
मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या एका व्यक्तीला चिरडून पुढे गेली. अपघातात फुटपाथवर झोपलेली व्यक्ती जखमी झाली. या व्यक्तीवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घाटकोपर पोलिसांनी कार चालवत असलेल्या ३० वर्षांच्या भाविका दामाला तिच्या मैत्रीणीसह ताब्यात घेतले आहे. अपघातानंतर भाविकाचा मित्र पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर पूर्वेकडील भानुशाली वाडी येथे राहणारी भाविका ही गरबा नृत्याचे वर्ग घेते. सकाळी ती मैत्रीण कोरम आणि मित्र अनिकेत बनसोडे यांच्यासोबत पूर्वेकडून पश्चिमेला कारने आली. घाटकोपर पश्चिमेला असल्फा व्हिलेजच्या दिशेने जात असताना एलबीएस मार्गावरील महापालिकेच्या पाणी खाते कार्यालयाजवळ तिचे कारवरील नियंत्रण सुटले. दुभाजकाचा कठडा तोडत कार फुटपाथवर गेली. तिथे छोटेखानी दुकानाच्या बाजूस झोपलेल्या एका व्यक्तीच्या अंगावरून गेली. जखमी व्यक्ती बोलू शकत नाही, यामुळे ओळख पटविण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे.
अपघात प्रकरणी पोलिसांनी भाविका आणि कोरमला ताब्यात घेतले आहे. पोलीस अनिकेत बनसोडेचा शोध घेत आहेत. भाविकाच्या घरी दारू पार्टी केल्यानंतर भाविका, कोरम आणि अनिकेत हे तिघे कारने निघाले. भाविका कोरमला आणि अनिकेतला घरी सोडून नंतर स्वतःच्या घरी जाणार होती. पण दारूच्या नशेत भाविकाने ब्रेकऐवजी एक्सीलेटर दाबला यामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
पोलिसांनी भाविका आणि कोरमच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. भाविका विरोधात दारूच्या नशेत निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या ताब्यात आहे. दुकानं बंद होती त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले.