संवाद : गुरुनाथ तेंडुलकर
आमच्या शाळेच्या क्रमिक पुस्तकात आम्हाला विंदा करंदीकरांची एक सुंदर कविता होती.
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे...
हिरव्या पिवळ्या माळावरूनी,
हिरवी पिवळी शाल घ्यावी
सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी
वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावेत
उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी
देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे
कुणाकुणाकडून काय काय घ्यावं? हे सांगताना विंदांनी या कवितेत काही रुपकं वापरली आहेत.
शालीसारख्या उपभोग्य वस्तूंपासून ते तुकोबारायांच्या माळेपर्यंत...
म्हणजेच आसक्तीपासून ते म्हणजेच विरक्तीपर्यंत...
या कवितेच्या शेवटच्या दोन ओळीत विंदा एक मोठा संदेश देताहेत. ‘फक्त घेऊ नकोस रे... द्यायला देखील शीक.’
पण आपण मात्र...
तसा नीट विचार केला तर निसर्गातला सगळ्यात परावलंबी प्राणी म्हणजे माणूस. इतर पशुपक्ष्यांची पिल्लं बघा... किती चटकन आपापल्या पायावर उभी राहतात. कोणत्याही पक्ष्यांच पिल्लू वर्ष सहा महिन्यांच्या आतच घरट्यातून बाहेर पडून स्वतःचा दाणा-पाणी स्वतः मिळवायला सुरुवात करतं. वाघ-सिंह-कोल्हा लांडगा... कोणत्याही जंगली प्राण्यांची पिल्लं वर्ष दीड वर्षांत स्वतंत्र शिकार करायला तयार होतात... मगरीची, माशाची पिल्लं लहानपणापासूनच पाण्यात पोहोतात.
पण मनुष्य प्राण्याच्या बाबतीत मात्र पहिली दोन-तीन वर्षं तर प्रत्येक मूल सर्वार्थाने आपल्या आईवडिलांवर अवलंबून असतं. समोर ठेवलेलं जेवणदेखील त्याला स्वतःच्या हातांनी नीट खायला जमत नाही.
स्वतःच्या पायांवर उभं राहून तोल सांभाळून नीट चालायला जमत नाही... पुढे शालेय शिक्षण आणि इतर व्यावसायिक गोष्टी शिकून स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं पोट भरायला साधारण अठरा-वीस वर्षं उलटतात. तोपर्यंत माणूस हा संपूर्ण परावलंबीच असतो. तो आजूबाजूच्या इतर माणसांकडून फक्त घेतच असतो. घेतच असतो...
आणि पुढे आयुष्यभर... आयुष्यभर स्वतःचं पोट भरण्यासाठी आणि इतर भौतिक प्रगती करताना देखील माणूस हा नेहमी घेतच असतो. आजूबाजूच्या माणसांकडून, पशुपक्ष्यांकडून निसर्गाकडून... इतर सर्व सजीवांचा विचार केला तर प्रत्येक घटक हा निसर्गाकडून काहीतरी घेतो आणि पुन्हा काहीतरी देतो. या देवाणघेवाणीतच निसर्गाचा समतोल राखला जातो.
झाडांचंच उदाहरण घेऊया... झाडं जमिनीतून क्षार घेतात. पाणी घेतात. इतर आवश्यक ते अन्नघटक घेतात. हवेतील कार्बन डायऑक्साइड घेऊन हवेला ऑक्सिजन देतात. पिकलेली पानं गळून पडतात आणि पुन्हा मातीत मिसळून मातीचा कस वाढवतात... त्याशिवाय फळं, फुलं देतात तो भाग आणखीनच वेगळा... फुलांमुळे सुगंधित होणारा परिसर ही झाडांनी निसर्गाला दिलेली ‘रिटर्न गिफ्ट’ असते.
जे झाडांच्या बाबतीत तीच गोष्ट निसर्गातील इतरही घटकांच्या बाबतीत. नदी वाहत वाहत समुद्राला मिळते. समुद्राचं पाणी सूर्याच्या उन्हाने वाफेत परिवर्तित होऊन पुन्हा पावसाच्या रुपाने धरतीवर बरसतं. त्यातून नद्या भरतात आणि पुन्हा समुद्राकडे झेपावतात...
कोणताही कृमी-कीटक, कोणताही पक्षी, कोणताही पशू... मग तो शाकाहारी असो किंवा मांसाहारी... निसर्गाकडून जेवढं घेतो तेवढंच पुन्हा परत करतो...याला अपवाद एकच. आपण माणूस..
माणूस हा फक्त आणि फक्त घेण्याचाच विचार करतो. आज आपण प्रगतीच्या नावाखाली निसर्गाला ज्या प्रकारे ओरबाडतोय त्याचा विचार केला तर आपण किती स्वार्थी आहोत हे उमगून स्वतःची स्वतःला लाज वाटेल.
आपल्याला वेगाने जाण्यासाठी रस्ते हवे होते. आपण झाडं तोडली. त्या झाडांवर वस्ती करणाऱ्या पक्ष्यांचा, इतर कृमीकीटकांचा विचार तरी केला का? आपल्याला राहायला घरं हवी होती. आपण जमीन खणली. डोंगर फोडले...
