Friday, September 12, 2025

अरे बापरे! उड्डाणानंतर विमानाचे चाकच धावपट्टीवर पडले

अरे बापरे! उड्डाणानंतर विमानाचे चाकच धावपट्टीवर पडले

मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

मुंबई: गुजरातमधील कांडला येथून मुंबईला येणाऱ्या स्पाइसजेटच्या Q400 विमानाचे बाहेरील चाक उड्डाणानंतर लगेचच धावपट्टीवर निखळून पडले. त्यामुळे हे विमान  मुंबईत उतरताना पायलटने आपत्कालीन स्थिती जाहीर केली होती, मात्र सुदैवाने अनर्थ टळला आणि विमान सुरक्षितपणे मुंबईच्या धावपट्टीवर उतरले. 

उड्डाणानंतर विमानाचे चाक धावपट्टीवर पडले

झाले असे की, स्पाइसजेटच्या बॉम्बार्डियर DHC8-400 या विमानाने, ज्याचा उड्डाण क्रमांक SG-2906 होता, शुक्रवारी दुपारी २.३९ वाजता कांडला विमानतळाच्या धावपट्टी क्रमांक २३ वरून उड्डाण केले. उड्डाणानंतर लगेचच टॉवर कंट्रोलरला धावपट्टीवर विमानातून एक मोठी काळी वस्तू पडताना दिसली. दरम्यान तपासणी पथकाने जाऊन पाहिले तेव्हा तिथे विमानाचे चाक पडलेले त्यांना आढळले. 

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) दुपारी १५:५१ वाजता तांत्रिक बिघाडाची नोंद झाल्यानंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. खबरदारी म्हणून विमानतळ प्रशासनाने संपूर्ण आणीबाणी जाहीर केली होती. तथापि, विमान धावपट्टी क्रमांक २७ वर सुरक्षितपणे उतरले. विमानात क्रूसह सुमारे ७८ प्रवासी होते. ते सर्व सुरक्षित आहेत. लँडिंगनंतर विमानतळावर सामान्य कामकाज पूर्ववत करण्यात आले. बॉम्बार्डियर DHC8-400 मध्ये एक ट्रायसायकल लँडिंग गियर सिस्टम आहे, ज्याच्या नोज गियरवर दोन चाके आहेत आणि प्रत्येक मुख्य लँडिंग गियरवर दोन मुख्य चाके आहेत.

स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, '१२ सप्टेंबर रोजी कांडलाहून मुंबईला जाणाऱ्या स्पाइसजेट Q400 विमानाचे बाहेरील चाक टेकऑफनंतर धावपट्टीवर निखळून पडले. मात्र, विमानाने मुंबईकडे प्रवास सुरू ठेवला आणि विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. लँडिंगनंतर, विमान टर्मिनलवर पोहोचले आणि सर्व प्रवासी सुखरूप उतरले.

Comments
Add Comment