजे की इव्हीचा स्वीकार म्हणजे केवळ तंत्रज्ञान किंवा पायाभूत सुविधा एवढ्यापुरते मर्यादित नसून हा बदल लोक त्याची उपजीविका आणि शहराच्या सक्षमतेबद्दलही आहे हे वास्तव लक्षात घेऊन वित्तपुरवठा, नियोजन आणि धोरणांची आखणी करणे हे मुंबईच्या प्रदूषण विरहित गतिशील भविष्यासाठी महत्त्वपूर्ण
ठरू शकेल.
- अल्पेश म्हात्रे