Saturday, October 25, 2025
Happy Diwali

Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा; अलर्ट जारी

Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा; अलर्ट जारी

मुंबई : बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने आंध्र प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण टिकून असून अनेक भागात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील १३ मंडळात विशेषतः अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक वाढणार असून १३ सप्टेंबर रोजी मराठवाडा प्रदेशात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

१३ व १४ सप्टेंबरला कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः विदर्भ मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा जोर अधिक राहणार असून कोकण किनारपट्टी, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारपासून विदर्भात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर पावसाला पोषक वातावरण असण्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

१३ सप्टेंबर रोजी धाराशिव, लातूर, सांगली, रायगड आणि सातारा घाटमाथ्यावर पावसासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई आणि ठाणे भागातही पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. पालघर, धुळे, नंदुरबार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १४ सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी व पुणे घाटमाथ्यावर पावसासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि संपूर्ण मराठवाड्यात येलो अलर्ट जाहीर करण्यात आले आहे. विदर्भात पावसाचा कोणताही अलर्ट दिला गेलेला नाही. १५ सप्टेंबरसाठीही पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून पावसाच्या मुसळधार सरीमुळे नदीकाठच्या भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचे उपाय अवलंबण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकरी आणि सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment