वाचन गुरू

“काय रे अजय, सध्या पुस्तक वाचन अगदी जोरात सुरू आहे तुझं. हा एवढा बदल अचानक कसा काय घडलाय!” तसा अजय म्हणाला, “काही नाही गं आई, मला एक गुरू भेटला. सात-आठ वर्षांचा. त्यानेच सांगितलं, माणसाच्या आयुष्यात वाचन किती महत्त्वाचं आहे ते!”


सकाळी सकाळीच अजयचं आईशी भांडण झालं. “लवकर ऊठ, अभ्यास कर, शाळेत जायचंय” आईची अजयजवळ सारखी भुणभुण चालली होती. अजयला शाळेचा खूपच कंटाळा, त्यात आईची सारखी भुणभुण. मग अजयचा पारा एकदम चढला. “जा, आता मी शाळेतच जाणार नाही,” असं म्हणून तो घरातून बाहेर पडला. पण आईने त्याला हाताला धरून परत घरात आणलं. त्या भांडणात दोन तास कसे गेले हेच कळले नाही. मग शाळेची वेळ झाली. आईची कटकट ऐकायला नको, म्हणून मोठ्या घुश्यातच पाठीवर दप्तर अडकवून अजय घराच्या बाहेर पडला.


सकाळचे ११ वाजले होते. तो शाळेच्या दिशेने निघाला खरा, पण आज त्याला शाळेत जायचंच नव्हतं. पाय शाळेच्या दिशेने चालत होते आणि मनात मात्र वेगळेच विचार होते. चालता चालता त्याला एक छोटेसं दुकान दिसलं. दुकान कसलं टपरीचं म्हणा हवं तर! गोळ्या, बिस्किटांच्या काचेच्या बरण्या ओळीने मांडून ठेवल्या होत्या. एखादं चॉकलेट घेऊ या विचाराने अजय जवळ गेला. पण दुकानात तर त्याला कोणीच दिसेना. म्हणून त्याने टाचा उंचावून पाहिले तर एक छोटा मुलगा आत बसला होता. तो कुठलं तरी पुस्तक वाचत होता. अजयला आश्चर्य वाटलं. हा सात-आठ वर्षांचा मुलगा दुकानावर बसलाय गोळ्या-बिस्किटे विकायला आणि हातात पुस्तक घेऊन वाचन करतोय.


अजय पुढे झाला अन् म्हणाला, “अरे मुला चॉकलेट केवढ्याला आहे हे!” “पाच रुपये दादा, देऊ का?” मुलगा उत्साहाने म्हणाला. अजयने लगेच खिशातून पाच रुपये काढले आणि चॉकलेट घेतले. तो समोर बसलेला मुलगा चुणचुणीत होता.


