Sunday, September 14, 2025

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे. गावची जमीन गावातच ठेवायची, गावाबाहेरच्या कोणालाही गावातील जमीन विकायची नाही, अशा स्वरुपाचा ठराव मोरवणेच्या ग्रामसभेने केला आहे. हा ठराव कोकणवासियांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. पैशांसाठी अनेकदा परगावात किंवा शहरात राहणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या व्यक्तीला किंवा खासगी आस्थापनाला जमीन विकली जाते. या जमिनीला नंतर विकसित केले जाते. या प्रक्रियेत काही वेळा नैसर्गिक जलस्त्रोत नष्ट होतात. स्थानिक निसर्गसंपदा नष्ट होते. हे संकट टाळण्यासाठी गावची जमीन गावातच ठेवण्याचा ठराव करण्यात आला आहे.

कोणत्याही कारणामुळे जमिनी परगावात राहणाऱ्यांना विकल्या तर स्थानिकांच्या भविष्यातील पिढ्यांसाठी जमीन उरणार नाही. जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातून काही दलाल गब्बर होतील. पण स्थानिकांच्या भविष्यातील पिढ्यांना जमीन नसल्यामुळे पैशांसाठी परगावात किंवा शहरात जाऊन काम करावे लागेल. हा धोका टाळणे आवश्यक आहे, असे मत मोरवणेच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत मांडले. यानंतर मोरवणेच्या ग्रामसभेने परगावातील नागरिकाला किंवा खासगी आस्थापनाला जमीन विकायची नाही, असा निर्णय एकमताने घेतला.

जमिनीच्या अनियंत्रित व्यवहारांना आळा घालणे या उद्देशाने मोरवणेच्या ग्रामसभेने ठराव केला आहे. हा ठराव कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नाही. पण संपूर्ण गावावर या ठरावाने अप्रत्यक्षरित्या एक सामाजिक बंधन घातले आहे. ग्रामस्थांनी ठरावाच्या अंमलबजावणीची जबाबदारी तःवर घेतली आहे. कोणीही बाहेरच्या व्यक्तीस जमीन विकण्याचा प्रयत्न केल्यास ग्रामसभा त्याविरोधात उभी राहील, अशी स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे.

बाहेरचे लोक पैशाच्या जोरावर जमीन घेतात आणि गावाचा सामाजिक समतोल बिघडतो. स्थानिक तरुणांना शेतीसाठी किंवा घरे बांधण्यासाठी जागा उरत नाही. त्यामुळे हा ठराव अत्यावश्यक असल्याचे मत ठरावावेळी मांडण्यात आले. जमिनी गावकऱ्यांच्या हक्कासाठी राखीव ठेवायला हव्या, अशीही भूमिका मांडण्यात आली. स्थानिकांना भविष्यात त्यांच्या गरजेनुसार शेतीसाठी किंवा घरे बांधण्यासाठी जागा हवी असेल तर आतापासून गावाबाहेर जमीन विकायची नाही हे सामाजिक बंधन पाळावे लागेल, असेही मत ग्रामसभेत मांडले गेले. गावकऱ्यांचे हक्क अबाधित ठेवत भविष्यातील पिढ्यांना शेती आणि घरासाठीच्या जमिनींची कमतरता भासू नये, यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. एखाद्याची पैशांची निकड असेल तर गावातल्याच एखाद्याने जमीन खरेदी करुन आर्थिक प्रश्न सोडवण्यासास मदत करावी, असाही विचार ग्रामसभेत मांडला गेला. या विचाराचे ग्रामसभेने स्वागत केले.

Comments
Add Comment