
टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल
रेगे चित्रपटाने प्रसिद्धीस आलेला कलाकार म्हणजे आरोह वेलणकर. महापूर नावाचं नाटक तो करतोय. आरोह मूळचा पुण्याचा, पुण्यातील कर्नाटक हायस्कूलमध्ये त्याचे शालेय शिक्षण झाले. स्ट्रीटप्ले, मिमिक्री, एकपात्री प्रयोग त्याने शालेय जीवनात केले. पुण्यातील एमिटीमधून त्याने इंजिनीअरिंग केले. त्याने फिरोदिया स्पर्धेत भाग घेतला. त्याला बक्षिसं मिळाली ते कॉलेज त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरले. कॉलेजमध्ये असताना तो कला मंडळात होता. वेगवेगळ्या एकांकिकेमध्ये त्याने काम केले.
त्यानंतर त्याच्या जीवनात एक स्पेशल चित्रपट आला. त्या चित्रपटाचे नाव होते ‘रेगे’. अभिजित पानसे यांनी तो चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्या चित्रपटात तो मुख्य रेगेच्या भूमिकेत होता. तो चित्रपट हिट ठरला. झी गौरव, महाराष्ट्राचा फेवरेट कोण, फिल्मफेअर अॅवॉर्ड त्या चित्रपटाला मिळाले. वेगवेगळ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्या चित्रपटाला अॅवॉर्ड
मिळाले. या चित्रपटामुळे त्याला ओळख मिळाली. त्यानंतर कबीर खानचा ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटात त्याने अभिनेता कार्तिक आर्यनच्या मुलाचे काम केले होते. त्या चित्रपटाची चर्चादेखील खूप झाली. या चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान, अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या सोबत काम करताना त्याला खूप मजा आली. हिंदी चित्रपटात काम करताना त्याचे बजेट मोठे असते. त्यानुसार त्या चित्रपटाची ट्रीटमेंट जाणवल्याचे त्याने सांगितले. यानंतर महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वीर दौडले सात’ या चित्रपटात तो दिसणार आहे. प्रतापराव गुर्जर सोबत जे सात वीर मराठे गेले होते, त्या सातपैकी तो एक आहे. लवकरच तो चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
‘महापूर’ या नाटकात तो आहे. ५० वर्षांपूर्वीचे हे नाटक ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी लिहिले होते. आता तेच नाटक नवीन कलाकारांच्या संचात आले आहे. पूर्वी मोहन गोखले यांनी साकारलेली भूमिका आता आरोह वेलणकर करीत आहे. प्रेमभंग, शिक्षणाची बेताची गती, आळस आणि गुंतागुंतीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे मानसिक तोल ढळलेल्या तरुणाच्या अवस्थेचे संवेदनशील चित्रण आहे. वर्षभरात लेखक-दिग्दर्शक सतीश आळेकरांचं एक नाटक करावे असा विचार त्याच्या मनामध्ये आला होता. स्वतःसाठी काही तरी करावे व एक अजरामर नाटक करावे असा हेतू त्याचा होता व ही नाटकं करण्याचे त्याने निश्चित केले. या नाटकाबद्दल व भूमिकेबद्दल विचारले असता तो म्हणाला की, ही भूमिका खूप आव्हानात्मक होती. सलगपणे नव्वद मिनिटे मी रंगमंचावर असतो. ज्या प्रेक्षकांनी हे नाटक अगोदर पाहिले आहे, त्यांना ही नाटकं व माझी भूमिका आवडली आहे. ऋषी मनोहर यांनी हे नाटक दिग्दर्शित केलं आहे. काही प्रेक्षक तर म्हणाले की, आज हे नाटक पाहिल्यावर आम्हाला कळले की, या नाटकाला महापूर का म्हणतात. या नाटकाचे लेखक सतीश आळेकरांचं हे नाटक सर्वसामान्य प्रेक्षकांना कळायला लागले आहे. प्रेक्षकांना नाटक व आम्हा कलाकाराच काम आवडल आहे. प्रेक्षकांचा खूप सकारात्मक प्रतिसाद या नाटकाला मिळतोय. प्रायोगिक व व्यायसायिक नाटकाचा सुवर्णमध्य या नाटकात साधलेला आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे नाटक अधिकाधिक पोहोचविण्याचा त्याचा प्रयत्न आहे. आरोहला त्याच्या भविष्यातील वाटचालीसाठी व या नाटकासाठी हार्दिक शुभेच्छा!