इंटरनेट सुविधा अत्यंत मर्यादित
नैरोबी : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो, ज्यात सोशल मीडियावर लोक आपला तासन्तास घालवत असतात. सोशल मीडियावर नसणारे हल्ली फार कमी दिसतात; पण जगाच्या पाठीवर असाही एक देश आहे, जिथे सोशल मीडियाचा वापर नगण्य आहे.
पूर्व आफ्रिकेतील ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ प्रदेशात वसलेला इरिट्रिया हा देश लाल समुद्राच्या किनारी आहे. सुदान, इथिओपिया आणि जिबूती हे त्याचे शेजारी देश असून अस्मारा ही त्याची राजधानी आहे. ज्या जगात इंटरनेट आणि सोशल मीडिया अॅप्स प्रत्येक कोपऱ्यात पोहोचले आहेत, तिथे इरिट्रियातील ९९ टक्के लोकसंख्या इंटरनेटपासून पूर्णपणे अनभिज्ञ आहे. केवळ १ टक्के लोकच इंटरनेटचा वापर करतात. इरिट्रियात इंटरनेट सुविधा अत्यंत मर्यादित आहे. काही ठरावीक ठिकाणीच इंटरनेट कॅफे आढळतात; पण तिथला इंटरनेटचा वेग अतिशय मंद आहे. एका भारतीय प्रवासी ब्लॉगरने सांगितले की, येथे इंटरनेट वापरणे केवळ कठीणच नाही, तर ते खूप खर्चिक देखील आहे. इरिट्रियात एक तास वाय-फाय वापरण्यासाठी सुमारे १०० एरिट्रियन नक्फा खर्च येतो, जे भारतीय चलनात १०० रुपये किंवा त्याहून अधिक आहे. देशातील आर्थिक परिस्थिती इतकी नाजूक आहे की, सामान्य लोकांसाठी इतका खर्च करणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे इंटरनेटचा वापर अत्यंत दुर्मीळ आहे. इरिट्रियात केवळ इंटरनेट किंवा सोशल मीडियाच नाही, तर एटीएमसारख्या मूलभूत बँकिंग सुविधाही सहज उपलब्ध नाहीत. ज्या सुविधा आज जगभरातील लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत, त्या इरिट्रियातील लोकांसाठी अद्याप स्वप्नवतच आहेत. ज्या जगात अन्न ऑर्डर करणे, कॅब बुक करणे किंवा दूरच्या मित्र-नातेवाइकांशी संवाद साधणे इंटरनेटमुळे सोपे झाले आहे, तिथे इरिट्रियातील लोक तंत्रज्ञानाच्या या सुखसोयींपासून वंचित आहेत. नेपाळमध्ये अॅप्सवर बंदी घालण्यामुळे गोंधळ उडाला असताना, इरिट्रिया हा असा देश आहे, जिथे तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया यांचा प्रभाव जवळपास नगण्य आहे.