
मुंबई : आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत आता अगदी जवळ आली आहे. करदात्यांसाठी १५ सप्टेंबर २०२५ ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली असून, अजूनही अनेकांनी आपला रिटर्न दाखल केलेला नाही. त्यामुळे उर्वरित दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर रिटर्न भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, लॉगिन ट्रॅफिक वाढणे, तांत्रिक अडचणी आणि पोर्टलवरील स्लो प्रोसेस यामुळे अनेकांना अडथळे येत आहेत. त्यामुळे करदात्यांमध्ये अंतिम मुदत वाढणार का, याविषयी उत्सुकता आणि संभ्रम निर्माण झाला आहे. अखेरच्या क्षणी मोठा दिलासा मिळावा, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. मात्र, सरकारकडून अंतिम मुदत वाढवली जाणार का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
मुदतवाढीची करदात्यांकडून मोठी मागणी
आर्थिक वर्ष २०२४-२५ (मूल्यांकन वर्ष २०२५-२६) साठी आयकर रिटर्न (ITR) दाखल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. दरवर्षी ही अंतिम तारीख ३१ जुलै असते. मात्र, यंदा सरकारने विशेष निर्णय घेत ही मुदत पहिल्यांदाच सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. आता ही वाढवलेली अंतिम मुदतही संपत आली असून, करदाते आणि सनदी लेखापाल (CA) यांनी पुन्हा एकदा सरकारसमोर मुदतवाढीची मागणी जोरदारपणे मांडली आहे. करदात्यांच्या म्हणण्यानुसार, ITR भरताना अनेकांना तांत्रिक अडचणी येत आहेत. पोर्टलवर लॉगिन स्लो होत आहे, प्रोसेसिंगसाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत आहे, तसेच रिफंड स्टेटस अपडेट करण्यातही विलंब होत असल्याचे तक्रारी आहेत. या अडचणींचा विचार करून अंतिम मुदत आणखी काही दिवस वाढवावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर पुढे येत असून, सरकार यावर कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोहित सोमण: जीएसटी कपात तसेच जीएसटी संरचनेत बदल झाला आता सेबीने काल झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आपल्या नियमावलीत परिवर्तनाला अंतिम मंजुरी दिली ...
गडबडीत ITR दाखल करण्याची भीती
आयकर रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत अगदी जवळ आली असताना, करदाते गडबडीत चुकीचा आयटीआर भरतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. चुकीचा रिटर्न भरल्यास भविष्यात नोटीस किंवा दंडाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा कर सल्लागार आणि तज्ज्ञांनी दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोर्टलवरील तांत्रिक अडचणी कायम राहिल्या आणि वेळ वाढवण्यात आली नाही तर करदात्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सरकारने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, आतापर्यंत केंद्र सरकारने अंतिम मुदत वाढविण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, तसे संकेतही दिलेले नाहीत. अशा परिस्थितीत, उर्वरित दोन दिवसांतच करदात्यांनी आयटीआर दाखल करून टाकणे हेच सुरक्षित ठरेल, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
करदात्यांसाठी योग्य ITR फॉर्म निवडणे आवश्यक
आयकर रिटर्न दाखल करताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे योग्य फॉर्मची निवड. कारण चुकीचा फॉर्म भरल्यास तुमचा रिटर्न स्वीकारला जाणार नाही आणि रिफंड प्रक्रियेलाही उशीर होऊ शकतो. आयकर विभागाकडून विविध करदात्यांसाठी वेगवेगळे फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये नोकरदार व्यक्तींसाठी प्रामुख्याने ITR-१ किंवा ITR-२ फॉर्म वापरले जातात. व्यवसायिक आणि स्वतंत्र व्यावसायिकांसाठी ITR-३ वा ITR-४ फॉर्म आहे. तर कंपन्या, एलएलपी (LLP) आणि विविध फर्म्ससाठी ITR-५, ITR-६ किंवा ITR-७ फॉर्म अनिवार्य करण्यात आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, चुकीचा फॉर्म निवडल्यास करदात्याला भविष्यात नोटीस मिळण्याची शक्यता असते. शिवाय, वेळेत आयटीआर दाखल न केल्यास उशिराचा दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपली श्रेणी ओळखून योग्य फॉर्म निवडणे आणि ठरलेल्या मुदतीत रिटर्न दाखल करणे अत्यावश्यक आहे.