
प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे वर्ग करण्याबाबत सर्वांचे एकमत
नवी दिल्ली : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जैन मठात ३३ वर्षांपासून असलेली माधुरी उर्फ महादेवी हत्ती परत कोल्हापूरला पाठवण्यावर सर्वोच्च न्यायालयात आज, शुक्रवारी सुनावणी झाली. मात्र, तातडीने कोल्हापूरला पाठवण्याबाबत कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही. हे प्रकरण आता एका उच्चस्तरीय समितीकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे न्यायालयात सर्व पक्षकारांनी मान्य केले आहे.
याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारच्या वकीलांनी सांगितले की, "माधुरी हत्ती कोल्हापुरातून जामनगरमधील वनतारा पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आली असून, स्थानिक नागरिकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन तिला परत कोल्हापूरला आणावे, अशी आमची भूमिका आहे." यावर न्यायालयाने हत्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे निरीक्षण नोंदवत, "आम्ही वनताराशी संवाद साधू," असे म्हटले. तसेच कोर्टाच्या निर्णयापेक्षा लोकांच्या भावना अधिक महत्त्वाच्या का?" असा थेट सवाल देखील राज्य सरकारच्या वकिलांना विचारण्यात आला.
हायपॉवर कमिटी म्हणजे नेमकं काय ? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. त्यावर राज्य सरकारने हे प्रकरण त्या समितीकडे वर्ग करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
पार्श्वभूमी :-
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माधुरी हत्तीला जामनगरमधील ‘वनतारा’ पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आले होते. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. स्थानिक नागरिक, मठाचे संत आणि अनुयायी हत्तीच्या परतीसाठी आग्रही असून, राज्यभर या प्रकरणावरून तीव्र चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, प्राणीसंवर्धन संस्था आणि कायदेमंडळ हत्तीच्या आरोग्य व कल्याणाला प्राधान्य देण्याच्या भूमिकेत आहेत.
प्रकरणाचा मागोवा:-
हत्तीचे नाव : - महादेवी उर्फ माधुरी
स्थान :- जैन मठ, नांदणी (कोल्हापूर)
विवादाचा मुद्दा :- धार्मिक भावना -विरुद्ध- प्राणी कल्याण
कोर्ट निर्णय :- तातडीचा निर्णय नाही, प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे