Friday, September 12, 2025

मानुनी घे गोड तुझी रंगपूजा... ‘दशावतार’मधील हृदयस्पर्शी भैरवी

मानुनी घे गोड तुझी रंगपूजा...  ‘दशावतार’मधील हृदयस्पर्शी भैरवी

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील अनमोल ठेवा असलेल्या दशावतार या परंपरेला ‘दशावतार’ या सिनेमात अनोख्या पद्धतीने सादर केले आहे. ‘रंगपूजा’ ही या सिनेमातली भैरवी नुकतीच रसिकांच्या भेटीस आली असून ती पसंतीसही उतरत आहे. अजय गोगावलेचा आर्त स्वर, गुरू ठाकूरची अप्रतिम शब्दरचना आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्र याची सुमधुर चाल यामुळे भैरवीला दर्जा प्राप्त झालाय. भैरवीला मिळालेला उत्तम प्रतिसाद सुखावणारा असल्याचे मत दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी व्यक्त केले.

एका कलावंताची कलेवरील नितांत श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाची भावना गाण्यातून मांडली आहे. सिनेमातली भैरवी म्हणजे कलावंताच्या रंगभूमीवरील कलाप्रवासाला भावपूर्ण अभिवादन आहे. विशेष म्हणजे गीतकार गुरू ठाकूर, गायक अजय गोगावले आणि संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र हे त्रिकूट प्रथमच या गाण्यात एकत्र आले आहेत.

या भैरवीविषयी अजय म्हणाला, ‘दशावतार नाटकांमध्ये जितके नांदीला महत्त्व आहे तितकेच 'रंगपूजा' या भैरवीलाही आहे. भैरवी झाल्याशिवाय नाटकातला कुठलाही कलावंत आपल्या चेहऱ्यावरील रंग उतरवत नाही. म्हणूनच 'दशावतार' चित्रपटातली 'रंगपूजा' ही भैरवीसुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण आहे. गीतकार गुरू म्हणाले की, ‘कलावंताच्या आयुष्यावरचा हा सिनेमा आहे. या सिनेमाचे संवाद, गाणी दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी माझ्याकडून लिहून घेतली आणि एकेक योग जुळत गेला. गीतकाराने फक्त शब्द लिहिणे पुरेसे नसते, तर ते शब्द आणि त्यातील भावना रसिकांपर्यंत पोहोचवणारा आवाज महत्त्वाचा असतो, माझ्या गाण्यांना अजयचा आवाज लाभतो, तेव्हा मी आश्वस्त होतो. अजयने आजवर मी लिहिलेली कित्येक गाणी अजरामर केली आहेत. रेकॉर्डिंग स्टुडिओत अजय ही भैरवी गात होता तेव्हा अक्षरशः हळवे झाल्याचे गुरू यांनी सांगितले.’

Comments
Add Comment