
विद्यार्थ्यांची प्रगती होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेऊन अध्यापकांनी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. मात्र काही ठिकाणी स्वत:ला अतिहुशार समजणारे अध्यापक तुला काहीच येत नाही असे सांगून विद्यार्थ्यांचे खच्चीकरण करत असतात. तेव्हा अध्यापकांनी विद्यार्थ्यांची प्रगती साधण्यासाठी विद्यार्थ्यांशी सकारात्मक संबंध निर्माण करून त्यांना प्रोत्साहित करायला हवे.
देशाच्या विकासातील खरा केंद्र बिंदू हा विद्यार्थी असतो. तेव्हा चांगले विद्यार्थी घडविले पाहिजे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक आहेत. तेव्हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सुजाण नागरिकांची गरज असते. ते प्रामाणिकपणे घडविले गेले पाहिजे. हे घडविण्याचे महान कार्य अध्यापक करीत असतात. प्राथमिक शिक्षण असो किंवा उच्च शिक्षण असो अध्यापकांनी अभ्यासक्रम लक्षात घेऊन अध्ययन केले पाहिजे. दुर्दैवाने काही ठिकाणी आज तसे होताना दिसत नाही. प्राथमिक, माध्यमिक विभागातील प्रगती अतिशय उत्तम प्रकारची विद्यार्थ्यांची असून काही उच्च शिक्षणाचा विचार करता विद्यार्थी पास होण्यासाठी अतिशय जीवाची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. तेव्हा अशी वेळ विद्यार्थ्यांवर का आली याचा सुद्धा विचार होणे गरजेचे आहे. यात अध्यापक कुठे कमी पडतात का किंवा विद्यार्थी मागे का राहतात याचा सुद्धा विचार होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याला काहीच येत नाही असे सांगून मूळ विषयाला बगल दिली जाते. असे किती दिवस चालणार? यात शालेय किंवा महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीची अतिशय महत्त्वाची जबाबदारी असते. ती जबाबदारी त्यांनी योग्य प्रकारे पार पाडली पाहिजे. बऱ्याच ठिकाणी समिती नावालाच असल्याची वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळते. जर समितीने आपले काम पारदर्शक केल्यास असा विषय लिहिण्याची वेळ येणार नाही. अध्यापन पदाची पात्रता असून आज कायमस्वरूपी अध्यापक लाखाच्या घरात पगार घेतात, तर कंत्राटी अध्यापकांना तुटपुंज्या पगारावर समाधान मानावे लागते. ही अध्यापकांची आर्थिक विषमता दूर होणे गरजेचे आहे. प्रत्येक अध्यापक पदवीधरांना पूर्ण वेतनी पगार मिळालाच पाहिजे. त्याच बरोबर अध्यापकांना शाळाबाह्य कामांपासून दूर ठेवावे.
महत्त्वाची बाब म्हणजे, जी मुले शिष्यवृत्ती परीक्षा पास होऊन शिष्यवृत्ती मिळवतात तीच मुले उच्च शिक्षण घेताना पास होण्यासाठी धडपडताना दिसतात. तेव्हा विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा चिकित्सकपणे अभ्यास होणे गरजेचे आहे. मात्र फार कमी प्रमाणात आपल्या देशात प्रगती होताना दिसून येते. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवीत आहेत. सन २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षेत १४ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्या मार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्यामध्ये लागला. यात बारावीच्या एकाही विद्यार्थ्याला १०० टक्के गुण संपादन करता आले नाही मात्र दहावीच्या २११ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण संपादन केले आहेत. असे असताना उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती काही खालावल्यासारखी वाटते. उलट माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षण देणाऱ्या अध्यापकांच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास केला तर काही परिस्थिती गृहीत धरून याला जबाबदार कोण? याचे उत्तर आपणा सर्वांना शोधावे लागेल. कारण शेवटी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. वर्षभर अभ्यास करून विद्यार्थी उत्तीर्ण होत नसतील तर दोष कोणाला द्यायचा हा खरा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे पालकांनी एकत्र येऊन आपली मुले कुठे कमी पडतात? मुले अभ्यास करीत नाहीत का? किंवा कशाप्रकारे अध्यापक अध्ययन करतात याचा बारकाईने अभ्यास होणे आवश्यक आहे. आजची मुले ही उद्याची सुजाण नागरिक आहेत. हे विसरता कामा नये. असेच जर चालले तर अध्यापकांची सुद्धा परीक्षा होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या विषयाचे ज्ञान लक्षात येईल. म्हणजे यातूनच चांगले विद्यार्थी घडू शकतात. यासाठी अध्यापकांची मानसिक तयारी झाली पाहिजे.
अध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करावे. त्यानंतर मूल्यांकनाचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात. यात अध्यापक तसेच विद्यार्थ्यांचा चांगला फायदा होतो. त्यासाठी अध्यापनामध्ये मूल्यांकनाला महत्त्व आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने नियमित मूल्यांकन होणे गरजेचे आहे. अध्यापकांनी सुद्धा आपल्या शैक्षणिक धोरणांचे मूल्यांकन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. यामुळे विद्यार्थी सुद्धा जबाबदारीने शिक्षण घेऊन स्वत:ची प्रगती करू शकतात. त्यांना मूल्यांकनामुळे त्यांच्या हक्कांची जाणीव निर्माण होते. काही अध्यापक जाणूनबुजून विद्यार्थ्यांना त्रास देतात. याचा परिणाम विद्यार्थी टेन्शनमध्ये येतात. अशा अध्यापकांना सुद्धा धडा शिकविणे आवश्यक आहे. मात्र आपल्या मुलांना पुढे त्रास अध्यापक देतील म्हणून पालकवर्ग तक्रार करायला पुढे येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा शैक्षणिक संस्थेतील शिक्षण समितीने सतर्क राहणे गरजेचे आहे. तेव्हा अध्यापकांनी आपल्या विषयाच्या अभ्यासक्रमाची चांगली तयारी करावी. नि:पक्षपातीपणे अध्ययन करावे. तरच चांगले विद्यार्थी घडून देशाची प्रगती होण्याला मदत होईल. मात्र आजची परिस्थिती काहीशी वेगळी दिसते. त्यात बदल होणे गरजेचे आहे. अन्यथा विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. - रवींद्र तांबे