Saturday, September 13, 2025

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला मान्सून महाराष्ट्रात पुन्हा परतण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिनांक १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते, त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यभर पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात मान्सून पुन्हा झोडपणार

हवामान तज्ञांनी सूचित केले आहे की सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात परतीचा मान्सून सक्रिय होऊ शकतो. दरम्यान, आता पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.

हवामान खात्याने दिला इशारा 

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान राज्यात मुसळधार ते मध्यम पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर शुक्रवारपासून वातावरणात बदल दिसून येत आहेत आणि हवेतील आर्द्रता वाढू लागली आहे. हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मान्सून परतण्याची ही सुरुवातीची चिन्हे आहेत.

गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर, पावसाने पुन्हा जोरदार पुनरागमन केले आहे. ज्यामुळे राज्यात पुन्हा एकदा हवामान आल्हाददायक झाले आहे.  पुढील आठवड्यात म्हणजेच १३ ते १८ सप्टेंबर दरम्यान राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस 

हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, यवतमाळ या सर्व ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठच्या नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ढगांमुळे गेल्या काही दिवसांत आर्द्रता आणि उष्णतेत खूप वाढ झाली होती, परंतु लवकरच परतीचा पाऊस सुरू होणार असल्यामुळे लोकांना नक्कीच त्यातून दिलासा मिळेल. तथापि, सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याची, वाहतूक कोंडी होण्याची आणि पिकांचे नुकसान होण्याची देखील शक्यता आहे.

Comments
Add Comment