राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते देशाचे पंतप्रधान इतका मोठा आणि अविश्वसनीय प्रवास करणारे नरेंद्र मोदी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. जागतिक पातळीवरील मोठ्या, सन्माननीय आणि द्रष्ट्या नेत्यांमध्ये समाविष्ट असणारे हे नाव आहे. त्यांच्या अंगी अनेक गुणांचा समुच्चय आहेच, मात्र इतके असूनही हा पाय जमिनीवर असणारा नेता आहे. त्यांचे अभष्टचिंतन करताना बरेच मुद्दे चर्चेत घ्यावे लागतील.
सलग तिसऱ्या वेळी भारताचे पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी अमृत महोत्सवी वर्षामध्ये प्रवेश करत आहेत. यानिमित्ताने देशवासीय त्यांच्याप्रति असलेल्या आपल्या भावना विविध प्रकारे व्यक्त करत आहेत. गेल्या काही काळात आपल्या आसपास घडत असणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हा देशासाठी भाग्ययोगच म्हणावा लागेल. श्रीलंकेमध्ये झालेले सत्तांतर, पाकिस्तानमध्ये असणारी अस्वस्थता-अनिश्चितता, धुमसणारा बांगलादेश, नेपाळमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात नुकतेच उठवले गेलेले रान, म्यानमारमध्ये चिघळलेला हिंसाचार अशा माध्यमातून एका अर्थाने भारतीय उपखंडामध्ये पूर्णपणे सत्तांतराचे कारस्थान वा षडयंत्र शिजत असताना भारत केवळ राजकीय दृष्ट्याच स्थैर्य राखून आहे असे नाही, तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती करतो आहे. म्हणजेच लोकशाहीला बाधक असणाऱ्या इतक्या घटना अवतीभवती घडत असतानाही भारतामध्ये असणारे स्थैर्य ही विलक्षण समाधानाची बाब असून याचे कारण भारतीयांचे लोकशाहीवर असणारे प्रेम आहेच; त्याचबरोबर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये दिसणारी दूरदर्शिता, कुशलता हेदेखील आहे असे वाटते.
अमृत महोत्सवानिमित्त आपण मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करतो तेव्हा लक्षात येते की, गेली सुमारे ३९ वर्षे ते राजकारणात आहेत. १९८६-८७ च्या दरम्यान ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून भारतीय जनता पक्षामध्ये आले. संघाचे स्वयंसेवक असताना आणि त्याही आधी त्यांचा व्यक्तिगत कल आणि जीवनाविषयीचे चिंतन त्यागाचे, फकिरीचेच राहिले आहे. त्यांची वृत्ती संन्यास, विश्वस्त स्वरूपाचीच आहे. अशा मानसिकतेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या नि:स्वार्थ आणि ‘राष्ट्र सर्वतोपरी’ मानणाऱ्या संघटनेशी त्यांचा संबंध आला. संघाचे प्रचारक म्हणून काम करताना ते देशाच्या कानाकोपऱ्यांत गेले, राहिले. त्यांचा हिमालय वा भारतीय तीर्थक्षेत्रातील प्रवास काहीसा गूढ आहे. पण त्याचा फार विचार न करता बघायचे तर सार्वजनिक जीवनात वावर सुरू झाल्यानंतर लोकांनी घेतलेले त्यांचे अनुभव ऐकता समजते की, त्यांनी स्वत:विषयी म्हटलेले वाक्यच त्यांची खरी ओळख आहे. मोदी म्हणतात, ‘मै क्या... मै तो फकिर हूं. कंधेपे झोला लटकाके निकल जाऊंगा...!’ अशी मानसिकता असणाऱ्या माणसांमध्येच लोकांचा विश्वास जिंकण्याची आणि स्थैर्य निर्माण करण्याची विलक्षण क्षमता आणि शक्ती असू शकते. मोदींमध्ये ती आहे.
