
पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या नावाची निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार विश्वास पाटील ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांच्याही नावाची चर्चा होती. पण विश्वास पाटील यांच्या नावाची आज अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
नवीन वर्ष २०२६ च्या जानेवारी महिन्यात सातारा येथे ९९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन भरणार आहे. त्याच्या अध्यक्षपदाच्या नेमणुकीसाठी पुण्यातील साहित्य परिषदेत आज सकाळी अकरा वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. साहित्य महामंडळाच्या वेगवेगळ्या शाखांकडून वेगवेगळ्या साहित्यिकांची नावे अध्यक्षपदासाठी सुचवण्यात आली होती. ज्यामध्ये रंगनाथ पठारे, बाळ फोंडके यांची नावे आघाडीवर होती.
साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलींद जोशी यांनी काही दिवसांपुर्वी भालचंद्र नेमाडे यांची देखील भेट घेऊन त्यांना अध्यक्षपदासाठी गळ घातली होती. मात्र नेमाडेंकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पानिपतकार विश्वास पाटलांचीच अध्यक्ष म्हणून वर्णी लागेल, अशी जोरदार चर्चा सुरू होती. त्यानुसार विश्वास पाटलांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे अभिनंदन केले आहे. 'साहित्य संमेलन म्हणजे अभिजात मराठीचा मानबिंदू. वैभवशाली मराठीच्या वाटचालीतील समृद्ध दालन. अशा या संमेलनाची शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत सातारा येथे नियोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड ही यथार्थ अशीच आहे. पाटील यांनी आपल्या दमदार लेखणीतून वैविध्यपूर्ण आणि कसदार साहित्यकृतीची निर्मिती केली आहे. यामुळे मराठी साहित्यात मोलाची भर घातली गेली आहे. त्यांच्या निवडीमुळे साहित्य संमेलन अध्यक्षांच्या आतापर्यंतच्या मालिकेचाही दिमाख वाढता असाच राहिला आहे. ही बाब मराठी साहित्य क्षेत्रातील होतकरूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या निवडीसाठी साहित्य महामंडळाशी निगडित सर्वांचे मनापासून अभिनंदन. ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचे मनापासून अभिनंदन आणि ९९ व्या साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळालेल्या सातारकरांना आयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.