Saturday, September 13, 2025

कथा सोमकांत राजाची

कथा सोमकांत राजाची

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे

सर्व देवतांमध्ये प्रथम पूजेचा मान असणाऱ्या गणेशाच्या विविध वैशिष्ट्याचे वर्णन करणारे हे गणेश पुराण अत्यंत पुरातन आहे. गणेश पुराण हे १८ उपपुराणापैकी एक आहे. गणेश पुराणाचे दोन खंड असून १) उपासना खंड-या भागात गणेश भक्ती व उपासनेवर, पूजाविधी व व्रत यावर आधारित एकूण ९२ अध्याय आहेत.

२) क्रीडा खंड यात गणेशाच्या उत्पत्ती, विविध अवतार त्यांच्या लीला कथा. यावर आधारित १५५ अध्याय आहेत. गणेश पुराणात गणेशाला सर्वोच्च मानले आहे. गणेश पुराण प्रथम भगवान नारायणांनी नारदांना सांगितले. तसेच महादेवांनी पार्वती मातेला सांगितले. नंतर हेच पुराण ब्रह्मदेवांनी व्यासांना व व्यासांनी महर्षी भृगूंना सांगितले. भृगूंनी हे पुराण पुढे राजा सोमकांताला सांगितले. तेव्हापासून हे पुराण विविध रूपातील कथेद्वारे प्रचलित आहे.

सोमकांत नावाचा एक राजा होता. देवनगर त्याच्या राजधानीचे नाव होते. तो राजा वेद विद्या संपन्न, पराक्रमी व प्रजावत्सल होता. त्याच्या पत्नीचे नाव सुधर्मा. ती रूपवान, गुणसंपन्न व पतिव्रता होती. त्यांना हेमकांत नावाचा मुलगा होता. मुलगा सुद्धा गुणसंपन्न व प्रजाहितोपवादी होता. राजाच्या वृद्धापकाळात त्याला कुष्ठरोगाने ग्रासले. जेव्हा रोग दुर्धर अवस्थेत पोहोचला, तेव्हा त्याने मुलाला राज्यकारभार सोपवून स्वतःहून वानप्रस्थान स्वीकारला. पुत्र हेमाकांतने त्यांच्यासोबत सुबल व ज्ञानगम्य नावाचे दोन विश्वासू प्रधान दिले.

वनात‌ त्यांची भेट भृगू पुत्र च्यवन ऋषींशी झाली. च्यवन ऋषींनी त्यांना परिचय विचारल्यावर राजाने सर्व वृत्तांत कथन केला. च्यवन ऋषींनी त्यांना ऋषी भृगूंच्या आश्रमात नेले. राजाने भृगूंना आपल्याला दुःख मुक्त करण्याची विनंती केली. भृगूंनी तपोबलाच्या साह्याने राजाचे पूर्वजन्मीचे ज्ञान अवगत केले. ते राजास म्हणाले, राजन पूर्वजन्मी तू एका सधन वैश्याचा पुत्र होता. तुझे नाव कामद व पत्नीचे नाव कुटुंबीनी होते. ती सुशील होती. तुझे वागणे मात्र अनाचारी होते. जोपर्यंत तुझे माता-पिता जिवंत होते तोपर्यंत तुझे अनाचारी वागणे मर्यादित होते. मात्र माता-पिताच्या मृत्यूनंतर तु उच्छंगुल झालास. तू अत्याचारी झाला. तेव्हा राजाने तुला वनात हाकलून दिले. तेथे तू एका गरीब ब्राह्मणाची हत्या केली. त्याने तुला सहस्त्र कल्पापर्यंत नरकात पडण्याचा शाप दिला. अशा प्रकारे तू अनेक हत्या केल्या व पाप कर्म केले.

तुझ्या म्हातारपणामुळे तुला सर्वजण सोडून गेले. तू एका गणेशाच्या देवालयात गेला. काही पुण्यकर्मामुळे तू गणेशाची आराधना केली. त्यामुळे तुझा रोग कमी झाला. तू सर्वांची नजर चुकवून थोडे धन एकत्रित केले होते व ते लपवून ठेवले होते. तू तुझ्या लपवलेल्या धनातून एक गणेशाचे देवालय बांधून त्यांची उपासना केली. त्यामुळे तुझी अपकीर्ती जाऊन कीर्ती पसरली.

यथावकाश मरण पावल्यावर तुला यमापुढे उभे करण्यात आले. तुझे पाप व पुण्य दोन्ही असल्याने प्रथम काय भोगणार असे यमराजाने तुला विचारल्यावर प्रथम पुण्य भोगण्याची इच्छा असल्याचे सांगितले. त्यामुळे तुला राजपरिवारात जन्म मिळाला. पूर्वजन्मी केलेल्या गणेशाच्या उपासनेमुळे तुला सुंदर देह प्राप्त झाला.

राजाने भृगूंना आपल्याला पापातून मुक्ती देण्याची विनंती केली. तेव्हा भृगूंनी त्याला पापनाशक गणेश पुराणाचे श्रवण करण्यास सांगितले. राजाने आपणच मला गणेश पुराण कथन करावे अशी विनंती केली. त्याचा याचना स्वर ऐकून ऋषींना दया आली. त्यांनी आपल्या कमंडलूतून पाणी मंत्रवून राजावर प्रोक्षण केले. त्याबरोबर त्याच्या नाकातून एक लहान प्राणी बाहेर आला व पाहता पाहता त्याने विशाल रूप धारण केले. मुनींनी त्याला तू कोण असे विचारले असता आपण पाप असून मी कोठे राहू? म्हणून भृगूंना विचारणा केली.

भृगूंनी त्याला शेजारच्या आम्रवृक्षावर राहून आम्रपत्ती खाण्यास सांगितले. पापाने झाडास स्पर्श करताच झाड जळून गेले. आता त्याला राहायला व खायला काहीही नसल्याने तो अंतर्धान झाला. तेव्हा भृगूंनी राजाला या वृक्षाला पुन्हा पालवी फुटेपर्यंत तू गणेशाची आराधना करून माझ्याकडून गणेश पुराणाचे श्रवण कर असे सांगितले. राजाने भृगूंच्या आज्ञेने गणेशाची पूजन करून गणेश पुराणाचे श्रवण केले. त्यामुळे तो रोगमुक्त झाला.

कलियुगात वाढत्या पापनाशाचे साधन म्हणून वेद व्यासांनी भृगूंना या गणेश पुराणाचे महत्त्व कथन केले होते, गणेश भक्तांनी हे गणेश पुराण ऐकणे आवश्यक असल्याचेही गणेश पुराणात सांगितले आहे.

Comments
Add Comment