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा जनसामान्यांसाठी अपरिचितच होते. संघाच्या कार्यपद्धतीमधील ही एक विलक्षण बाब असून त्यानुसार संबंधित व्यक्ती व्यासपीठावर आल्याखेरीज ओळखणे शक्य नसते. त्यामुळेच प्रचारक असताना त्यांना जवळून पाहिलेल्या, ओळखणाऱ्या लोकांनाही कधी ते मुख्यमंत्री, पंतप्रधान होतील अशी अपेक्षा असण्याचे कारण नव्हते. संघाचे काम करताना ते अत्यंत साध्या ठिकाणी राहत असत. मुक्कामाला असणारे ज्येष्ठ कार्यकर्ते, प्रचारक यांच्यासाठी चहा करण्याचे, भांडीकुंडी घासण्याचे काम ते करत असत. त्यामुळे २००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड केली गेली तेव्हा लोकांना धक्काच बसला. संघ आणि भाजपशी परिचित नसणाऱ्या नागरिकांना त्यांच्या निवडीचे आश्चर्य वाटले. मुख्य म्हणजे त्याआधी मोदीजींनी ग्रामपंचायतीची निवडणूकही लढवली नव्हती. अशा वेळी एक माणूस एकदम मुख्यमंत्री होणे ही बाबही वेगळीच म्हणावी लागेल.
२००१ ते २०१४ हा कालखंड गुजरातचे मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी अत्यंत यशस्वी रितीने काम केले आणि या राज्याची सर्वांगीण प्रगती घडवली. त्यानंतरची गेली ११ वर्षे भारताचे पंतप्रधान म्हणून ते काम करत आहेत. ही सगळी कारकीर्द बघून लक्षात येते की, हा माणूस जातो त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यशच मिळवतो. निवडणुकीपुरते बोलायचे तर आज तरी भाजप हा एकमेव असा पक्ष आहे, जो एखादी सहकारी संस्थेची निवडणूक असली तरी लोकसभेची निवडणूक असल्यासारख्या ताकदीने आणि गांभीर्याने लढतो. हरणे-जिंकणे हा एक भाग झाला, मात्र ही तयारी महत्त्वाची असते. उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या ताज्या निवडणुकीमध्ये विरोधकांची काही मते बाद झाल्याचे आपण पाहिले. हे गृहपाठ नीट नसल्याचेच दर्शवते. मात्र अशा त्रुटी दूर करण्यासाठी मतदारांकडून अभिरूप मतदान करवून घेणे, प्रशिक्षण देणे हा भाजपचा स्वभावच आहे. यातून पक्षाची शिस्त आणि गांभीर्य कळते. यामागे नरेंद्र मोदी यांचा आग्रह, मार्गदर्शन असल्याचेही दिसते. त्यांच्या एकूणच वागण्यामध्ये एक जादू पाहायला मिळते. त्यांचे व्यक्तिमत्त्व विलक्षण प्रभावी आहे. म्हणूनच यशामागे त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाचा किती वाटा आहे, याचा विचार खरे तर व्हायला हवा. तो वर्ल्ड इकॉनॉनिक फोरमचे संस्थापक प्रो. क्लॉस श्वाब यांनी केला.
प्रो. क्लॉस श्वाब हे गृहस्थ गेली ४५ वर्षे जगातील मान्यवर नेत्यांना भेटत असून त्यांचा अभ्यास करत आहेत. यातून हे लोक एवढे श्रेष्ठ नेते कसे होतात, या प्रश्नाचे उत्तर मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. याच हेतूने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्त्वाचाही अभ्यास केला आहे. एखादा नेता यशस्वी होण्यामागे काही गुण असतात, हे स्पष्ट करत ते म्हणतात, यशस्वी होण्यामागे संबंधित नेत्याकडे आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे संदर्भ जाणून घेत परस्परांना जोडण्याची सारासार बुद्धी असावी लागते. तशी ती असेल तर घेतलेले निर्णय फसण्याची, चुकण्याची शक्यता कमी असते. नरेंद्र मोदींकडे ती असल्याचे अनेक पुरावे देता येतील. त्यांच्यातील या गुणांमुळेच आज भारत प्रत्येक क्षेत्रात वेगळी उंची गाठत आहे. आर्थिक क्षेत्रात डिजिटल प्रशासनासारख्या नव्या आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी मोदींनी करून दाखवल्या आहेत.
