Friday, September 12, 2025

नितीन गडकरींनीच केली डॉ. जिचकारांची कदर

नितीन गडकरींनीच केली डॉ. जिचकारांची कदर

नागपूरच्या अमरावती महामार्गावरील बोले पेट्रोल पंप चौक ते विद्यापीठ कॅम्पस चौकपर्यंतच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण झाले. भाजप आणि काँग्रेस यांच्यात राजकीय वितृष्ट अतिशय टोकाचे असले तरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील उड्डाणपुलाला श्रीकांत जिचकार या काँग्रेसच्या नेत्याचे नाव दिले आहे. श्रीकांत जिचकार हे काँग्रेसचे माजी मंत्री आणि नेते होते.

नागपुरातील अमरावती मार्गावरील बोले पेट्रोल पंप चौक ते विद्यापीठ परिसर चौक या अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलाचे लोकार्पण होत आहे. हा लेख प्रकाशित होईल तेव्हा या उड्डाणपुलाचे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेले असेल. या उड्डाणपुलाला ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार स्मृती उड्डाणपूल असे नाव देण्यात आले आहे. कारण अमरावती मार्गावरच डॉ. श्रीकांत जिचकार यांचा अपघाती मृत्यू झाला होता आणि या मार्गावरील भरत नगर परिसरात त्यांचे निवासस्थान आज देखील आहे. त्यामुळेच या चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

त्याशिवाय देखील या नामकरणाला आणखीही एक संदर्भ आहे, तो राजकारणात वैचारिक मतभेद कितीही असले तरी मैत्री कशी जपली जाऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे नामकरण ठरणार आहे. या उड्डाणपुलाच्या भूमिपूजन प्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच या उड्डाणपुलाला डॉ. श्रीकांत जिचकार यांचे नाव दिले जाईल अशी घोषणा केली होती. त्यावेळी बोलताना गडकरी म्हणाले होते की जिचकार आणि मी वेगवेगळ्या पक्षात होतो. आमचे वैचारिक मतभेद देखील खूप होते. मात्र तरीही ते माझे चांगले मित्र होते आणि आम्हा दोघांनाही एकमेकांबाबत प्रचंड आदर होता. त्यामुळेच याच उड्डाणपुलाला त्यांचे नाव देण्याचे मी ठरवले आहे. डॉ. श्रीकांत जिचकार हे एक विद्वान म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी ज्या काही पदव्या घेतल्या, त्यांची संख्या लक्षात घेता त्यांचे नाव गिनिज बुकात नोंदले गेले होते. विविध पदव्या तर त्यांनी घेतल्याच, पण त्या सर्व त्यांनी गुणवत्ता यादीत राहून मिळवल्या. त्याशिवाय आयएएस आणि आयपीएस या परीक्षा देखील त्यांनी उत्तीर्ण केल्या होत्या. अगदी वेदविद्यांपासून तो आधुनिक शास्त्रांपर्यंत सर्वच क्षेत्रांत त्यांचा दांडगा अभ्यास होता. नागपुरात केंद्रीय अर्थसंकल्पावर विश्लेषणात्मक भाषण देण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला होता आणि तो अनेक वर्षे राबवला सुद्धा. महाराष्ट्राचे अर्थ राज्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी प्रथमच झिरो बजेटची संकल्पना पुढे आणली होती. जागतिक प्रथापरंपरांचा अभ्यास करून प्रशासनात सुधारणा कशा करता येतील याबाबत ते आग्रही असायचे. म्हणूनच नागपूरच्या ज्ञानयोद्धा चळवळीने त्यांना ज्ञानयोगी ही पदवी दिली होती. डॉ. श्रीकांत जिचकर हे सुरुवातीपासून काँग्रेस विचारांचे कार्यकर्ते म्हणूनच प्रसिद्ध होते. काँग्रेसमधूनच वयाच्या २५ व्या वर्षी ते आमदार झाले. त्यानंतर दोनदा ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीदेखील होते. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांत त्यांनी आपली छाप पाडली होती. नंतर सहा वर्षे ते राज्यसभा सदस्य म्हणूनही कार्यरत राहिले होते. महाराष्ट्राच्या विलासराव देशमुख मंत्रिमंडळाने त्यांना विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष म्हणून नेमले होते. ते काम देखील त्यांनी नेटाने पुढे नेले होते.

