
प्रा. नंदकुमार काकिर्डे
इन्फोसिस लिमिटेड या भारतातील अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान कंपनीने नुकतीच त्यांच्या भागधारकांकडून फेर खरेदीची (बाय बॅक) सर्वात मोठी ऑफर जाहीर केली आहे. त्यासाठी १८ हजार कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाने नुकताच मंजूर केला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनिश्चितता व अस्थिरता, तसेच या क्षेत्राला एकूण मिळणाऱ्या महसूल किंवा व्यवसायातील चढ-उतार याच्या पार्श्वभूमीवर इन्फोसिसने ही मोठी फेरखरेदी जाहीर केली आहे. कंपनी क्षेत्रातील या सर्वात मोठ्या ‘बायबॅक’चा हा धांडोळा...
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या इन्फोसिस लिमिटेड कंपनीने भागधारकांकडून समभाग फेर खरेदीची (बायबॅक) ऑफर दिली असून त्यासाठी १८ हजार कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाने नुकताच मंजूर केला. कंपनी क्षेत्रातील या सर्वात मोठ्या ‘बायबॅक’चा धांडोळा.
इन्फोसिस लिमिटेड या भारतातील अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान कंपनीने नुकतीच त्यांच्या भागधारकांकडून फेर खरेदीची (बाय बॅक) सर्वात मोठी ऑफर जाहीर केली आहे. त्यांनी भागधारकांकडून दहा कोटी शेअर्स खरेदी फेर खरेदी करण्याचे ठरवले असून त्यासाठी प्रति समभाग १८०० रुपये किंमत देण्याचे मान्य केले आहे. ज्यावेळी ही ऑफर जाहीर केली त्यादिवशी शेअर बाजारामध्ये त्या शेअरचा भाव बंद भाव १५०९.५० रुपये इतका होता. त्यापेक्षा १९.२ टक्के इतकी जास्त किंमत कंपनीने देण्याचे जाहीर केले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनिश्चितता व अस्थिरता, तसेच या क्षेत्राला एकूण मिळणाऱ्या महसूल किंवा व्यवसायातील चढ-उतार याच्या पार्श्वभूमीवर इन्फोसिसने ही मोठी फेर खरेदी जाहीर केली आहे. त्याच्या नेमक्या तारखा अद्याप जाहीर व्हायच्या असून पुढील चार महिने ही फेर खरेदी सुरू राहण्याची शक्यता आहे. विद्यमान भागधारकांना १८०० रुपये किमतीने त्यांच्याकडील शेअर्स विकून उत्तम नफा मिळवण्याची ही चांगली संधी आहे. एकादृष्टीने कंपनीच्या प्रत्येक शेअरची मिळकत (ज्याला अर्निंग पर शेअर म्हणतात) ई. पी. एस. चांगल्यारीतीने सुधारण्याची तसेच कंपनीच्या समभागावरील परतावा चांगल्या पद्धतीने मिळण्याची गुंतवणूकदारांची अपेक्षा या बायबॅकमध्ये पूर्ण होते.
अशा प्रकारच्या शेअरच्या फेर खरेदीमुळे कंपनीच्या एकूण परिस्थितीवर त्याचा चांगला परिणाम होतो व महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुंतवणूकदारांमध्ये एक प्रकारे कंपनीवर जास्त विश्वास बसतो. इन्फोसिस या कंपनीने आजवर एकूण पाच वेळा त्यांच्या शेअरची फेर खरेदी भागधारकांकडून केलेली आहे. सर्वात प्रथम २०१७ मध्ये त्यांनी १३ हजार कोटी रुपयांची फेर खरेदी केलेली होती. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा ८ हजार २६० कोटी रुपयांची फेर खरेदी केली. त्यानंतर २०२२ मध्ये तिसऱ्यांदा एकूण ९ हजार २०० कोटी रुपयांच्या शेअर्सची फेर खरेदी केली. याचा अर्थ आजवर या कंपनीने ३० हजार ५६० कोटी रुपयांच्या शेअर्सची फेर खरेदी गुंतवणूकदारांकडून केलेली आहे. आपल्या भागधारकांना सातत्याने उत्तम पैसा मिळवून देण्याच्या उद्देशाने कंपनीने आठ वर्षांत तीनदा शेअरची फेर खरेदी केली व आता पुन्हा एकदा विक्रमी फेर खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनीने आपल्या शेअरची बाजारातून फेर खरेदी करण्याचे प्रमुख कारण म्हणजे कंपनीकडे रोख रक्कम प्रचंड प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे अशा रकमेच्या ८५ टक्के रक्कम भागधारकांना परत देण्याचे कंपनीचे धोरण असल्यामुळे ही फेर खरेदी जाहीर करण्यात आली आहे. अशा प्रचंड रकमेचा नजीकच्या काळामध्ये वापर करण्याची कोणतीही योजना कंपनीकडे नसल्यामुळे कंपनी अशा प्रकारे फेर खरेदीद्वारे भागधारकांचा फायदा करत असते.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएस व विप्रो या दोन्ही अग्रगण्य कंपन्यांनी यापूर्वी प्रत्येकी किमान तीन वेळा शेअर्सची फेर खरेदी गेल्या पाच वर्षांत केलेली आहे. एकंदरीत देशातील प्रमुख माहिती तंत्रज्ञान कंपनीने सातत्याने हा एक मोठा स्वागतार्ह पायंडा पाडलेला आहे. टीसीएस या कंपनीने त्यांच्या धोरणामध्येच एक गोष्ट स्पष्ट केली होती की कंपनीकडे उपलब्ध असलेल्या रोख रकमेच्या ८० ते १०० टक्के रक्कम भाग धारकांना फेरखरेदीद्वारे परत देण्याचे जाहीर केलेले आहे. त्याचप्रमाणे एच सी एल टेक्नॉलॉजीस या कंपनीनेही त्यांच्या निव्वळ उत्पन्नातील ७५ टक्के रक्कम भागधारकांना परत देण्याचे धोरण जाहीर केलेले आहे. तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०२२ मध्ये टीसीएस कंपनीने १८ हजार कोटी रुपयांच्या शेअरची म्हणजे एकूण शेअर्सच्या १.०८ टक्के शेअर्सची फेरखरेदी भागधारकांकडून केलेली होती. यावर्षी इन्फोसिसने तेवढ्याच रकमेची फेर खरेदी करण्याचे जाहीर केलेले आहे. इन्फोसिसतर्फे या वेळेला २.४१ टक्के शेअर्सची फेर खरेदी होणार आहे.
गेल्या नऊ महिन्यांमध्ये इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने लक्षणीय घसरण झालेली आहे. ही घसरण जवळजवळ २४ टक्क्यांच्या घरात असल्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनाने फेर खरेदीचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. आजच्या घडीला कंपनीच्या प्रवर्तकांकडे एकूण १४.६१ टक्क्यांचे भाग भांडवल आहे तर परदेशी वित्त संस्थांकडे ३१.९२ टक्के भाग भांडवल आहे. देशातील स्थानिक वित्त संस्थांकडे ३९.६ टक्के भाग भांडवल असून उर्वरित भाग भांडवल म्युच्युअल फंड व १४ टक्के व्यक्तिगत गुंतवणूकदारांकडे आहे. एकूण भाग भांडवलाच्या ७२ टक्के शेअर्स म्युच्युअल फंड व परदेशी वित्त संस्थांकडे आहेत.
गेल्या पाच वर्षांत सातत्याने इन्फोसिस कंपनीच्या व्यवस्थापनाने भागधारकांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने लाभांश किंवा अन्य लाभ देण्याचे धोरण जाहीर केलेले आहे. गेल्या वर्षी कंपनीकडे ४.१ बिलियन डॉलर्स इतकी रक्कम मुक्त रोख रक्कम उपलब्ध होती. येत्या पाच वर्षांत कंपनीकडे साधारणपणे १७.४ बिलियन डॉलर्स इतकी मोठी रक्कम उपलब्ध होणार असून ती भागधारकांना देण्याचे कंपनीचे धोरण आहे.