सर्वसामान्यांना मार्ग दाखवण्यासाठी नेत्याकडे होकायंत्रासारखी क्षमता असायला हवी, हा दुसरा मुद्दा यांनी मांडला आहे. त्यांच्या मते, मूल्य आणि दृष्टीमधून एखाद्यामध्ये ही क्षमता येते. यातच ते भारतीय चिंतन परंपरेशी संबंधित असणारा आणखी एक पैलू दाखवून देतात. त्यांच्या मते, सत्त्व आणि चैतन्य व्यक्तीमधील मूल्यांना बळ देत असते आणि मोदींकडे ते आहे. यशस्वी होण्यासाठी नेत्याकडे खंबीरपणा आणि त्याच वेळी सहृदयता असण्याचा आणखी एक मुद्दा ते मांडतात, कारण हेदेखील यशाचे गमक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. खेरीज त्यांच्याकडे सगळ्यांशी समानतेने वागण्याचा आणि सतत नवनवीन शिकत राहण्याचा विचार असायला हवा, असे ते म्हणतात. मोदी इथेही कमी पडत नाहीत, कारण आज ७५ व्या वर्षीही कोणी त्यांना एखादा नवीन प्रयोग दाखवला, तर अगदी लहान मुलाच्या उत्सुकतेने संबंधितांचे म्हणणे ऐकून घेताना दिसतात. दुसरीकडे ते सहृदयी आहेत. अलीकडेच पूरस्थितीची पाहणी करण्यास गेले असताना त्यांचे भावुक होणे आपण पाहिले. तेव्हा एकीकडे हा नेता प्रशासनातील चुकीची गोष्ट कठोरतेने नाकारतो, चुकलेल्या लोकांना वठणीवर आणतो तर दुसरीकडे अतिशय संवेदनशील होत जनतेचे प्रश्न हाताळतो. वरिष्ठ, जुन्या, वडीलधाऱ्या नेत्यांसंदर्भातील त्यांच्या निर्णयातही हे दोन पैलू स्पष्ट दिसतात. वाढते वय बघता त्यांनी मुरली मनोहर जोशी, अडवाणी वा यांसारख्या नेत्यांंना बाजूला करण्यात ठामपणा आहे पण त्यांच्याविषयी असणारा वडिलकीचा आदर ही सहृदयता आहे.
मोदींकडे कमालीचा संयम आणि सहनशीलता आहे. लोक त्यांच्यावर चिखलफेक करतात, पण ते संयमाने वागतात. विरोधक आपल्या दिशेने भिरकावत असलेल्या दगडांचीच मी संरक्षक भत बनवतो, असे ते म्हणतात. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून काम करत असताना गेल्या २४-२५ वर्षांच्या कालखंडाचा विचार केला तर त्यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दांमध्ये आणि वाईट हेतूने झालेली टीका आपण पाहिली आहे. विदेशी माध्यमांनी वा नेत्यांनी असे करणे एक वेळ समजू शकते, पण मोदींवर टीका करणाऱ्यांपैकी अनेकजण आपल्याच देशातील आहेत. ‘मौत का सौदागर’पासून ‘चौकीदार चोर है’ म्हणत त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी विरोधकांनी सोडलेली नाही. इतकेच काय पण, त्यांच्या आईसंबंधी अनुद्गार काढण्याचेही त्यांनी सोडले नाही. मात्र इतक्या शिव्या शांतपणे सहन करून, एका अक्षरानेही प्रत्युत्तर न देता काम करत राहणारा मोदींसारखा नेता जगाच्या पाठीवर कुठे असेल असे वाटत नाही. असे धैर्य क्वचितच कोणामध्ये असू शकते. त्याचा थोडा भाग आपल्याला देवेंद्र फडणवीसांमध्ये दिसतो. पण ‘अरे’ला ‘कारे’ करण्याच्या माणसाच्या सहज प्रवृत्तीवरही मोदींनी विजय मिळवला आहे. विरोधकांनी न्यायालयाच्या चक्रात अडकवण्यासाठी त्यांच्यावर खोटे खटले भरले. पण मोदी त्यांना पुरुन उरले. त्यांच्यातील हे सगळेच गुण वाखाणण्याजोगे आहेत. अशा या नेत्याला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा.