बरोबर १०३ वर्षांपूर्वींची इम्तियाज अली ताज यांची एक कादंबरी सिनेदिग्दर्शक के. आसिफ यांना इतकी आवडली की त्यांनी त्यावर सिनेमा काढायचे ठरवले. कादंबरीचे नाव होते ‘अनारकली’ आणि चित्रपटाचे नाव ‘मुगल-ए-आजम’! सिनेसृष्टीच्या इतिहासात अतिशय महत्त्वाचे स्थान पटकावणाऱ्या या सिनेमाचे नायक होते युसूफ खान ऊर्फ ‘दिलीपकुमार’, अप्सरावजा नायिका होती मुमताज जहाँ बेगम दहेलवी, ऊर्फ ‘मधुबाला’. सोबत पृथ्वीराज कपूर, हमीद अली खान ऊर्फ ‘अजित’ आणि दुर्गा खोटे यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर होते निगार सुलताना, जॉनीवॉकर, जलाल आगा, तब्बसुम, विजयलक्ष्मी, एस. नझीर, मुराद, जिल्लोबाई आणि गोपीकृष्ण.
कथानक होते बादशहा अकबराचा मुलगा जहांगीरच्या, एका दासीबरोबरच्या घडलेल्या प्रेमकथेची शोकांतिका. ‘मुगले आझम’च्या राजेशाही संवादांचे लेखक होते-कमाल अमरोही, वजाहत मिर्झा, एहसान रिझवी आणि अभिनेत्री झीनतचे वडील अमानुल्ला खान.
एका दासीच्या अपूर्व सौंदर्यामुळे अकबराचा मुलगा जहांगीर तिच्या प्रेमात पडतो. त्यामुळे पितापुत्रात वितुष्ट येऊन प्रकरण युद्धापर्यंत जाते. ‘महान’ म्हणून गौरवलेल्या अकबराला राजपुत्राचे दासीवरचे प्रेम मान्य नसते. शेवटी दिलीपकुमारला कैदेत टाकून मधुबालाला देहदंडाची शिक्षा होते. या कथेवर १९२८ पासून अनेक सिनेमे निघाले. के. आसिफ यांच्या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तो भव्यदिव्य स्तरावर काढून त्याला अतिशय रंजक केले. संवाद खूप वरच्या साहित्यिक पातळीवरचे होते. अत्याचारी सम्राट आणि अगतिक अनारकलीमधले संवाद तर कोणत्याही संवेदनशील मनाला अस्वस्थ करून टाकतात. सिनेमाच्या यशामागचे अजून एक कारण होते नौशाद यांनी संगीतासाठी वापरलेली रागदारी!
आठव्या राष्ट्रीय पारितोषिक समारंभात के. आसिफ यांना सर्वोत्कृष्ट सिनेमा आणि दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. सर्वोत्कृष्ट संगीतासाठी नौशाद यांचे, सर्वोत्तम अभिनेत्रीसाठी मधुबालाचे, गीतकारासाठी शकील बदायुनी यांचे आणि सर्वोत्तम गायिकेसाठी लतादीदींचे नामांकन प्राप्त झाले होते. आर. डी. माथुर यांना सर्वोत्तम छायांकनाचे व संवादलेखनाचे पारितोषिक चारही लेखकांना म्हणजे-कमाल अमरोही, वजाहत मिर्झा, एहसान रिझवी आणि झीनत अमानचे वडील अमान्नुला खान ऊर्फ ‘अमान’ यांना मिळाले.
‘मुघले - आझम’मधील गाणी म्हणजे जणू अकबराच्या खजिन्यातली १२ रत्नेच होती. त्यात शकील बदायुनी यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘प्यार किया तो डरना क्या?’ने अनेक पिढ्यातील अगणित प्रेमवीरांना बळ दिले! चित्रीकरणात अनारकली आयुष्यातले शेवटचे नृत्य सादर करताना, सलीमच्या जवळचा खंजीर काढून तो अकबराच्या समोर नम्रपणे ‘पेश’ करते आणि नुसत्या हावभावाने स्वत:ला ठार करण्याचा प्रस्ताव ठेवते ते पाहून कुणाचेही अंत:करण हेलावून जात असे.
‘मुहब्बतकी झुठी कहानीपे रोये’, ‘बेबसपे करम किजीये सरकारे मदिना’, ‘जिंदाबाद, जिंदाबाद, ए मुहब्बत जिंदाबाद’, स्वत: बडे गुलाम खान यांनी गायलेले ‘प्रेमजोगन बनके...’, लतादीदींच्या आवाजातले ‘हमे काश तुमसे मुहब्बत ना होती, कहानी हमारी हकीकत ना होती’, ‘मोहे पनघटपे नंदलाल छेड गयो रे’ ही गाणी अप्रतिम आहेत. गाण्यात नौशाद यांनी शुद्ध भारतीय रागदारीचा वापर केल्याने प्रेक्षकांना थेट ऐतिहासिक काळात गेल्याचा हिप्नॉटिक अनुभव येई!