आपल्याला शेतीसाठी पाणी हवं होतं. आपण नद्या अडवल्या... त्यांचा नैसर्गिक प्रवाह आपल्याला हव्या त्या दिशेने वळवला.
आपल्याला केवळ आकाशातच नव्हे तर अवकाशातही भरारी मारायची होती. आपण ध्वनीच्या वेगाची विमाने बनवली. कृत्रीम उपग्रह बनवले. पृथ्वीच्या कक्षेबाहेर सोडले आणि वातावरणाच्या थराला खिंडारं पाडली... ओझोनचे थर उद्ध्वस्त केले. ही यादी खूप मोठी आहे... न संपणारी...
स्वतःला बुद्धिमान आणि शहाणा समजणारा माणूस हा वास्तविक जगात वागताना अत्यंत लोभी आणि स्वार्थीपणाने वागतो. निसर्गाच्या बाबतीत सोडाच पण अगदी आपापसात वागताना देखील आपण फक्त आणि फक्त स्वतःच्याच स्वार्थाचा विचार करतो. फक्त घेतो... फक्त घेतो... कधी गोड बोलून तर कधी रागावून... कधी फसवून तर कधी ओरबाडून...
फक्त घेतो... फक्त घेतो... आपल्याला फक्त घ्यायचं तेवढं ठाऊक असतं.
म्हणूनच तर... ‘जो देतो त्याला ‘देव’ समजायची कल्पना निर्माण झाली. इंग्रजीत सुद्धा ‘अ गिव्हर इज गॉड’ असं म्हणतात. ज्याच्याकडून आपल्याला काही मिळतं तो आपल्याला चांगला वाटतो आणि ज्याला काही द्यावं लागतं तो मात्र... वास्तविक निसर्गाचा समतोल हा देवाण-घेवाणीतच आहे. म्हणूनच तर विंदांसारखे ज्येष्ठ कवी म्हणतात की घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावेत.
घेणं ही माणसाची वृत्तीच आहे. पण त्या वृत्तीला थोडी मुरड घालून द्यायलाही शिकायला हवं नाही का? याच पार्श्वभूमीवर अलीकडेच वाचलेली एक गोष्ट सांगतो. जगन मेहता नावाचा एक कापड दुकानादार आपली लहानशी कार घेऊन नेहमी एका ठरावीक पेट्रोलपंपावर दररोज पेट्रोल भरायला जायचा. तिथे रवी नावाचा एक अठरा-वीस वर्षांचा मुलगा त्याच्या गाडीत पेट्रोल भरायचा. हा मुलगा दिवसा पेट्रोलपंपावर काम करायचा आणि रात्री कॉलेजमध्ये जाऊन शिकायचा. तरुण वय, डोळ्यांत भावूक स्वप्नं असलेल्या त्या तरुण रवीची आणि जगन मेहताची थोडीफार ओळख झाली होती. पेट्रोल भरून झाल्यानंतर रवी आवर्जून जगनला ‘हॅव अ नाईस डे सर.’ अशा शुभेच्छा द्यायचा.
एके दिवशी जगन आपल्या नेहमीच्या मारुती कारमधून न येता चक्क भल्याथोरल्या मर्सिडिझमधून पेट्रोलपंपावर आला. ती गाडी पाहून रवीचे डोळे विस्फारले. ‘व्हेरी नाईस कार सर... ग्रेट... अभिनंदन सर.’
जगन हसला आणि म्हणाला, रवी तुला माहीत आहे का? काल बिपिन वोरा नावाच्या माझ्या एका मित्राचा वाढदिवस होता. सगळेजण त्याला बिपिनभाई म्हणतात. हा बिपिन आणि मी आम्ही शाळेपासूनचचे मित्र. पुढेही एकाच कॉलेजात शिकलो. गेल्या पंचावन्न वर्षांची आमची मैत्री. बिपिन खूप मोठा उद्योगपती आहे. त्याचे देशात अनेक व्यवसाय आहेत. काल बिपिनचा ६० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याने मला आणि काही निवडक मित्रांना एक एक मर्सिडिझ गाडी गिफ्ट दिली.’
‘ओह ग्रेट सर... किती छान... तुमचे ते बिपिनभाई खरंच महान आहेत. त्यांना माझा नमस्कार सांगा. ‘रवी म्हणाला.
जगनने हसून मान डोलावली आणि रवीला विचारलं, ‘रवी, तुला देखील वाटत असेल ना, की आपल्यालाही माझ्या बिपिनसारखा असाच एखादा श्रीमंत आणि दिलदार मित्र असावा. आपल्याला मर्सिडिझ देणारा...?’
रवी एकाएकी गंभीर झाला आणि म्हणाला, नाही सर... मला बिपिनभाईंसारखा मित्र असावा असं नाही वाटत मला...’ बोलता बोलता रवीने खांदे उडवले.
मग...? जगनने आश्चर्याने विचारलं.
मला वाटतं की शिकून सवरून मी तुमच्या बिपिनभाईंसारखं खूप मोठं व्हावं आणि माझ्या सगळ्या मित्रांना गिफ्ट म्हणून एक एक मर्सिडिझ गाडी द्यावी. मला बिपिनभाईंसारखा मित्र नकोय. मला बिपिनभाईंसारखा मित्र बनायचंय...’ ‘घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत’ ते असे...