डलास: अमेरिकेतील डलास शहरात एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. 50 वर्षीय चंद्रमौली नागमाल्लैया यांना त्यांची पत्नी आणि मुलासमोर एका व्यक्तीने धारदार शस्त्राने ठार केले. ही घटना टेक्सास येथील एका मोटेलमध्ये घडली असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 सप्टेंबर रोजी ही घटना डाउनटाउन सूट्स मोटेलमध्ये घडली. चंद्रमौली मोटेलमध्ये काम करणाऱ्या योर्डानिस कोबोस-मार्टिनेज नावाच्या व्यक्तीसोबत एका जुन्या वॉशिंग मशीनच्या वापरावरून वाद घालत होते. यावेळी योर्डानिसने रागाच्या भरात चंद्रमौली यांच्यावर हल्ला केला.
घडलेल्या घटनेनुसार, चंद्रमौली यांनी वॉशिंग मशीन वापरू नये असे सांगितले. ही गोष्ट कोबोस-मार्टिनेजला आवडली नाही, कारण चंद्रमौली यांनी थेट त्याच्याशी न बोलता एका महिला सहकाऱ्यामार्फत संदेश दिला होता. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेला आणि योर्डानिसने आपल्याकडील धारदार शस्त्राने चंद्रमौली यांच्यावर हल्ला केला.
चंद्रमौली यांनी मोटेलच्या कार्यालयाकडे धाव घेतली, जिथे त्यांची पत्नी आणि मुलगा उपस्थित होते. त्यांनी आपल्या पतीला वाचवण्यासाठी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपीने त्यांना बाजूला ढकलून हल्ला सुरूच ठेवला. या हल्ल्यात चंद्रमौली यांचे शीर धडावेगळे झाले.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी योर्डानिस कोबोस-मार्टिनेजला अटक केली. त्याच्यावर 'कॅपिटल मर्डर'चा (Capital Murder) आरोप लावण्यात आला आहे. या क्रूर घटनेमुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायामध्ये शोक आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.