सलीमने अनारकलीकडे प्रेमाची कबुली दिल्यापासून ती हरखून जाते, चिंतेतही पडते. तिला काहीच सुचत नाही. त्याचवेळी सलीमची पत्नी होण्याचे स्वप्न पाहणारी दुसरी दासी ‘बहार’ तिला एका जुगलबंदीसाठी आमंत्रित करते. तेव्हाचे गाणे या सिनेमातील सुंदर कव्वाली होती. जणू अनारकली आणि तिची स्पर्धक बहार, सलीमला वश करण्यासाठी एकेक अदा सादर करतात. कव्वालीतून बहार म्हणते, ‘महाराज, तुमच्या अंगणात मलाही माझे नशीब आजमावयाचे आहे’. लगेच अनारकली म्हणते, ‘क्षणभर का होईना, तुझ्याजवळ येऊन मलाही तुझ्या चरणांशी शिर झुकवून तुझे प्रेम जिंकायचे आहे.’
‘तेरी महफिलमें किस्मत आजमाकर हम भी देखेंगे,
घड़ीभरको तेरे नजदीक आकर हम भी देखेंगे,
अजी हाँ हम भी देखेंगे.’
‘तेरे कदमों पे सर अपना झुकाकर हम भी देखेंगे,
हम भी देखेंगे.’
आजच तर त्याच्या प्रेमाचा प्रस्ताव आल्यामुळे जीवनाचा वसंत ऋतू सुरू झालाय. कितीतरी वर्षांनी स्वप्नाच्या कळ्या उमलू लागल्यात. आता दु:खाचे कारणच काय? त्यापासून दोन हात दूरच राहिलेले बरे !
‘बहारें आज पैगाम-ए-मोहब्बत लेके आई हैं,
बड़ी मुद्दतमें उम्मीदोंकी कलियां मुस्कुराई हैं,
गम-ए-दिलसे जरा दामन बचाकर हम भी देखेंगे. अजी हाँ...’
...आणि हो, आयुष्यात प्रेम आणि त्यातून आलेली हुरहूर, धडधड नसेल तर मजाच काय? नुसतेच अश्रू गळण्यात काय अर्थ, उलट प्रेमात सांडलेले रक्तसुद्धा आनंद देणारे असते! आता मीही प्रेमाच्या गोड वेदनेचा अनुभव घेईन. चार अश्रू ढाळून बघेनच!
‘अगर दिल गमसे खाली हो तो जीनेका मजा क्या है,
ना हो खून-ए-जिगर तो अश्क पीनेका मजा क्या है?
मोहब्बतमें जरा आँसू बहाकर हम भी देखेंगे,
अजी हाँ...’
यावर शमशाद बेगमच्या अनुनासिक आवाजात बहार अनारकलीला हिणवताना म्हणते, ‘प्रेम करणाऱ्यांचा शेवट सारखाच असतो. आयुष्यभर झुरत राहावे लागते, मनाची तडफड आणि आपल्याच भावनांच्या कल्लोळात गुदमरून मरणे! तुझ्या बाबतीतही कधीतरी हेच होणार आणि मी ते दृश्य हसतहसत पाहणार!
‘मोहब्बत करनेवालोंका है बस इतनाही अफसाना,
तड़पना, चुपके-चुपके आहें भरना, घुटके मर जाना. किसी दिन ये तमाशा मुस्कुराकर हम भी देखेंगे, तेरी महफिलमें किस्मत...’
या गीतात अनारकलीच्या मुखातून नियती जणू तिचे भविष्यच सांगते. अनारकली म्हणते ‘प्रेमात आयुष्य बरबाद होते ना? मान्य! पण बिघडले कुठे? नामोनिशाण न ठेवता या जगातून जाण्यापेक्षा ज्यांनी प्रेमासाठी बलिदान दिले त्यांचे नाव अजरामर होते. मीही एक दिवस माझ्या जिवलगाच्या प्रेमात आकंठ बुडून सगळे जग उधळूनच देईन.
‘मोहब्बत हमने माना जिन्दगी बरबाद करती है,
ये क्या कम है के मर जानेसे दुनिया याद करती है.
किसीके इश्क में दुनिया लुटाकर हम भी देखेंगे,
तेरी महफिल में किस्मत...’
जुन्या काळाच्या सिनेमात असे विश्वामित्र ऋषींसारखे ‘प्रतिसृष्टी’ उभी करणारे कितीतरी लेखक, दिग्दर्शक, संवादलेखक, कला दिग्दर्शक, अभिनेते गीतकार, संगीतकार आपण पाहिले आहेत. गडद अंधार केलेल्या दालनात ३ तास बसून आपणही त्या सृष्टीत जाऊन आलो आहोत. ‘पुन्हा असे विश्वामित्र कधीतरी निर्माण होतील का?’ हा विचार जुनी प्रत्येक सुंदर कलाकृती पाहिल्यावर अस्वथ करत राहतो!