
अरोरा म्हणजे तो ध्रुवांवर पडणारा तेजस्वी प्रकाश. त्याचे आकारही वेगवेगळे असतात. कधी प्रकाश शलाका असतात, तर कधी मोठी ठिणगी उडाल्यासारखे दिसते. त्याची जाडी काही शेकडो किलोमीटर्स, तर पूर्व-पश्चिम लांबी काही हजारो किलोमीटर्स असते. त्यालाच अरोरा किंवा ध्रुवीय प्रकाश अथवा ध्रुवीय प्रभा म्हणतात.
आदित्य हा एक अभ्यासू, जिज्ञासू, तेजस्वी बुद्धीचा हुशार व कनवाळू असा विद्यार्थी होता. त्याची शाळेमध्ये त्याच्यासारख्याच एका ज्ञानी-विज्ञानी सुभाष नावाच्या गरीब विद्यार्थ्यासोबत ओळख झाली होती व विज्ञानाच्या चर्चेतून त्यांची घनिष्ठ मैत्रीही झाली होती. नेहमीसारखे आज शाळेच्या मधल्या सुट्टीत आदित्य व त्याचे मित्र शाळेमध्ये त्यांच्या नेहमीच्या निंबाच्या झाडाखाली सुभाषची वाटच बघत बसले होते. थोड्याच वेळात तो तेथे आला. आदित्यने तो दिसताबरोबर त्याला आवाज दिला. तो आदित्य जवळ येऊन बसला व त्यांचे ज्ञानवर्धक विचारविनिमय सुरू झाले. “मित्रांनो, तुम्हाला अरोराबद्दल काही माहिती आहे का?” सुभाषने सर्वांकडे बघत विचारले. “अरोरा म्हणजे तो ध्रुवांवर पडणारा तेजस्वी प्रकाश आहे एवढेच मी ऐकून आहे.” आदित्य बोलला. “मित्रहो” सुभाष सांगू लागला, “कधी कधी पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण ध्रुवांभोवतीच्या प्रदेशात आकाशात १०० मैल म्हणजे अंदाजे १६० कि.मी. उंचीवर लखलखीत चमकणारा सुंदर असा चमत्कारित प्रकाश दिसतो. तो काही मिनिटांपासून तर काही तासांपर्यंत दिसत राहतो. त्याचे आकारही वेगवेगळे असतात. कधी प्रकाश शलाका असतात, तर कधी मोठी ठिणगी उडाल्यासारखे दिसते. कधी-कधी तो प्रकाश बहुरंगी पट्ट्यांच्या स्वरूपातही असतो, तर कधी मोठा चमकणारा पडदाच उभारल्यासारखे वाटते. त्याची जाडी काही शेकडो किलोमीटर्स, तर पूर्व-पश्चिम लांबी काही हजारो किलोमीटर्स असते. त्यालाच अरोरा किंवा ध्रुवीय प्रकाश अथवा ध्रुवीय प्रभा म्हणतात.” सुभाष पुढे सांगू लागला, “हा अरोरा निरनिराळ्या आकाराचा व वेगवेगळ्या रंगांचा असू शकतो. तो कधी शुभ्र पांढरा, तर कधी हिरवा, निळा, पिवळा किंवा तांबडाही असतो. कधी-कधी त्याचे रंग व आकार सारखे बदलत असतात. जेव्हा हा प्रकाश आकाश उजळतो तेव्हा तेजस्वी सूर्यकिरण पंख्याप्रमाणे आकाशात उलगडत जातात. लाल, नारिंगी, हिरव्या, निळ्या रंगांचे पट्टे आकाशात नाचत राहतात. तो जास्त भडक असेल तर हिरवा, पिवळा व तांबडा असे तिन्हीही रंग त्यात दिसतात. त्याचे प्रकाशकिरण कधी स्थिर असतात, तर ते केव्हा केव्हा हलतसुद्धा असतात. जसजसे ध्रुवाच्या जवळ जावे तसतसा अरोरा जास्त प्रकाशमान दिसतो; परंतु एका ठरावीक सीमेनंतर त्याचा प्रकाश कमी होत जातो. प्रत्यक्ष ध्रुवावर तो फारसा तेजस्वी दिसत नाही.” “ते अरोराचे रंग कशामुळे निर्माण होतात मग?” मोंटूने प्रश्न केला. “अरोरामध्ये चमकणारे रंग हे ऑक्सिजन व नायट्रोजन याच्या अणू-रेणूंमधून निर्माण होतात. जेव्हा पृथ्वीवरील १८० ते २०० कि. मी.मध्ये असणाऱ्या ऑक्सिजन अणूंवर सौरवातांमधील जास्त ऊर्जेच्या इलेक्ट्रॉन्सच्या कणांचा आघात होतो तेव्हा त्या अणूंमधून हिरवट पांढरा रंग बाहेर पडतो, तर कमी ऊर्जेच्या इलेक्ट्रॉन्स कणांचा मारा झाला, तर त्या अणूंपासून तांबडा रंग बाहेर पडतो. अशाच प्रकारे नायट्रोजनच्या अणूंमधून कधी हिरवा, तर कधी निळा रंग बाहेर पडतो. उदासीन नायट्रोजनच्या अणूंमधून जांभळट तांबडा रंग बाहेर पडतो.” सुभाषने स्पष्टीकरण दिले. “पण तो अरोरा कशामुळे पडतो?” पिंटूने विचारले. “अरोरा सूर्यावरील डागांमुळे घडत असतो. सूर्यावरील डाग जसजसे कमी-जास्त होतात, त्या प्रमाणात अरोरा कमी अधिक वेळा दिसतो. सूर्य डागांतून निघणारे असंख्य विद्युतकण प्रकाशाच्या वेगाने खूप दूरवर फेकले जातात. त्यांपैकी काही फवारे आपल्या पृथ्वीकडे येतात. पृथ्वीसुद्धा चुंबकीय आहे व तिचे चुंबकीय ध्रुव हे उत्तर व दक्षिण ध्रुवांशेजारीच आहेत. त्यामुळे सूर्य डागांकडून आलेले विद्युतकण फक्त पृथ्वीच्या ध्रुव प्रदेशांकडेच आकर्षिले जातात. पृथ्वीचा खूप उंचावरील वातावरणातील चुंबकीय प्रभाव व सूर्याकडून आलेले विद्युतभारीत कण यांच्यातील होत असलेल्या आंतरक्रियांमुळे निर्माण होणाऱ्या विद्युत लहरींमधून बाहेर पडणाऱ्या प्रारणांमुळे त्या प्रदेशात प्रकाशांचे अद्भुत चमत्कार दिसतात.” सुभाषने सांगितले. त्यांचा असा विचारविनिमय सुरू असतानाच शाळेची मधली सुट्टी संपल्याची घंटा झाली. ते उठून उभे राहिले व आपापल्या वर्गाकडे निघाले.