प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
एक गमतीशीर गोष्ट सांगते. उकळत्या पाण्यामध्ये बेडकाला टाकल्यावर तो क्षणात बाहेर उडी मारून आपला जीव वाचवतो. कारण त्याला लक्षात येते की, हे उकळते पाणी माझा जीव घेऊ शकते. मग त्याच बेडकाला घेऊन जर दुसरा प्रयोग केला म्हणजे सर्वसाधारण कोमट असलेल्या पाण्यामध्ये या बेडकाला टाकले तर त्याला ते पाणी खूप छान ऊबदार वाटते आणि तो मस्त त्याच्यात डुंबत राहतो. ज्याला त्या बेडकाचे ‘आरामदायक क्षेत्र’ (comfort zone) असे म्हणू शकतो. एकदा त्याची ही अवस्था पाहिली की मग ज्या भांड्यात हा बेडूक डुंबत आहे त्या पाण्याचे तापमान हळूहळू वाढवत नेऊन ते व्यवस्थित उकळायच्या स्थितीत घेऊन गेलो तरी लक्षात येते की, हा बेडूक अजिबात हालचाल करत नाही. स्लो पोजिनिंगसारखं हळूहळू वाढत गेलेले तापमान त्याच्या लक्षात येत नाही किंवा तो तिथून हलायचा कंटाळा करतो, माहीत नाही. साहजिकच उकळत्या पाण्यात तो फार तग धरू शकत नाही आणि मरतो.
दुसरा, तिसरा, चौथा बेडूक घेऊन हा प्रयोग केला जातो तेव्हा प्रत्येक वेळेस असेच घडताना दिसून येते. मग काय असते हे आरामदायक क्षेत्र? याचा आपण बारीक विचार केला तर लक्षात येते की, याला आपण ‘परिचित मानसिक अवस्था’ असे म्हणू शकतो. त्या ऊबदार पाण्यात बेडकाला चिंता आणि ताण जाणवत नाही. सुरक्षित वाटते आणि काही काळ त्या ऊबदार पाण्यात राहिल्याने त्याला ते पाणी सवयीचेही वाटू शकते. आसपासची परिस्थिती बदलत आहे, हे तो बेडूक लक्षात घ्यायचे टाळत राहतो आणि त्यामुळेच तो मृत्युमुखी पडतो.
आता या बेडकाच्या अानुषंगाने आपण माणसांचा विचार करूया. माणसांनासुद्धा ‘परिचित मानसिक अवस्था’ आवडते. जर एखादा माणूस एखाद्या छोट्या चाळीमध्ये राहत असेल तर त्याला ती चाळ आपलीशी वाटते. ती चाळ सोडून त्याला एखाद्या टोलेगंज इमारतीत किंवा एखादा बंगल्यात राहायला जावेसे वाटत नाही. त्याच्याकडे पैसा असूनही तो तिथेच राहतो. एखादे घरही घेतो पण ते भाड्याने देतो आणि तो चाळीतच राहतो, अशी काही उदाहरणे मला माहीत आहेत, याचे कारण म्हणजे, ‘आरामदायक क्षेत्र.’ कदाचित घराच्या जवळ रेल्वे स्टेशन असू शकेल, मुलांचे शाळा- कॉलेज किंवा ऑफिस जवळ असू शकेल, एखादी भाजी मंडई असू शकेल किंवा त्यांच्या जवळचे नातेवाईक तिथे राहत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्या माणसाला ऑफिसमध्ये मोठी बढती मिळत असेल; परंतु त्यासाठी त्याला आपले राहते घर सोडून दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या देशात जाण्याची गरज असेल तर तो बढती नाकारतो असे अनेक उदाहरणांमध्ये आपण पाहतो; परंतु हे आरामदायी क्षेत्र म्हणजे कम्फर्ट झोनमुळे त्या व्यक्तीची प्रगती खुंटते. तो नवीन गोष्टी शिकू इच्छित नाही. नवीन आव्हाने स्वीकारत नाही. इंग्रजीमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे. -
As you move, You grow!
जसे तुम्ही आपल्या प्रगतीसाठी नवनवीन क्षेत्रे, नवनवीन ठिकाणे पादाक्रांत करता तसतसा तुमचा विकास, तुमची प्रगती होत जाते.
बारा गावचे पाणी प्यायलेला असा आपण ज्याला म्हणतो तो नक्कीच कुठेतरी जास्त व्यवहारज्ञानी असतो, जास्त सोशिक-समजूतदार असतो. माणसांच्या वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या खाण्यापिण्याची, राहणीमानाची अचानक बदललेल्या वातावरणाची, परिस्थितीची त्याने अनेक उदाहरणे पाहिलेली असतात, असे आपण सर्वसामान्यपणे मानतो.
आपल्यापैकी प्रत्येकालाच माहीत असलेली एक गोष्ट आहे जी लहानपणी आपण शाळेत किंवा आपल्या आई-वडिलांकडून ऐकलेली असते. ती गोष्ट अशी आहे. - एका बेडकाचे पिल्लू आपल्या डबक्यापासून उड्या मारत दूर जाते. ते पिल्लू एका बैलाला पाहते. आश्चर्यचकित होते. ते आपल्या डबक्यापर्यंत परतते आणि आपल्या आईला सांगते की, मी एक अवाढव्य मोठा असा प्राणी पाहिला. आई आपले पोट फुगवते आणि विचारते एवढा मोठा? पिल्लू ‘नाही’ म्हणते मग आई आणखी पोट फुगवते. पिल्लू ‘नाही’ म्हणते आणि मग आई जेव्हा आणखीन पोट फुगवते तेव्हा तिचे पोट फुटते आणि ती मरून जाते. आपल्याला या कथेचे तात्पर्यही माहीत आहे. बेडकाने कितीही पोट फुगवले तरी तो बैलाएवढा मोठा होऊ शकत नाही. तर याच बेडकाने जर स्वतःच्या डोळ्यांनी बैल पाहिलेला असता तर तो पोट फुगवायच्या भानगडीत पडला नसता!माणसाने जग अनुभवण्यासाठी आपली दृष्टी व्यापक केली पाहिजे. त्याचबरोबर या जगात आपल्यापेक्षा मोठ्या गोष्टी आहेत.
आपल्यापेक्षा ज्ञानी लोक आहेत, सद्गुणी लोक आहेत. आपल्यापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत लोक आहेत. आपण जितके जग न्याहाळत जातो तितके आपण सर्वच दृष्टीने लहान असल्याचे आपल्याला जाणवत राहते. आपल्या विषयीचा खोटा अभिमान गळून पडतो. आपण सामान्य होत जातो. अशा सामान्य माणसांतच इतरांना काही ‘असामान्य’ असल्याचे जाणवते!
म्हणूनच आपण थोडेसे आरामदायक क्षेत्र (comfort zone) सोडून बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. अज्ञात गोष्टींना जाणून घेऊन थोडेसे अधिक ज्ञानी बनण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे?