
"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी
Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदीच्या पत्नीने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यावरून आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे. या सामन्यातून मिळणारा महसूल थेट पाकिस्तानमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी वापरला जाईल असा आरोप तिने केला आहे. या सामन्याचे आयोजन आणि प्रसारण करण्यात सहभागी असलेल्या बीसीसीआय, सरकार, प्रायोजक आणि टीव्ही चॅनेलवर तिने जोरदार टीका केली आहे.
रविवारी दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. पहलगाम हल्ल्यांतर पहिल्यांदाच, भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना रंगणार आहे. मुळात, २०२४ च्या टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते, म्हणजेच तब्बल एक वर्षानंतर हे दोघेही आयसीसी इव्हेंट आशिया कपमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत, ज्यावर जगभरातील चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
भारत पाक सामन्याबद्दल ऐशन्या द्विवेदीचे निराशाजनक वक्तव्य
भारत पाकिस्तानची आशिया कपमधील उद्या होणारी लढत निकराची जरी असली, तरी यावरून भारतात विरोध होत आहे. भारतीय संघाने पाकिस्तानसोबत खेळण्यावरून अनेक चाहते आणि राजकीय पक्षांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशन्या द्विवेदी यांनीही या सामन्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे.
#WATCH | Kanpur, UP: On upcoming India vs Pakistan match in Asia Cup 2025, Aishanya Dwivedi - wife of Pahalgam terror attack victim Shubham Dwivedi, says, "BCCI should not have accepted a match between India and Pakistan...I think BCCI is not sentimental towards those 26… pic.twitter.com/1tAu9wjqSo
— ANI (@ANI) September 13, 2025
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना ऐशन्या द्विवेदी म्हणाल्या की, "बीसीसीआयने भारतीय संघाला पाकिस्तानशी सामना खेळण्यासाठी मान्यता द्यायला नको हवी होती. ही आपल्या देशाची मोठी चूक आहे. मला वाटत नाही की बीसीसीआयने २६ कुटुंबांच्या शहीद होण्याच्या भावना समजून घेतल्या आहेत. कारण त्यांच्या कुटुंबातील कोणीही या हल्ल्यामध्ये मरण पावलेले नाही."
त्या पुढे असे देखील म्हणाल्या की, क्रिकेटपटूंमध्ये राष्ट्रवादाची सर्वोच्च भावना असली पाहिजे. म्हणूनच क्रिकेटला राष्ट्रीय खेळ मानले जाते, पण हॉकी हा आपला खरा राष्ट्रीय खेळ आहे. असे असूनही, एक-दोन क्रिकेटपटू वगळता कोणीही पुढे आलेळे नाही. आपण भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकला पाहिजे.
बीसीसीआय आणि प्रायोजकांवरही प्रश्न उपस्थित
ऐशन्या द्विवेदी यांनी बीसीसीआय आणि प्रायोजकांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या म्हणाल्या की, "सामना दाखवणाऱ्या सोनीसारख्या प्रायोजकांना आणि टीव्ही चॅनेलना मानवतेचा आणि २६ लोकांच्या मृत्यूची काहीच पडलेली नाही. हे सर्व फक्त महसूलासाठी करत आहेत. हा सर्व महसूल पाकिस्तानमधील दहशतवादाला जाईल." अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली.
"पाकिस्तान हा एक दहशतवादी देश आहे. जर आपण सामना खेळला तर त्यांना महसूल मिळेल, ज्यामुळे ते अधिक मजबूत होतील आणि ते आपल्या देशावर हल्ला करू शकतात." असा घणाघात त्यांनी केला.
लोकांना सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे केले आवाहन
ऐशन्या द्विवेदी यांनी उद्या होणाऱ्या भारत आणि पाक विरुद्ध सामन्याला बहिष्कार टाकण्याचे आवाहन क्रीडा चाहत्यांना केला आहे. त्या म्हणाल्या, " लोकं या सामन्यावर बहिष्कार टाकू शकतात, तुम्ही सामना पाहू नका, किवा टीव्ही चालू करू नका. यामुळे पाकिस्तानची प्रेक्षकसंख्या आणि पैसे कमी होतील आणि कदाचित बदल घडून येऊ शकेल."
ऐश्वर्या द्विवेदी यांनी सरकारच्या भूमिकेवर काय म्हटले?
ऐश्वर्या द्विवेदी म्हणाल्या की भारत-पाकिस्तान सामना थेट भारतात झाला नाही, परंतु बीसीसीआयने दुबईमध्ये सामना आयोजित करण्याचा मार्ग शोधला. आशिया विश्वचषकात पाकिस्तानचा समावेश का करण्यात आला हे मला समजत नाही. मी विनंती केली होती की हा सामना होऊ नये. कदाचित माझा आवाज पोहोचला नसेल, परंतु मला आशा आहे की सामान्य लोक ते ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील.