
मिझोरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सध्या दोन दिवसांच्या ईशान्य भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील सर्वात महत्त्वाची घटना मिझोरम राज्यात पार पडली. मात्र, खराब हवामानामुळे त्यांना थेट कार्यक्रमस्थळी जाता आले नाही. परिणामी, मिझोरमची राजधानी आयझॉल येथील विमानतळावरूनच त्यांनी तब्बल ९,००० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. या प्रकल्पांमध्ये रेल्वे, पायाभूत सुविधा आणि विकासाशी निगडित अनेक महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी आयझॉल विमानतळावरूनच तीन नव्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. तसेच बैराबी-सायरंग रेल्वे मार्गाचे औपचारिक उद्घाटन केले. या मार्गामुळे मिझोरम पहिल्यांदाच थेट देशाच्या रेल्वे नेटवर्कशी जोडले गेले आहे. विशेष म्हणजे, या रेल्वे मार्गावरून आता मिझोरममधून थेट दिल्लीसाठी रेल्वेसेवा सुरू होणार आहे. या नवीन रेल्वे लाईनमुळे मिझोरम आणि ईशान्य भारतातील कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. स्थानिक व्यापार, पर्यटन आणि विकासाला यामुळे गती मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिझोरममधील जनतेला संबोधित केले. ते म्हणाले, “मी या सुंदर निळ्या पर्वतांच्या भूमीवर असलेल्या पथियन देवतेला नमन करतो. दुर्दैवाने खराब हवामानामुळे मी तुमच्यासमोर प्रत्यक्ष येऊ शकलो नाही. मात्र आयझॉलमधूनच तुमच्याशी जोडल्यामुळे मला तुमच्या प्रेमाची आणि आत्मीयतेची जाणीव होत आहे.”
रेल्वे लाईन नव्हे, विकासाची जीवनरेषा : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरममध्ये सुरु झालेल्या बैरबी-सैरंग रेल्वे लाईनला विकासाची जीवनरेषा असे संबोधले आहे. त्यांनी सांगितले की, “आजचा दिवस मिझोरमच्या जनतेसाठी ऐतिहासिक आहे. आजपासून आयझॉल अधिकृतपणे भारताच्या रेल्वे नकाशावर आले आहे.” काही वर्षांपूर्वी मोदींनी या रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी केली होती आणि अनेक अडथळ्यांवर मात करत अखेर हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. या कामात अभियंते आणि कामगारांचे विशेष योगदान असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. या रेल्वे लाईनच्या माध्यमातून सैरंग (Sairang) शहर थेट राजधानी दिल्लीशी जोडले गेले आहे. राजधानी एक्सप्रेस आता मिझोरामपर्यंत धावणार आहे. मोदी म्हणाले की, ही केवळ रेल्वे लाईन नसून विकासाची जीवनरेषा आहे, जी मिझोरमच्या लोकांचे जीवनमान उंचावणार आहे. यामुळे शेतकरी आणि व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची विक्री देशभर करता येणार असून, शिक्षण व आरोग्याच्या उत्तम संधी उपलब्ध होतील. या विकासामुळे रोजगारनिर्मितीलाही मोठा हातभार लागेल, असेही मोदींनी स्पष्ट केले.

मुंबई : आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत आता अगदी जवळ आली आहे. करदात्यांसाठी १५ सप्टेंबर २०२५ ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली असून, अजूनही ...
मिझोरममध्ये लवकरच हेलिकॉप्टर सेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले की, लवकरच मिझोरममध्ये हवाई प्रवासासाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे या राज्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागांमध्ये पोहोचणे आता अधिक सोपे होईल. मोदी म्हणाले की, “गेल्या अकरा वर्षांपासून आमची सरकार ईशान्य भारताच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहे. या काळात ईशान्य भारत आता देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून उदयास येत आहे.” गेल्या काही वर्षांत या प्रदेशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारल्या गेल्या आहेत. अनेक राज्यांना प्रथमच रेल्वे नेटवर्कशी जोडण्यात आले आहे. त्याचबरोबर ग्रामीण रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, वीज पुरवठा, नळाचे पाणी, गॅस कनेक्शन, मोबाइल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी या सर्व बाबींमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. मोदींनी स्पष्ट केले की, भारत सरकार सर्व प्रकारच्या वाहतूक व्यवस्थेला बळकटी देत आहे. त्याचाच भाग म्हणून मिझोरममध्ये लवकरच हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रवासाची नवी सोय उपलब्ध होईल आणि पर्यटन व व्यापारालाही चालना मिळेल.