Sunday, September 14, 2025

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट दिनांक १२ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत २ कोटींची कमाई केली. कोकण संस्कृती आणि लोककलेवर आधारित असलेल्या या चित्रपटात दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका आहे. दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या बाबूली या व्यक्तिरेखेचे भरभरून कौतुक केले जात आहे. पण, यादरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

दशावतार चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, सुबोध खानोलकर यांना एक प्रश्न विचारला गेला होता. ज्यात दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या 'बाबुली' या भूमिकेसाठी रजनीकांतचाही विचार झाला होता का? असे त्यांना विचारण्यात आले होते.  या प्रश्नावर सुबोध खानोलकर हसून म्हणाले, “ते रजनीकांतपेक्षा कमी आहेत का? रजनीकांत यांचा विचार वगैरे आम्ही कधीच केला नव्हता.”

बाबूली या भूमिकेसाठी दिलीप प्रभावळकर यांनी नकार दिला असता तर... 

सुबोध खानोलकर यांनी सांगितले की, “कथा वाचल्यानंतर सगळ्यांच्याच लक्षात आलं की 'बाबुली'ची भूमिका खूप कठीण आहे. माझ्या डोळ्यासमोर फक्त दिलीप प्रभावळकरांचंच नाव होतं. आमची ओळखही नव्हती. मी नंबर मिळवून त्यांना भेटायला येऊ का असं विचारलं.” दिलीप प्रभावळकर हे असे कलाकार आहेत की, जे संपूर्ण स्क्रिप्ट हातात असल्याशिवाय आणि त्यातले बारकावे माहीत असल्याशिवाय होकार देत नाहीत. सुबोध पुढे सांगतात की, “माझ्याकडे फक्त कथाच होती, ती मी त्यांना ऐकवली. आमची अर्ध्या तासाची मीटिंग साडेतीन-चार तास चालली. तेव्हा माझ्या आशा वाढल्या. मी हे ठरवलं होतं की, जर 'दशावतार'ला दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता, तर ही कथा मी गुंडाळून ठेवली असती. कारण, ही भूमिका इतर कोणीही सादर करू शकत नाही, हे आधीच ठरलं होतं.”

ते म्हणाले, “कथेची गरज अशी होती की यातला 'बाबुली मिस्त्री'चा रोल हा एका वृद्ध दशावतारी कलाकाराचा आहे. या भूमिकेत अभिनेता, पात्र आणि लूकचे प्रचंड व्हेरिएशन्स आहेत. ही भूमिका तशी कठीण होती. हे सगळं प्रभावीपणे करू शकेल आणि त्याकरता लागणारा स्वभाव, गंभीरता असणारं दिलीप प्रभावळकर सर सोडून दुसरं कुणीच डोक्यात नव्हतं.” म्हणूनच त्यांनी पटकथा लिहायच्या आधीच दिलीप प्रभावळकरांकडून होकार मिळवला होता.

सुबोध खानोलकर यांनी 'हापूस' आणि 'संदूक' नंतर 'दशावतार' हा कोकणातील पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट लिहिला आहे. कोकणातील जीवन, लोककला आणि परंपरेशी निगडित महत्त्वाच्या सामाजिक मुद्द्यांना हात घालत मराठीच्या मोठ्या पडद्यावर त्यांनी 'दशावतार' जीवंत केला आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्यासह महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर यांची देखील भूमिका आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत आहे.

 
Comments
Add Comment