
मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे लागत आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे नारळाच्या झाडांचे नुकसान झाले आहे. त्याचा थेट परिणाम मुंबईसह इतर शहरातील आवकवर झाला आहे. यंदा तब्बल ६० टक्क्यांनी आवक घटल्याने नारळाचे भाव प्रचंड वाढले आहेत. ऐन नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळी सणाच्या तोंडावर ३५ ते ४० रुपये किमतीला मिळणारा नारळ तब्बल ६० रुपये किमतीवर पोहोचला आहे, तर याचमुळे सुक्या खोबऱ्याचे भावदेखील किलोमागे ४०० रुपये पार गेले आहेत.
नारळाचे भाव प्रचंड प्रमाणात वाढल्याने यंदा सण, उत्सव साजरे करताना नागरिकांना नारळाची वाढती महागाई सोसावी लागणार आहे. यावर्षी जून, जुलै महिन्यांत आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यात पावसामुळे नारळाच्या वृक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इतकेच नाही तर झाडांवर पांढऱ्या रंगाच्या माशांचा प्रादुर्भाव झाल्याने नारळ मोसमाआधीच गळून पडले. त्यामुळे बहुतांश याच राज्यांतून सुके खोबरे, शहाळे व शेंडीवाल्या नारळाची होणारी आवक घटली आहे. त्यामुळे येत्या नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळी सणात नागरिकांना महाग नारळ खरेदी करण्याची वेळ आली आहे. नारळाचीही आकार आणि वजनानुसार वर्गवारी केली जाते. यामध्ये मोठ्या शेंडीवाले फुलनार, कमी शेंडीवाले कंगनार, खोबऱ्याची वडी बनविण्यासाठी वापरले जाणारे बॉम्बे चिल, आंध्र प्रदेशातून येणारे रायपूर चिल व मोठ्या आकाराचा चारपट्टा अशा प्रकारच्या नारळाला विशेष मागणी असताना त्यांचे भाव वाढले आहेत.
शेंडीवाल्या नारळाची आवक ४० टक्के
गणेशोत्सव सुरू झाल्यापासून शेंडीवाल्या नारळाची मागणी वाढली. होलसेल बाजारात ३२ रुपयांना मिळणारे नारळ किरकोळ बाजारात तब्बल ६० रुपयांवर पोहोचले. नारळाची आवक ४० टक्केच होत असल्याने भाव वाढल्याचे व्यावसायिक सांगतात. पावसामुळे खोबऱ्याला बुरशी लागते. पावसामुळे नारळाच्या झाडांचे नुकसान झाले. यामुळे देवाला अर्पण केले जाणारे शेंडीचे नारळ ६० रुपयांपर्यंत, तर सोललेल्या नारळाची किंमत ८० रुपये इतकी झाली. येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत नारळाच्या किमतींमध्ये तेजी राहणार आहे.