Sunday, September 14, 2025

हत्ती हटेना... वनविभाग पथक हतबल!

हत्ती हटेना... वनविभाग पथक हतबल!

गोवा वन खात्याचे पथक सिंधुदुर्ग सीमेवर सतर्क

ओंकार हत्ती आज दिवसभर नेतर्डे परिसरात ठाण मांडून असल्याने गोवा वनखात्याचे पथक सतर्क झाले आहे. हा परिसर गोवा सिमेलगत असल्याने व या परिसरात पिण्यासाठी मुबलक पाणी तसेच समृद्ध बागायती असल्याने ओमकार कोणत्याही क्षणी गोवा हद्दीत प्रवेश करण्याच्या पार्श्वभूमीवर गोवा वनखात्याचे पथक सीमेवर सतर्क झाले आहे. गोवा वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी मिळून बारा जणांचे पथक सीमेवर गस्त घालत आहेत. ओंकार हत्तीच्या वास्तव्याची या पथकाकडून वेळोवेळी माहिती घेतली जात आहे.

बांदा (प्रतिनिधी) : दोडामार्ग तिलारी परिसरातून वाट चुकलेला ‘ओंकार’ हा टस्कर हत्ती सध्या सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे धनगरवाडी परिसरात स्थिरावला आहे. या अनपेक्षित पाहुण्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थ त्याला सुखरूप परत पाठवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. शनिवारी संपूर्ण दिवसभर हत्ती नेतर्डे धनगरवाडी परिसरातच घुटमळत होता. हत्तीला या परिसरातून हुसकावून लावण्यासाठी सिंधुदुर्ग वनविभाग अधिकारी, कर्मचारी, जलद कृती दल यांच्यासह गोवा वनविभागाचे पथकही परिसरात ठाण मांडून आहे.

दोडामार्ग तिलारी परिसरातील घोटगे, मोर्ले गावात धुमाकूळ घालणारा हत्तींचा कळप सध्या कार्यरत आहे. याच कळपातील ओंकार हा हत्ती शुक्रवारी कळणे, फोंडये, उगाडे गावातून डेगवे, डोंगरपाल मार्गे नेतर्डे - धनगरवाडीत आला आहे. शनिवारी सकाळी डोंगरपाल येथील समीर विरनोडकर यांच्या विहिरीजवळ त्याचे दर्शन झाले. त्यानंतर डोंगरपाल येथील माऊली विद्यामंदिर परिसरात त्याचे वास्तव्य होते. या शाळेच्या मैदानावर वनविभागाचे शीघ्र कृती दल ठाण मांडून होते. शाळा व्यवस्थापनाने हत्तीचा वावर असल्याने शाळा बंद करून मुलांना सुखरूप घरी पाठविले. या ठिकाणी ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने हत्तीचा शोध घेण्यात येत होता.

दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास सदर हत्ती पाणवट्याच्या ठिकाणी दाट झाडीत झोपी गेला होता. वन खात्याच्या पथकाने याबाबतची खात्री केली. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पुन्हा जागा होऊन तो डोंगरपाल, नेतर्डे परिसरातील जंगलात घुटमळत होता. रात्री उशिरापर्यंत सदर हत्ती नेतर्डेतच ठाण मांडून होता. सायंकाळी उशिरा डोंगरपाल येथील नर्सरी जवळ त्याचे शेवटचे दर्शन ग्रामस्थांना झाले.

डोंगरपाल हायस्कूलजवळ हत्तीने तळ ठोकल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सकाळीच शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली. हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गोवा वनविभागाचे पथक आणि जलद कृती दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हत्तीला त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला हत्तीला आल्या पावली परत पाठवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे आता त्याला कोणताही त्रास न देता शांतपणे परत पाठवण्याचे नियोजन केले जात आहे. स्थानिक ग्रामस्थही वनविभागाला मदत करत आहेत. जेणेकरून हत्तीला सुरक्षितपणे त्याच्या मार्गावर आणता येईल. सकाळच्या सत्रात फटाके फोडून हत्तीला हुसकवण्याचा प्रयत्न वन खात्याच्या पथकाने केला. मात्र या ठिकाणी घनदाट झाडी व दाट जंगल असल्याने हत्ती या परिसरातच घुटमळत होता. नेतर्डे धनगरवाडी येथे पाण्याची तळी असल्याने हत्तीने याठिकाणीच तब्बल चार तास विश्रांती घेतली.

या घटनेमुळे परिसरातील शेती बागायतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. वनविभाग आणि स्थानिक प्रशासन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. नागरिकांना हत्तीच्या जवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment