
पितृपक्षाला प्रारंभ झाला की, सर्वांना आपापल्या पूर्वजांची आवर्जून आठवण येते. हे स्वाभाविकच असले, तरी आपल्या पूर्वजांच्या स्मृती आणि त्यांचे आशीर्वाद कायमच सर्वांच्या सोबत असतात. पितृपक्ष मात्र या स्मृतींना पुन्हा जागवण्यासाठी निमित्त मात्र ठरतो. अनेकांच्या अनेक आठवणी त्यांच्या पूर्वजांच्या बाबतीत असतात आणि पितृपक्ष मर्त्य मानवाला त्यांची हटकून आठवण करून देत असतो. आपल्याला एकदा सोडून गेलेली व्यक्ती कधीच परत येत नाही; परंतु आपल्या आयुष्याच्या प्रवासात अनेक प्रकारची माणसे भेटत राहतात आणि आपल्या गेलेल्या माणसांच्या स्मृतींना उजाळा देतात. सर्वसामान्य व्यक्तींसह कलाकार मंडळींच्याही त्यांच्या पूर्वजांविषयी अनेक आठवणी असतात. ज्येष्ठ अभिनेते व कार्यकारी निर्माते म्हणून यशस्वी कारकीर्द असलेले भूषण तेलंग यांनी यानिमित्ताने मांडलेली त्यांची एक आठवण...
आपल्याला सोडून गेलेल्या व्यक्तींसारखी माणसे कधीकाळी आपल्या संपर्कात अचानक येतात, अशी माझी भावना आहे. माझे दिवंगत आई-वडील व मोठी बहीण मला कधीमधी विविध ठिकाणी आणि वेगवेगळ्या व्यक्तींच्या रूपात दर्शन देतात. असे घडले की मग त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी जीवाचा आटापिटा सुरू होतो. माझ्या दिवंगत आईच्या संदर्भाने असाच एक अनुभव मला आला. एकदा मी शूटिंग संपवून मेट्रो रेल्वेने घरी जात होतो. या प्रवासात वर्सोवा रेल्वे स्थानकात, अगदी हुबेहूब माझ्या आईसारखी दिसणारी एक स्त्री माझ्या दृष्टीस पडली. त्या स्त्रीकडे पाहत असताना माझ्या मनात विचारांचा कल्लोळ सुरू झाला. का कुणास ठाऊक, पण तिने माझ्याशी संवाद साधावा असे मला राहून राहून वाटत होते. मी या विचारात असतानाच एक आश्चर्य घडले. एका क्षणी तिने माझ्याकडे नजर वळवली आणि आमची ओळख असल्यासारखे तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. इतकेच नव्हे; तर ती माझ्याशी बोलायला लागली. मग मी सुद्धा तिच्याशी संवाद साधू लागलो.
हा अनुभव घेत असताना मी थक्क झालो होतो. पण हे सर्व सुरू असताना, मी मात्र तिच्यात माझ्या आईला पाहत होतो. एकीकडे माझ्या हृदयाचे ठोके वाढल्याचे मला जाणवत होते; तर दुसरीकडे माझे डोळे पाणावले होते. काही वेळात घाटकोपर स्टेशन आले. मी गाडीतून उतरलो; ती सुद्धा उतरली. समोरच सरकता जिना होता; तेव्हा आधारासाठी मी तिला माझा हात पुढे केला. तिच्या त्या स्पर्शाने माझ्या मनात कृतकृत्यतेची भावना दाटून आली. काही क्षणातच ती तिथून निघून जाऊ लागली आणि मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे थिजल्यासारखा पाहत राहिलो. त्यानंतर इतकी वर्षे मेट्रो रेल्वेने मी अनेकदा प्रवास केला; मात्र आजपर्यंत प्रत्येकवेळी त्या प्रवासात मी तिचा कायमच शोध घेत राहिलो आहे...! आई आता पुसटशी आठवतेय; पण यंदाच्या पितृपक्षात पहिल्यांदाच मला माझ्या पत्नीला, वसूला आठवावे लागत आहे. ३७ वर्षांची समर्थ साथ मला वसूकडून लाभली. कृतकृत्य आहे मी...! तिच्याशी मी रोज बोलतो; तिचा अजाणता प्रतिसाद मला जगायची ताकद देतो. कारण अदृश्यपणे ती माझ्या अवतीभवती वावरतेय, अशी माझी भावना आहे. पितृपक्ष ही माझ्यासाठी आता फक्त औपचारिकता आहे.