नितीन गडकरी हे देखील श्रीकांत जिचकारांचे समकालीनच होते. ते देखील एक अभ्यासू आणि संवेदनशील कार्यकर्ते म्हणून पुढे आले होते. मात्र गडकरी सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नंतर भारतीय जनता पक्षात सक्रिय राहिले होते. आजही ते आपल्या विचारांशी बांधिलकी ठेवूनच आहेत. १९७७ मध्ये नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत श्रीकांत जिचकार हे काँग्रेसप्रणीत पॅनलचे उमेदवार अध्यक्षपदाचे उमेदवार होते, तर नितीन गडकरी हे संघप्रणीत विद्यार्थी परिषद पॅनलचे अध्यक्ष पदाचे उमेदवार होते. या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत जिचकारांनी गडकरींचा दोन मतांनी पराभव केला होता. नंतर डॉ. जिचकार आमदार झाले. गडकरी देखील आमदार झाले होते. दोघांचीही पक्षभेद विसरून मैत्री झाली होती. ती मैत्री अखेरपर्यंत टिकली होती. त्यामुळेच ज्यावेळी जिचकारांचा अपघाती मृत्यू झाला त्यावेळी बोलताना गडकरी म्हणाले होते की जिचकारांना महाराष्ट्राचे राजकारण समजले नाही आणि महाराष्ट्रातील राजकारण्यांना जिचकार कधी समजलेच नाहीत. त्यामुळे प्रचंड विद्वत्ता आणि क्षमता असलेला हा माणूस कायम दुर्लक्षितच राहिला अशी खंत गडकरींनी व्यक्त केली होती. गडकरींनी असे म्हणण्याचे कारण असे की १९८० मध्ये डॉ. जिचकार नागपूर जिल्ह्यातून विधानसभेत विजयी झाले होते.

मात्र २९८५ मध्ये त्यांना त्यांच्याच पक्षातील इतर नेत्यांनी कटकारस्थान करून आडवे केले होते. याला कारण जिचकारांची विद्वत्ता आडवी आली होती. त्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेतून सभागृहात पाठवले. मात्र विधानसभेत उमेदवारी दिली नव्हती. नंतर त्यांना राज्यसभेत उमेदवारी दिली. तिथे ते विजयी झाले.मात्र लोकसभेत कधीच उमेदवारी दिली नव्हती. नाही म्हणायला २००४ मध्ये लोकसभा निवडणुकात काँग्रेस पक्षाने जिचकारांना रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. रामटेक लोकसभा मतदारसंघ हे तसा विचार करता जिचकारांचेच कार्यक्षेत्र होते. तरीही पक्षातील सहकाऱ्यांना ते रुचले नाही आणि त्यांना पुरेसे सहकार्य मिळाले नाही.

परिणामी शिवसेनेचे तत्कालीन अवजड उद्योग मंत्री सुबोध मोहिते त्यांचा पराभव करून विजयी झाले होते. जिचकारांना पराभवाचे तोंड पुन्हा एकदा बघावे लागले होते. त्यानंतर दहा वर्षं केंद्रात आणि महाराष्ट्रात काँग्रेसप्रणीत सरकारच सत्तेत होती. मात्र जिचकारांचे नाव देऊन त्यांचे उचित स्मारक उभे करावे येणे करून पुढच्या पिढ्यांना त्यांच्या कार्याबद्दल माहिती होईल, असे या काँग्रेसजनांना कधीच वाटले नाही. असे असले तरी त्यांच्या मित्रालाच पक्षभेद आणि मतभेद बाजूला ठेवून त्यांच्या विद्वत्तेची कदर करावीशी वाटली ही बाब देखील स्वागतार्हच मानावी लागेल. आता या उड्डाणपुलामुळे श्रीकांत जिचकारांचे नाव आणि त्यांचे कार्यकर्तृत्व पुढल्या पिढ्यांना देखील ज्ञात राहील हे नक्की. - अविनाश पाठक

Comments
Add Comment