
भालचंद्र कुबल : पाचवा वेद
घासीराम पुराण इतक्या लवकर आवरतं घेता येईल असं काही वाटत नाही. पण मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक या उक्तीप्रमाणे हा या मालिकेतील शेवटचा लेख असेल. पुढे मागे यावर विस्तृत लिहायचंच असं ठरवलं तर एखादं पुस्तक मात्र नक्की लिहीन. असो...!
तर घासीराम या नव्या व्हर्जनमध्ये खरंतर संतोष जुवेकरची घासीरामची भूमिका सर्वात आधी म्हणजे नाना फडणीसांच्याही अगोदर निश्चित केली गेली होती. अर्थात या देखील कास्टिंगचं श्रेय अभिजितचंच होतं. छावामधल्या भूमिकेची वाखाणणी झाल्यानंतर संतोष जुवेकरच्या नावाला एक वलय प्राप्त झालं होतं, त्यामुळे हिंदी प्रेक्षकांसाठी तो अनोळखी राहिला नव्हता. दरम्यान अनेक मराठी सिनेमे त्याच्याकडे येऊ घातले होते. अशात नाटकाची ऑफर तो स्वीकारेल का? हा प्रश्न मला सतावत असतानाच, संतोष तयार असल्याची बातमी अभिजितने दिली. संतोष लगेच घासीरामच्या तयारीलाही लागला... आणि आम्ही शोधत होतो नाना…!
संजय मिश्रा हे नाव पुढे यायला संतोष कारणीभूत ठरला. त्यांच्या नावाचा प्रस्ताव अभिजित समोर संतोषने ठेवला. अचानक निर्णय घेतले गेले आणि संजय मिश्रा या नावावर शिक्कामोर्तब झाले. उर्मिला कानेटकरचंही नाव असंच अभिजितच्या डोक्यात आलं आणि तिनेही गुलाबीच्या अगदी छोट्याशा भूमिकेसाठी होकार दिला. तिच्या बाबतीत जमेची बाजू म्हणजे तिची नृत्यअदा. फुलवा खामकरानी तिच्या या अदेचा पुरेपूर फायदा करून घेतला. तिच्याबरोबर असलेल्या बाकी नृत्यांगना रितसर ऑडीशन घेऊन निवडल्या गेल्या. फुलवा खामकर तशा सद्याच्या बिझी कोरीओग्राफर्सपैकी एक, पण पुरेसा वेळ देत नाटकातील नृत्यांना दिलेला ग्लॅमर नाटकाची उंची निश्चितच वाढवतो. तीच गोष्ट संगीताबाबत म्हणता येईल. मंदार देशपांडेने दिलेले संगीत आधीच्या आवृत्तीतही याच चालींचे होते; परंतु आताच्या आवृत्तीत तरुण पिढीला रुचेल, आवडेल आणि थिरकायला भाग पाडेल असे आमूलाग्र बदल अभिजितने करून घेतले. नेपथ्यासाठी असलेला बुद्धिबळाची संकल्पना नव्याने पुढे आली आणि संदेश बेंद्रेने एक कृष्णधवल नेपथ्य आमच्यासमोर ठेवले. आजही नाटक बघायला सुरुवात केल्यावर पहिली टाळी पडदा दूर सरताच समोर दिसणाऱ्या भव्य बुद्धिबळ पटालाच येते. ही भव्यता अंगावर येण्याचं अजून एक कारण म्हणजे हर्षवर्धन पाठकची प्रकाश योजना. सरड्याची धाव कुंपणापर्यंतच्या कल्पकतेचा मी, हर्षवर्धनने नाटक सर्वार्थाने दीपवून टाकलेय. अभिजितला काळाच्या पुढचं विचार करणारा प्रकाशयोजनाकार हवा होता आणि तो मिळालाही. आजमितीला भारतातल्या अग्रगण्य लाईट डिझायनर्सपैकी तो आहे, हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या प्रेक्षकांनी मला सांगितलंय.
विजय तेंडुलकरांना कल्पनाही नसेल, तशी ती कोणत्याच कलावंताला नसते, की आपण जे काम करतो ते काळाला पुरून उरेल वा नाही. पण आता काळ पुढे सरकलेला आहे. ‘घाशीराम कोतवाल’चा पहिला प्रयोग होऊन (१६ डिसेंबर १९७२) ५२ वर्षे पूर्ण झाली आणि या नाटकाने पन्नासाव्या वर्षांत प्रवेश केला. हा सुवर्ण क्षण पाहायला विजय तेंडुलकर आज आपल्यात नाहीत. त्यामुळे तशी काही अडचण येत नाही, कारण लेखक त्याच्या कलाकृतीबरोबर वर्तमानातही जगत असतो. तेंडुलकरांना आणि या वर्तमानाला आमचा सलाम...!
‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत पहिल्यांदा सादर झालं ते भालबा केळकर यांच्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) या संस्थेतर्फे. त्या स्पर्धेतलं एक वेगळं नाटक होतं. नाटकाचा फॉर्म हा गद्य-पद्य संगीतमय असा होता. त्याला लोककलेच्या फॉर्ममधील लवचिकतेची जोड होती. खरं तर हे नाटक त्या स्पर्धेमध्ये त्याच्या सर्व गुणवैशिष्ट्यांमुळे पहिलं यायला हवं होतं; पण ते आलं दुसरं. पहिल्या आलेल्या नाटकाचं नाव होतं “मेन विदाऊट शॅडोज”. स्पर्धेची गणितं बहुधा वेगळ्या पद्धतीने सादर झालेल्या कलाकृतींबाबत मान्य नसावीत. ती स्पर्धेची गणितं मोडून (परीक्षकांच्या नाकावर टिचून) ताठ कण्यानं उभी राहतात. तरीही महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेने मराठी मातीला काय दिलं तर, ‘घाशीराम कोतवाल’ हे आगळं वेगळं नाटक. या आगळे वेगळेपणा बरोबरच पुण्यात काही प्रयोग होऊ लागताच, यात ब्राह्मणांची आणि नाना फडणीसांची बदनामी होत आहे, त्यामुळे हे नाटक ताबडतोब बंद करावं, अशी भूमिका पुणेकर ब्राह्मणांनी घेतली. याचा परिणाम असा झाला, भालबा केळकरांनी या नाटकाचे प्रयोग करणं बंद केलं.
अत्यंत मेहनतीनं लिहिलेलं आणि तितक्याच तीव्रतेने, मेहनतीनं सिद्ध केलेलं हे नाटक दुर्लक्षित होऊ नये म्हणून दिग्दर्शक जब्बार पटेल, या नाटकाची सगळी टीम, नृत्य दिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद, संगीतकार भास्कर चंदावरकर, अभिनेते मोहन आगाशे आणि सतीश आळेकर या सगळ्यांनी एकत्रित येऊन ‘थिएटर अकादमी’ या संस्थेची स्थापना केली आणि ‘घाशीराम कोतवाल’चे प्रयोग पुन्हा सुरू झाले. अगदी आता आतापर्यंत मराठी घाशीरामचे प्रयोग सुरू होते, पण मलाही हिंदी “घासीराम” करण्याची संधी मिळाली आणि पुढे ती प्रायोगिक रंगभूमीपुरती मर्यादित न ठेवता, हिंदी व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याची कमाल अभिजित पानसे आणि आम्ही करतो आहोत.