
या प्रश्नाचे खरे उत्तर देण्याची छगन भुजबळ यांची मराठा समाजाच्या सुशिक्षित नेत्यांकडे मागणी
नाशिक : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे आहे तर ते का पाहिजे, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यावे, अशी मागणी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केली आहे.
मागील काही दिवसापासून ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सुरू आहे. या सर्व प्रश्नावरती ओबीसी आरक्षणावरून भरत कराड या लातूर जिल्ह्यातील युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. त्या परिवाराला भेटण्यासाठी जाण्याआधी भुजबळ नाशकात पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले की, मराठा समाजाला आतापर्यंत आर्थिक मागासवर्ग यातून आरक्षण दिले गेले. तसेच ओबीसी प्रवर्गामध्ये देखील आरक्षण दिले गेलेले आहे. मग पूर्ण आरक्षणाची मागणी का केली जाते, असा प्रश्न उपस्थित करून भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाचे जे सुशिक्षित आणि शिकलेले नेते आहेत त्यांनी या प्रश्नाचे उत्तर सर्वांना द्यावं कारण त्यांना ओबीसीच प्रवर्ग का पाहिजे यासाठी त्यांचा अट्टाहास का आहे, जे शिकलेले नाही ज्यांना समजत नाही, अशांनी या प्रश्नाचे उत्तर देऊ नये, असे स्पष्ट करून भुजबळ यांनी मराठा समाजाच्या नेत्यांकडे या प्रश्नाला खरे उत्तर देण्याची मागणी केली आहे.
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, आत्तापर्यंत तीन आयोगाने मराठा समाजाचे आरक्षण हे फेटाळलेले आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही, असे स्पष्ट मत न्यायालयाने यापूर्वी व्यक्त केलेले आहे. मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले काही केंद्रात गेले. पण, त्यांनी असं काही केलं नाही असे स्पष्ट करून भुजबळ म्हणाले की गायकवाड क्लासचे प्रमाणपत्र हे खोट्या पद्धतीने मिळवले जातात हे दुर्दैवी आहे. राजकीय दबावापोटी सामाजिक मागासलेपण सिद्ध करता येत नाही. राजकीय दृष्ट्या प्रबळ हात म्हणून मागास वर्गात प्रवेश करू शकत नाही असेही भुजबळ यांनी मत व्यक्त केलेले आहे.