Monday, November 17, 2025

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे चित्र होते. पण मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संपर्कात राहून राज्यपालांनी मणिपूरमधील कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी भरपूर काम केले. या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळाले आणि मणिपूरमधील परिस्थिती बदलली. यानंतर राज्यातील विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनांच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी मणिपूरचा दौरा केला. आयत्यावेळी मुसळधार पाऊस सुरू झाला. वेगाने वारे वाहू लागले. या प्रतिकूल वातावरणातही पंतप्रधान मोदींनी आधी ठरवलेला मणिपूरचा दौरा रद्द केला नाही. मणिपूरमधील परिस्थितीचा आढावा घेणे आणि स्थानिकांशी संवाद साधणे या हेतूने पंत्रधान मोदींनी मणिपूरला भेट देण्याचानिर्णय घेतला.

हेलिकॉप्टर उड्डाण करू शकत नाही हे लक्षात येताच पंतप्रधान मोदींनी रस्त्यावरुन प्रवास करुन सभास्थळी पोहोचण्याचा निर्णय घेतला. मुसळधार पावसातून वेगाने अंतर कापत दीड तास रस्त्याने प्रवास करुन पंतप्रधान मोदी सभास्थळी पोहोचले. रस्त्यावर ठिकठिकाणी पंतप्रधान मोदींचे जल्लोषात स्वागत झाले. मोदी मणिपूरमधील कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि मोदी मोदी अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हात जोडून उपस्थितांना नमस्कार केला.

अनेकांनी तिरंगा झळकवत पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत केले. तिरंगा हाती धरुन नागरिकांनी स्वागत केल्यामुळे पंतप्रधान मोदी भारावून गेले. त्यांनी या स्वागतासाठी सर्वांचे जाहीर आभार मानले. मणिपूरच्या विकासाकरिता ठामपणे उभा राहणार अशी ग्वाही त्यांनी दिली. मणिपूरमध्ये सभेनंतर पंतप्रधान मोदींनी शालेय विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी काहींनी पंतप्रधान मोदींना भेटवस्तू दिल्या.

Comments
Add Comment