Saturday, September 13, 2025

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१ लाख ४३ हजारांच्या मदतीस मान्यता

मुंबई : राज्यात जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधितांना ७३ कोटी ९१ लाख ४३ हजाराच्या मदतीस राज्य शासनाने मान्यता दिली असून याबाबतचे शासन निर्णय जारी करण्यात आले असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले, नैसर्गिक आपत्तीत बाधित शेतकऱ्यांना मदत व दिलासा देण्यास शासनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. शासनाने बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करून मदत देण्याच्या घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टी व अवकाळी पाऊस या आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना उभारी मिळेल, असा विश्वास मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जून २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे शेत पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना ३७ लाख ४० हजार रुपये तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली व सोलापूर जिल्ह्यात जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत शेत पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ५४ लाख ३ हजार मदतीचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील ९८० बाधित शेतकऱ्यांच्या ५५.६५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ११ लाख ८१ हजार रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील ५६० शेतकऱ्यांच्या ७१.५४ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १२ लाख ९६ हजार रुपये निधीस मान्यता देण्यात आली आहे.

Comments
Add Comment