छडी वाजे छमछम

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू


मुलं लहान असतानाच शिस्त लावण्याची सुरुवात करायला हवी. पण मुलं लहान असताना त्यांच्यावरील प्रेमाने आपण ते टाळतो. कधीकधी अति कौतुक, लाड, दुर्लक्ष यामुळे मुलं शेफारतात आणि मोठी झाली की मग ऐकत नाहीत.


मुलांना शिस्त लावताना ‘छडी वाजे छमछम विद्या येई घमघम’ हे आपण लहानपणापासून शाळेत शिक्षकांकडून, घरी मोठ्या माणसांकडून ऐकलेही आहे आणि अनुभवलेही आहे. मात्र अलीकडच्या काळात शिक्षा करण्याबाबतची मतं अनुकूल नाहीत. याचं कारण नीट समजावून घेऊ या. आजकाल घराघरांत एक-दोन मुलं असल्याने तो ‘आँखो का तारा’ ती ‘पापा की परी’ असते. भरपूर लाड होतात. न मागता सारं अलगद झोळीत येऊन पडतं. अतिशय हळुवारपणे सारं जपलं जातं. पण जेव्हा मुलांच्या मनाविरुद्ध होतं, मागितलेलं मिळत नाही, थोडा धीर धर, स्क्रीनऐवजी अभ्यास कर, नीटनेटकी ठेव तुझी खोली, आळस सोड असं सांगितलं की मग मुलं बिथरतात आणि पालक शिक्षा करतात. प्रथम समजावून सांगणं, मग चिडणं, त्यानंतर ओरडणं आणि अखेरीस शारीरिक शिक्षा.


शारीरिक शिक्षा हा शेवटचा टप्पा थोडासा गोंधळात टाकणारा असतो. ‘मी बाबा आहे. माझं ऐकत नाही म्हणजे काय?’ असा इगो दुखावतो. आईची किंमत नाही मग ती वैतागून जाते. अशा मनस्थितीत केलेली शिक्षा ही शिस्त नाही तर तो एक प्रकारचा धाक लावणं ठरतं आणि धाकापोटी केलेली गोष्ट मुलं मनापासून करत नाहीत म्हणूनच शिस्त आणि शिक्षा यातील फरक समजून घ्यायला हवा.
१. शिक्षा म्हणजे मुलांवर नियंत्रण ठेवण्याचे साधन म्हणून वापरली जाते, तर शिस्त मुलांना शिकवण्यासाठी वापरली जाते.
२. शिक्षा ही नियम तोडण्याचे परिणाम म्हणून भोगायची असते. मुलांचं चुकीचं वागणं थांबावं यासाठी तिचा उपयोग केला जातो. मात्र शिक्षेचे साधन भीती, लाज आणि वेदना यांच्या मदतीने काम करतं.
३. शिक्षेमध्ये मुलांवर आरोप केला जातो, तर शिस्त मुलांची चांगली वाढ व्हावी या त्यांच्या भविष्याचा विचार करण्यासाठी असते.
४. शिस्त म्हणजेच ‘ डिसिप्लिन’. हा मूळ शब्द ‘डिसिपल’ अर्थात शिकणं यापासून आला आहे. शिस्त किंवा डिसिप्लिन यामध्ये मुलांनी चांगल्या गोष्टींची निवड करावी यासाठी मुलांना मार्गदर्शन केलं जातं.
५. शिक्षेचं उद्दिष्ट काय असतं तर शिक्षा केल्याने मुलाची प्रगती होण्याऐवजी भीती निर्माण होते आणि मुलं मागे खेचली जातात. ती मागे मागे राहतात. ‘तू चूक केली आहेस, तर आता भोग शिक्षा’ या वाक्यात लक्षात येतं की आपण मुलांना आरोपी ठरवतो. त्यांच्यावर कंट्रोल करतो.
६. याउलट शिस्त लावण्यामागचा हेतू मुलाला पुढे नेण्याचा असतो. ‘हे होत राहतं. धीर सोडू नकोस. पुन्हा प्रयत्न कर. थोडं वेगळ्या पद्धतीने करून पाहा. जमेल तुला. मदत लागली तर सांग.’ या वाक्यात मुलाचा आत्मविश्वास वाढवणं, त्याला धीर देणं आहे हे जाणवतं तसंच त्याची वाढ आणि कौशल्यांचा विकास यावर लक्ष केंद्रित केलं जातं.
७. मुलांवर शिक्षेचा परिणाम काय होताना दिसून येतो तर भीती, लाज, चुका लपवणं.
तर शिस्त-
मुलांना जबाबदारीची जाणीव देते. त्यांच्या गरजा मोठ्यांसमोर मांडण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देते’. शिस्तीत मुलांचं प्रतिबिंब दिसतं.
म्हणूनच शिक्षा आणि शिस्त यातील अंतर जाणून घेणं आवश्यक आहे. शिस्त लावण्याच्या नादात आपण मुलांवर सत्ता गाजवतोय, अतिरेकी शिक्षा करतोय का याचं भान ठेवायला हवं. कारण शिस्त आणि शिक्षा या दोघांचाही हेतू मुलांच्या वागण्याला योग्य आकार देणेच आहे. मात्र मुलांच्या वागण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यातून येणारे परिणाम मात्र निश्चितच निराळे आहेत.


