
नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत भारतात तयार केलेले रडार आता ५०० किलोमीटर दूर पर्यंतच्या विमानांचा अचूक वेध घेऊ शकते. हे रडार इतके प्रगत आहे की पाचव्या-सहाव्या पिढीतील स्टेल्थ लढाऊ विमानंही च्या नजरेतून सुटत नाही.
सूर्या रडार हे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (DRDO) इलेक्ट्रॉनिक्स आणि रडार डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (LRDE) ने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या सहकार्याने विकसित केले आहे. हे रडार भारतीय हवाई दलासाठी (IAF) डिझाइन केले आहे.
स्वदेशी सूर्या व्हीएचएफ रडारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते अमेरिकेचे F 35 आणि चीनचे J 20 स्टेल्थ फायटर एअरक्राफ्ट आणि विंग लूंग सारखे ड्रोन ओळखू शकते. विमान, ड्रोन शत्रूचे क्षेपणास्त्र कोणत्या दिशेला जात आहे हे व्यवस्थित सांगू शकते. याच कारणामुळे व्हीएचएफ रडारला स्टेल्थ हंटर असेही म्हणतात.
भारताचे सूर्या रडार एका मिनिटात दहा वेळा ३६० अंशात गोलाकार फिरते आणि ५०० किलोमीटर दूर पर्यंतच्या संभाव्य हवाई हल्ल्यांचा अचूक वेध घेऊ शकते. हे रडार दोन ६×६ हाय-मोबिलिटी वाहनांवर आधारित आहे, ज्यामुळे ते कोणत्याही भौगोलिक परिस्थितीत सहजपणे तैनात करता येते. हे रडार एक मोबाइल युनिट म्हणून काम करते आणि कमी उंचीवर उडणाऱ्या लक्ष्यांना ओळखण्यासाठी सूर्यामध्येच थ्रीडी रडार तंत्रज्ञान देखील आहे. याच कारणामुळे भारताने विकसित केलेले सूर्या रडार आकाश आणि क्यूआरएसएएम क्षेपणास्त्र प्रणालींसारख्या स्वदेशी हवाई संरक्षण प्रणालींशी जोडल्यास शत्रूसाठी आणखी घातक ठरेल, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.