Saturday, September 13, 2025

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आशिया कप २०२५ स्पर्धेतील सामना होणार आहे. हा सामना सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील संबंध अत्यंत बिघडले आहेत. भारतातील अनेकांनी या सामन्याला विरोध करताना या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर हा सामना होत आहे. मात्र आता असे समोर येत आहे की, बीसीसीआयकडून 'अदृश्य बहिष्कार' या सामन्यावर टाकण्यात येणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्याचा बहिष्कार करण्याचा विचार केला आहे. अलीकडेच झालेल्या पहलगाव दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून हा सामना रद्द करण्याची मागणी होत आहे. बीसीसीआय (BCCI) चे कुठलेही वरिष्ठ अधिकारी अद्याप दुबईला पोहोचलेले नाहीत. पहलगाव हल्ला आणि त्यानंतरच्या ऑपरेशन सिंदूरमुळे निर्माण झालेल्या संवेदनशील परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

सचिव देवजीत सैकिया हे महिला वनडे विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त असल्याने सामन्याला उपस्थित राहणार नाहीत. आयपीएल चेअरमन अरुण धूमल यांनीदेखील दुबईला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कार्यकारी अध्यक्ष राजीव शुक्ला, जे एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC)चे सदस्य आहेत, ते या सामन्यात उपस्थित राहू शकतात. तसेच, आयसीसी चेअरमन जय शहा हे अमेरिकेत महत्त्वाच्या बैठकींमध्ये व्यस्त असल्याने दुबईत येणार नाहीत.

सरकारच्या निर्णयावर बीसीसीआय अवलंबून

बीसीसीआय अनेकदा स्पष्टपणे सांगत आलं आहे की, पाकिस्तानविरुद्ध खेळायचं की नाही हे पूर्णपणे भारत सरकारच्या भूमिकेवर अवलंबून आहे. यापूर्वीही भारताने पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा बहिष्कार केला होता. त्यावेळी स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर घेण्यात आली होती आणि भारताने आपले सर्व सामने यूएईत खेळले होते.

भारत आणि पाकिस्तान टी-२० मध्ये कोण वरचढ?

आशिया कप टी-२० स्वरूपात खेळला जात आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी १७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये भारताने १० सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने फक्त तीन वेळा विजय मिळवला आहे. या आकडेवारीवरून असे दिसून येते की टी-२०मध्ये भारताची थोडीशी आघाडी आहे, ज्यामुळे भारतीय संघाला मानसिक फायदा देखील मिळतो.

Comments
Add Comment