
क्राइम : अॅड. रिया करंजकर
नवरा-बायकोचं नातं म्हटलं की एक विश्वास असतो आणि त्या विश्वासावर ते नातं टिकून असतं. त्या विश्वासाला जर तडा गेला तर सर्व काही संपतं. सुरेश हा चांगल्या ठिकाणी नोकरी करत होता. त्याचं त्याच्या बायकोवर खूप प्रेम होतं. महिना झाल्यानंतर जो काही पगार यायचा. तो सर्व पगार तो आपल्या पत्नीला देत असे. कारण आपली पत्नी व्यवस्थित घर चालवते यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. त्याची पत्नी माया ही जेमतेम शिकलेली होती. आपल्या आई-वडिलांच्या घरी तिने एवढे पैसे कधीच पाहिले नव्हते.
सर्व मुलींच्या बाबतीत तेच असतं की लग्न झाल्यानंतरच व्यवहार हातात येत असतो. माया सुरेशची व्यवस्थित काळजी घेत होती. त्याला वेळेवर चांगल्या प्रकारे जेवण द्यायची. उशीर झाला तर कामावर डबा नेऊन दे अशाप्रकारे ती सुरेशची काळजी घेत होती. सुरेशलाही बरं वाटायचं की, आपली पत्नी आपल्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून खायला घालत आहे. यामुळे सुरेश आपल्या मित्रांनाही सांगत होता की माझ्या माया सारखं कोणी काही करू शकणार नाही. त्यामुळे प्रत्येकाला हेवा वाटावं असं ते जोडपं होतं. मुलं मोठी होत गेली तसे खर्चही वाढत गेले. वडील दिवसरात्र काम करायचे. रात्रपाळी करायचे. माया नवऱ्याची जशी काळजी घेत होती तशी मुलांचीही ती घेत होती. पण जशी मुलं मोठी होत होती तसे त्यांचे खर्चही वाढायला लागले आणि मुलं आईकडे पैसे मागायला लागली. माया मुलांना पैसे लागतात, मुलांचे खर्च आहेत, ते मित्रांमध्ये वावरतात म्हणून मुलं मागतील तसे ती पैसे देऊ लागले. इथेच व्यवहार कुठेतरी चुकत असल्याचे मायाच्या लक्षात आले नाही. मुलांनी कधी सुरेशकडे पैसे मागितले नाहीत. कारण मुलांना माहीत होते की सगळा व्यवहार आईच बघते. माया जास्त शिकलेली नसल्यामुळे तिला शेवटच्या तारखेपर्यंत घरचा व्यवहार करताना तारेवरची कसरत जाणवू लागली. त्यावेळी ती आपल्या शेजारी असलेल्या महिलेकडून उसनवार पैसे घेऊ लागली तेही व्याजाने. हा सर्व व्यवहार ती करत असताना तो व्यवहार ती आपल्या पतीला बिलकुल सांगत नव्हती. बाईकडून मुलांसाठी ती व्याजाने पैसे घेऊ लागली पण आपण घेत असलेल्या पैशाला व्याज किती आहे हे तिला काहीच कळत नव्हतं. आपण तिच्याकडून पैसे घेतोय आणि नंतर देतोय एवढेच तिला समजत होतं. ते आपण वहीवर लिहून ठेवलं पाहिजे. त्याचा हिशोब ठेवला पाहिजे याची तिला जराही जाण नव्हती. मुलांची लग्न होण्याची वेळ आली त्यावेळीही तिने तोच प्रकार केला. पतीला काही माहीत नसल्यामुळे दिलेल्या पैशांमध्ये सर्वकाही घरखर्च भागवते आहे असं तिच्या पतीला वाटत असे. व्याजाची संख्या वाढत चालली होती. सुरेश रिटायरमेंटला येऊन पोहोचलेला होता आणि त्यावेळी ही सर्व गोष्ट त्याच्या कानावर ऐकायला आली. तीही दोन लाख रुपये आपल्याला कर्ज आहे बाजूंचं असं सांगण्यात आलं होतं. म्हणून त्याने आपल्या बायकोवर विश्वास ठेवून शेजारच्या व्यक्तीला थोडी फार रक्कम दिली. त्यावेळी सुरेशला वाटलं की, घेतलेलं कर्ज संपलं असेल.
सुरेश निवृत्त झाल्यानंतर त्यांची मुले दुसरीकडे राहायला गेली. त्यावेळी सुरेशला सर्व प्रकार समजला. सुरेश म्हणाला, माझ्या बायकोने पैसे कधी घेतले मला माहीत नाही. तुमचे दोन लाख रुपये होते त्याबद्दल मी चेक दिलेला आहे अशी त्यांच्यात वार्ता होऊ लागली. सुरेश निवृत्त झाल्यानंतर जे काय पैसे मिळाले होते ते तिन्ही मुलांनी वाटून घेतले होते. सुरेशला आता फक्त पेन्शनच येत होती. घराच्या बाजूला राहणाऱ्या बाईने चेकबॉन्स म्हणजेच वन थर्टी केस सुरेशविरुद्ध न्यायालयात केली. ज्यावेळी नोटीस घरी आली त्यावेळी आपल्यावर केस झाल्याचे सुरेशला समजलं. व्यवहार तर पत्नीने केला होता आणि अडकला होता मात्र सुरेश. या टेन्शनमुळे त्याची पत्नी माया ही आजारी पडू लागली आणि दोन-तीन महिन्यांच्या आतच तिचा मृत्यू झाला. सुरेश या केसमध्ये पूर्ण अडकला. मायाने शेजारच्या बाईसोबत झालेला व्यवहार कुठेच लिहून न ठेवल्यामुळे नेमका व्यवहार किती झाला, किती शिल्लक आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. त्याच्यामुळे शेजारच्या बाईने चेकवर दहा लाखांची रक्कम टाकली होती. याचेही टेन्शन आता सुरेशला आलं होतं. कारण आता द्यायला त्याच्याकडे पेन्शनशिवाय काहीच शिल्लक नव्हतं. पत्नीवर त्यांनी विश्वास ठेवला होता. महिन्याला कष्ट करून येणारा पगार तो आपल्या पत्नीच्या हातावर ठेवत होता. त्याला विश्वास होता की आपली पत्नी चांगल्याप्रकारे घराचा व्यवहार करेल पण हाच विश्वास त्याचा कुठेतरी खोटा ठरला. जिने व्यवहार केला ती आता या जगात नाही पण ज्याचा काही संबंध नव्हता तो मात्र कोर्टाच्या तारखांना जात होता. (सत्यघटनेवर आधारित)