त्या तुलनेत टीसीएस कंपनीकडे सध्या ५.२ बिलियन डॉलर्स इतकी रोख रक्कम आहे तर एचसीएल टेक्नॉलॉजी या कंपनीकडे २.५ बिलियन डॉलर्स इतकी रोख रक्कम पडून आहे. कोणत्याही कंपनीचा दरवर्षी इमारती यंत्रसामग्री किंवा तंत्रज्ञान यावर होणारा भांडवली खर्च, किंवा दर महिन्याचे वेतन पगार किंवा भाड्यापोटी द्यावा लागणारा खर्च हा उत्पन्नातून वजा केल्यानंतर जी रक्कम कंपनीच्या खात्यामध्ये राहते त्यास रोख रकमेची उपलब्धता असे म्हणतात. त्या रकमेच्या जवळजवळ ७५ ते ८० टक्के रक्कम भागधारकांना विविध मार्गांनी परत देण्याचे धोरण अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे आहे. त्यामुळेच अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान कंपन्या शेअर्स फेर खरेदीचा निर्णय वारंवार घेत असतात. भारतीय शेअर बाजारांवरील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची एकूण कामगिरी लक्षात घेता २०२५ या वर्षामध्ये इन्फोसिससह टीसीएस, विप्रो, टेक महिंद्रा, एचसीएल टेक्नॉलॉजीस् या सर्व कंपन्यांचे भाव दहा टक्के ते २५ टक्क्यांच्या घरात खाली कोसळलेले आहेत. त्यामुळेच बहुतेक सर्व कंपन्या ही घसरण कोठेतरी रोखण्यासाठी व भागीदारांना जास्तीत जास्त लाभ देण्याच्या उद्देशाने शेअर्सची फेर खरेदी जाहीर करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये या सर्व कंपन्यांची एकूण वाढ ही खूप मर्यादित स्वरूपात होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झालेले आहे. या सर्व कंपन्यांची दरवर्षीची वाढ साधारणपणे तीन ते चार टक्क्यांच्या जवळपास आहे तर काही कंपन्यांचा महसूल घसरल्याचेही आढळलेले आहे. चालू आर्थिक वर्षात म्हणजे मार्च २०२६ अखेर इन्फोसिस कंपनीला एक ते तीन टक्के वाढ नोंदवण्याची शक्यता वाटते.
कोणतीही पब्लिक लिमिटेड कंपनी जेव्हा बाजारातून त्यांच्या शेअरची फेर खरेदी करते तेव्हा त्यांचे बाजारातील शेअर्स तेवढ्या प्रमाणात कमी होतात. त्यामुळे कंपनीच्या शेअरची बाजारातील किंमत पुन्हा वाढावी अशी अपेक्षा असते एवढेच नाही तर भागधारकांना चांगल्या किमतीला फेर खरेदी संधी देऊन त्यांना भरघोस फायदा देण्याचा प्रयत्न या कंपन्या करतात. अर्थात ही फेर खरेदी ही कधीही सक्तीची करता येत नाही व सध्याच्या भागधारकांना वाढत्या किमतीचा फायदा मिळवून देण्याचा हा एक चांगला प्रयत्न आहे. कोणत्याही पब्लिक लिमिटेड कंपनीला एकदा फेर खरेदीचा प्रयत्न झाला की त्यानंतर किमान एक वर्षे फेर खरेदी करता येत नाही. सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी या नियामकांनी कोणत्याही पब्लिक लिमिटेड कंपनीला एका वर्षामध्ये एकदाच शेअरची फेर खरेदी करता येईल असा नियम घालून दिलेला आहे.
या फेर खरेदीच्या मागचे प्राप्तिकाराचे नियम पाहिले तर कंपनीने अशा प्रकारच्या शेअर्सची फेर खरेदी केल्यामुळे त्यांना कोणताही कर द्यावा लागत नाही मात्र जे गुंतवणूकदार किंवा भागधारक त्यांचे शेअर्स कंपनीच्या किमतीला फेर खरेदीद्वारे विकतील त्यांना त्यांच्या उत्पन्नावर प्राप्तिकर भरावा लागतो. अर्थात या प्राप्तिकराचा बोजा म्युच्युअल फंड किंवा परदेशी वित्त संस्थांना पडत नाही. मात्र व्यक्तिगत किरकोळ गुंतवणूकदार किंवा प्रवर्तकांनी जर त्यांच्या शेअर्सची फेर खरेदी केली तर त्यांना संबंधित उत्पन्नावर प्राप्तिकर भरावा लागतो. या प्राप्तिकाराचा दर कमाल ३६ टक्क्यांपेक्षा जास्त नाही. मात्र प्रत्येक भागधारक किंवा गुंतवणूकदाराचे एकूण उत्पन्न लक्षात घेऊन त्यानुसार फेर खरेदी वरच्या उत्पन्नावर प्राप्तिकर भरावा लागतो.
गेल्या काही महिन्यांमध्ये विविध परदेशी वित्त संस्थांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री केल्याचे दिसून येत आहे. जुलै महिन्यात परदेशी वित्त संस्थांनी १९,९०१ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली होती, तर ऑगस्ट महिन्यामध्ये तब्बल ११,२८५ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली होती. त्यामुळे त्या विक्रीचा मोठा दबाव बहुतेक सर्व माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्सवर वाढलेला आहे. कदाचित ही घसरण रोखण्याचा व त्याच वेळी गुंतवणूकदारांना चांगला लाभ देण्याचा कंपनीचा प्रयत्न असावा असे वाटते. एकंदरीत सध्याच्या काळामध्ये तरी इन्फोसिस कंपनीचा बायबॅक हा गुंतवणूकदारांसाठी निश्चित आकर्षक आहे. त्यास कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणे अभ्यासाचे ठरेल.