शिस्तीने स्वनियंत्रण येतं. मुलांना गोष्टी समजून घेण्याबाबत शिकवलं जातं, मार्गदर्शन केलं जातं, तर शिक्षेचा रोख हा मुलांचं चुकलं तर त्यांना त्रास व्हायलाच हवा यावर असतो. शिस्तीतून सकारात्मक सवयी लागाव्या, दीर्घकाळासाठी वागण्यातील चांगले बदल व्हावे या बाबी जोपासल्या जातात, तर शिक्षा ही नकोशा वर्तनाला प्रतिबंध करणारी आणि त्यासाठी नकारात्मक परिणाम होतील यावर फोकस करते.


‘शिस्त’ ही कृतिशील शैक्षणिक दृष्टिकोन तयार करते तर ‘शिक्षा’ ही मुलांच्या चुकीच्या वागण्याला प्रतिक्रिया देते. शिक्षा आणि शिस्त या दोन्ही मुलांनी नियम पाळायलाच शिकवतात पण फक्त आपलं वागणं कसं सुधारावं हे एकच गोष्ट शिकवतं.


शिस्तीने मुलांना त्यांच्या भावनांवर, वागण्यावर नियंत्रण ठेवता येते. ते आयुष्यात येणाऱ्या पर्यायांची निवड जबाबदारीने करतात. हे त्यांच्या शैक्षणिक यशासाठी खूप महत्त्वाचे आणि उपयुक्त आहे. मुलांनी आपल्या मनातील भावनांवर नियंत्रण ठेवले तर ते त्यांच्या भावनांवर चांगलं लक्ष केंद्रित करू शकतात. आपण केलेल्या बऱ्यावाईट गोष्टींची जबाबदारी घेऊ शकतात. त्यांना हे कळावं की आपल्या वागण्याच्या काही सीमारेषा असायला हव्यातच. वाटेल तसं वागल्याने आपल्याला आणि इतरांनाही त्रास होऊ शकतो. सामाजिक ठिकाणी जगण्याचे, वागण्याचे काही नियम असतात याची जाणीव मुलांना देणे हे शिस्तीत अभिप्रेत असतं. शिक्षेतून निर्माण होणारी भीती देण्यापेक्षा शिस्तीतून शहाणपण निर्माण करण्याकडे आपला कल असू देऊ या!


शिस्त मुलांना प्रश्न सोडवण्यास मदत करते आणि शिक्षेने मुलांना जो प्रश्न आहे त्यामुळे त्रास होतो. आपलं काय चुकलं हे मुलांना कळताना भीतीचं हत्यार वापरण्यापेक्षा चुकलेली गोष्ट दुरुस्त कशी करावी हे शिकवणं हे पालकत्वात अभिप्रेत आहे. शिक्षा होते तेव्हा मूल नवं काही शिकणं पूर्णपणे थांबवतं आणि त्याचा भावनिक मेंदू या माणसापासून मला धोका आहे.


मी स्वतःला कसं वाचवू हाच विचार मूल करतं मग चुकीचं वागणं बदलण्याबाबतचा विचारच मागे पडतो. म्हणूनच शिक्षा केल्याने मुलं ऐकतात, सुधारतात पण भीतीपोटी त्याऐवजी स्वयंशिस्त बणवण्यासाठी लहानपणापासूनच मुलांना तयार केले तर’ छडीऐवजी शिस्त लावणं हे अधिक उपयोगाचं ठरेल.’

Comments
Add Comment

...म्हणून समाज मोदींना मानतो

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते देशाचे पंतप्रधान इतका मोठा आणि अविश्वसनीय प्रवास करणारे नरेंद्र मोदी

मराठी पत्रकारितेचे जनक - बाळशास्त्री जांभेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर आचार्य अत्रे यांनी कै. बाळशास्त्री जांभेकर यांना ‘राष्ट्रजागृतीचे अग्रदूत’ असे म्हटले

“...हम भी देखेंगे!”

बरोबर १०३ वर्षांपूर्वींची इम्तियाज अली ताज यांची एक कादंबरी सिनेदिग्दर्शक के. आसिफ यांना इतकी आवडली की त्यांनी

घेता घेता...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर आमच्या शाळेच्या क्रमिक पुस्तकात आम्हाला विंदा करंदीकरांची एक सुंदर कविता

कथा सोमकांत राजाची

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे सर्व देवतांमध्ये प्रथम पूजेचा मान असणाऱ्या गणेशाच्या विविध वैशिष्ट्याचे

बायकोच्या व्यवहारात नवऱ्याची फसवणूक

क्राइम : अॅड. रिया करंजकर नवरा-बायकोचं नातं म्हटलं की एक विश्वास असतो आणि त्या विश्वासावर ते नातं टिकून असतं. त्या