अंगावर साधेच कपडे त्याने घातले होते. तो अगदी मन लावून पुस्तक वाचत होता. अजय मोठ्या कुतूहलाने म्हणाला, “काय रे, नाव काय तुझं?” “अभिमन्यू”. मुलाने नाव सांगताच अजय चमकला! “काय अभिमन्यू!” असं काही भारदस्त नाव याचं असेल असं अजयला अजिबात वाटलं नव्हतं. अजयने स्वतःला सावरलं आणि म्हणाला, “काय वाचतोस?” “महात्मा गांधींचं पुस्तक आहे. दादा मला गांधीजी खूप आवडतात. मी त्यांची भरपूर पुस्तकं वाचलीत. बोलताना मुलाचा चेहरा आत्मविश्वासाने उजळून निघाला होता.” अजय पुन्हा म्हणाला, “कोणत्या शाळेत जातोस?” “नाही दादा, मी नाही जात शाळेत. शाळेत गेलो तर मग हे दुकान कोण सांभाळणार?” आता मात्र अजयवर वेड लागायची पाळी आली. हा मुलगा शाळेतही जात नाही आणि तरीही गांधीजी वाचतो आणि मी ‘मोहनदास करमचंद गांधी’ या नावाव्यतिरिक्त त्यांचं अजून काहीच वाचलं नाही!
अजयचं मन तुलना करू लागलं. तो मुलगा आणि मी! मी चांगल्या कुटुंबातला. छान अशा घरात राहणारा. मोठ्या शाळेत जाणारा. शाळेत जायचं आणि अभ्यास करायचा याशिवाय कोणतंच काम मला नसतं. तरीही मला शाळेत जायचा कंटाळा. अभ्यासाचा कंटाळा. अभ्यासाची पुस्तकं सोडून एकही गोष्टीचं पुस्तक मी कधी वाचलं नाही. अभ्यासावरून रोज आईशी भांडण. अजयला त्या मुलाचा हेवा वाटला आणि स्वतःची लाज वाटू लागली. आता तो भानावर आला. अजून एक चॉकलेट त्यानं विकत घेतलं आणि ते परत त्या मुलाला देत म्हणाला, “अरे अभिमन्यू हे घे चॉकलेट. माझ्याकडून तुला भेट!” “नको दादा, कशाला पाच रुपये फुकट घालवता.” तो मुलगा म्हणाला. तसा अजय म्हणाला, “फुकट नाही घालवत. तुझ्यासारख्या गुणी मुलाचं मी कौतुक करतोय. मग कौतुक झाल्यावर खाऊ नको का द्यायला!’’ मुलाने पुस्तक बंद केले. तेव्हा अजयला समजलं की ते पुस्तक होते महात्मा गांधींचे “माझी आत्मकथा!”


मग अजय मुलाचा निरोप घेऊन थेट शाळेच्या दिशेने चालू लागला. मनात विचारांची गर्दी झाली होती. आपण काय करतोय याचं त्याला भान आलं होतं. आता अजयच्या मनातला शाळेचा कंटाळा कुठल्या कुठे पळून गेला. वर्गात अगदी शहाण्या मुलासारखा बसला. संध्याकाळी घरी येताना शाळेच्या ग्रंथालयातले “राजा शिवछत्रपती” हे पुस्तक घेऊन आला आणि तहान भूक विसरून झपाटल्यासारखा वाचू लागला. दोन-तीन दिवस उलटून गेले. आई-बाबांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. आपला अजय पुस्तक वाचनात एवढा कसा काय गुंतलाय. याचं आई-बाबांना आश्चर्यच वाटत होतं. मग एक दिवस आईनेच विचारलं, “काय रे अजय, सध्या पुस्तक वाचन अगदी जोरात सुरू आहे तुझं. हा एवढा बदल अचानक कसा काय घडलाय!” तसा अजय म्हणाला, “काही नाही गं आई, मला एक गुरू भेटला. सात-आठ वर्षांचा. त्यानेच सांगितलं, माणसाच्या आयुष्यात वाचन किती महत्त्वाचं आहे ते!”

Comments
Add Comment

चमक

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ दिवाळीमध्ये घरी भेटायला आलेल्या एका जवळच्या कुटुंबीयांनी अतिशय सुंदर रंगीत

परिवर्तन

कथा : रमेश तांबे “अरे विनू फटाके फोडताना जरा जपून” आईने घरातूनच आवाज दिला. पण उत्साही विनूपर्यंत तो आवाज पोहोचलाच

परिश्रमाशिवाय कीर्ती नाही

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मनुष्याला जीवनात यश, मान-सन्मान आणि कीर्ती हवी असते. पण ही कीर्ती केवळ

हवेचे रेणू

कथा : प्रा. देवबा पाटील सीता व नीता ह्या दोन्ही बहिणींना वाचनाची अतिशय आवड होती. त्यांचे आई-बाबा दरमहा

मनाची श्रीमंती!

कथा : रमेश तांबे दिवाळी नुकतीच संपली होती. दिवाळीचे चार-पाच दिवस कसे संपले हे नमिताला कळलेच नव्हते. दिवाळी येणार

पारदर्शक पदार्थ

कथा : प्रा. देवबा पाटील सीता व निता या दोघी बहिणींना जशी अभ्यासाची गोडी होती तशीच वाचनाचीसुद्धा आवड होती. त्या सतत