कसरतीची चौथी फेरी

उरलेसुरले वस्त्रहरण रोखण्यासाठी उबाठा गटाच्या चाललेल्या कसरतींमधला आणखी एक अंक गुरुवारी पार पडला. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर ही कसरतीची चौथी फेरी आहे, असं सांगितलं गेलं. राजकीय पक्ष एकत्र येतात. विलगही होतात. पण, त्याला जनतेच्या आस्थेचं, भल्याचं काही कारण असतं. यांच्या एकत्र येण्यात तसं काही दिसत नाही. भरपूर मार खाल्लेल्या, सगळीकडून हरून आलेल्या, थकलेल्या पैलवानांनी नंतर संयुक्तपणे खेळण्याचा विचार करण्यासारखं काहीतरी चाललं आहे. एकतर कुस्ती अशी युती करून खेळता येत नाही. त्यासाठी स्वतःतच दम, स्वतःची मेहनत असावी लागते. गंमत म्हणजे, या दोघांनीही आतापर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगत जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी रक्ताच्या नात्याच्या, अस्सलतेच्या गोष्टीही केल्या आहेत. राजकारणात लोक रक्ताचं नातं गृहीत धरतात. आपल्या स्वर्गीय नेत्याबाबत असलेल्या प्रेमापोटी त्यांना पाठिंबाही देतात. पण, जेव्हा त्यांना वारसदारांच्या राजकारणात, कार्यपद्धतीत आपल्या प्राणप्रिय नेत्याच्या खुणा औषधालाही दिसत नाहीत, तेव्हा ते त्यांच्यापासून दूर होतात. स्वर्गीय नेत्याच्या धाटणीचा नवा नेता, नवं राजकारण शोधतात. उबाठा गट आणि मनसे या दोन्हींबाबत नेमकं हेच झालं आहे. शिवसैनिकांनी त्यांना पाठिंबा दिला नाही असं नाही. भरभरून पाठिंबा दिला. आशेने त्यांच्याकडून शिवसेनाप्रमुखांच्या जाज्वल्य राजकारणाची वाटही पाहिली. पण, जेव्हा त्यांनी आपल्याच मिजाशीत शिवसैनिकांना साधी ओळख देणंही टाळायला सुरुवात केली, निष्ठावंतांच्या टिंगलटवाळ्या सुरू केल्या, तेव्हा शिवसैनिक दुखावला. तो क्रमाक्रमाने त्यांच्यापासून दूर गेला. जो भावनिक नात्याने काल-परवापर्यंत उदासीन का होईना, थांबला होता; तोही गेल्या वर्षभरात वेगाने दूर झाला. दोन्ही बंधूंच्या भाषा आणि केवळ आपल्या राजकारणाच्या संकुचित सोयी बघण्याच्या पावित्र्याने आज आहे, तोही उद्या असेल की नाही याविषयी शंकाच आहे. कार्यकर्तेच सोबत नसलेल्या, चार-दोन डोक्यांत रमलेल्यांचं राजकारण त्यांनी किती बढाया मारल्या, तरी किती आणि कसं टिकणार? हा प्रश्न आहे.


भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांचा विश्वासघात केल्यानंतर उबाठाने केवळ सत्तेसाठी काँग्रेसच्या गोटात शिरकाव केला. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर दिलेल्या लढ्याला आणि मांडलेल्या विचारांना तिलांजली दिली. मनसेने असा अधिकृत घरोबा केला नसला, तरी आपल्या राजकीय भूमिका दर निवडणुकीला आणि दोन निवडणुकांच्या मधल्या काळात बदलण्याचा रेकॉर्ड केला आहे. मनसैनिकांनाही त्याबाबत कोडंच आहे. तेही नेहमी गोंधळलेलेच असतात. बंधूंच्या एकत्र येण्याची खात्री दोन्हींकडून यावेळी कितीही दिली जात असली, तरी शेवटी काय होईल याचा ठाम अंदाज एकही मनसैनिक देऊ शकत नाही ते त्यामुळेच. आपल्या मनस्वी नेत्याच्या पावलांकडे पाहत राहायचं, ती कुठे वळतात याचा अंदाज घेणंच तेवढं त्यांच्या हाती असतं. माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर हे राज ठाकरे यांचे एकनिष्ठ एकलव्य. पण, त्यांचीही त्यामुळे माध्यमांसमोर बोलताना नेहमी गोची होते. ते कोणत्याच गोष्टीशी निश्चित हमी देऊ शकत नाहीत. 'आमचे पक्षप्रमुखच त्याबाबत निर्णय घेतील' असं सांगून ते स्वतःची सुटका करून घेत असतात. मावशीला भेटण्याचं निमित्त करून 'शिवतीर्था'वर गेलेल्या भाच्याच्या भेटीनंतर नांदगावकर यांनी माध्यमांसमोर केलेली वक्तव्यं त्यामुळेच जशी मोघम आहेत, तशीच त्यांची कसरत उघड करणारीही आहेत.' उबाठा आणि मनसे या दोन पक्षांच्या विचारसरणीत फरक आहे' असं विधान अन्यथा त्यांनी केलं नसतं. 'विचार करण्याच्या पद्धतीत फरक आहे' असं ते म्हणाले असते, तर ते ठीक होतं. पण, जे पक्ष सतत शिवसेनाप्रमुखांची विचारसरणी आणि संस्कारांबाबत बोलतात, त्यांची विचारसरणी वेगवेगळी कशी असू शकते? हा प्रश्न कायम राहतो.' या युतीसाठी उबाठाचा विशेष आग्रह असून ते युती घडवून आणण्यासाठी कोणत्याही गोष्टीला तयार होतील' असंही नांदगावकर माध्यमांसमोर बोलले आहेत. म्हणजे, खरी भीती कोणाला आहे आणि आपलं वस्त्रहरण रोखण्यासाठी दोघांपैकी कोणाची जास्त घाई आहे हे नांदगावकर यांनीच उघड केलं, हे बरं झालं. या दोघांनाही मुंबई, नाशिक, ठाणे, आणि पुणे या चार मोठ्या शहरांतच रस आहे. बाकी ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी निर्णय करावा अशी भूमिका असल्याचंही नांदगावकर यांनी सांगितलं. म्हणजे, मोक्याच्या चार मोठ्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या म्हणण्याला काही किंमत नाही! आणि त्यांच्यादृष्टीने इतर चिल्लर ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपापल्या सोयीने निर्णय करावेत नि परवानगी घ्यावी, असा याचा अर्थ. याधोरणाचा अर्थही बराच खोल आहे. त्यावर स्वतंत्रपणे लिहिता येईल!


मनसेसाठी उबाठा महाविकास आघाडीची साथ सोडणार का? हा प्रश्नही असाच खोल आहे. कारण यांच्या भेटीसाठी जशा वाढल्या, तशी काँग्रेसच्या नेत्यांनी दोन दिवसांपूर्वीच उबाठाची भेट घेतली. मनसेला सोबत घेणं काँग्रेससाठी अडचणीचंच ठरणार आहे. 'मविआची आणि आमची विचारसरणी वेगळी आहे', हेही नांदगावकर यांनी स्पष्ट केलं आहे. मविआ सोडायला उबाठाची हरकत नाही. फक्त ते समजून उमजून करावं आणि राष्ट्रवादी शप गटाला बरोबर ठेवावं, असा त्यांचा विचार आहे. तो मनसेसाठी अवघड आहे. आघाडीचा तिढा आणि मग जागावाटपाचा गुंता वाटतो तितका सोपा नाही. त्याची जाण सामान्य कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळेच अगदी मोजकेच बोलताहेत, बाकी सारे शांत आहेत. जे उत्साह दाखवताहेत, त्यांचा भ्रमनिरास अटळ आहे!!

Comments
Add Comment

बिबट्यांची दहशत

बिबट्यांच्या दहशतीने महाराष्ट्राचा अक्षरशः थरकाप उडाला आहे. ग्रामीण भागात संध्याकाळनंतर उघड्यावर वावरणं,

बिहारी वास्तव

बिहारच्या बहुचर्चित विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (शुक्रवारी) होईल आणि उद्याच निकालही जगजाहीर होतील. नव्या

दहशतवाद परतलाय...

राजधानी दिल्लीत भीषण बाॅम्बस्फोट झाला आणि तोही अशा भागात जेव्हा दिवसाच्या प्रत्येक प्रहरी हा भाग गजबजलेला असतो.

‘वंदे मातरम्’चा विवाद

वंदे मातरम् हे आपले राष्ट्रगीत होणार होते. स्वातंत्र्यपूर्वीपासून तसेच ठरले होते. पण पंडित नेहरू यांनी जे

अमेरिकेवर गंभीर संकट

अमेरिकेत ट्रम्प यांच्या बडबडीमुळे जग त्रस्त असतानाच आता खुद्द अमेरिकेत गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे आणि अर्थात

याला जबाबदार कोण?

जेवढ्या जास्त जनतेची अडवणूक करण्याची क्षमता, तेवढी जबाबदारी अधिक. पण, संघटित शक्तीला याचा बऱ्याचदा विसर पडतो.