
नवी दिल्ली : भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांनी शपथ घेतली. दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे शपथविधी सोहळा झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सी. पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाची शपथ दिली. या सोहळ्याला पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघे पण शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
भारताचे १४ वे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तब्येतीचे कारण देत जुलै २०२५ च्या सुरुवातीला राजीनामा दिला. यामुळे रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत एनडीएच्या सी. पी. राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची ४५२ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना केवळ ३०० मते मिळाली. उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी विरोधी उमेदवारावर दणदणीत विजय मिळवला. विरोधकांची मते फुटल्यामुळे एनडीएसाठी विजयाचा आनंद द्विगुणीत झाला.
Shri C.P. Radhakrishnan took oath today as the 15th Vice President of India at swearing-in ceremony held at Rashtrapati Bhavan.#vicepresidentofindia pic.twitter.com/KhZTmkNmcu
— Vice-President of India (@VPIndia) September 12, 2025
निवडणुकीत एकूण ७८१ पात्र खासदारांपैकी ७६७ जणांनी मतदान केले. यापैकी ७५२ मते वैध ठरली, तर १५ मते अवैध ठरली. विरोधी पक्षाचे सर्व ३१५ खासदार एकजुटीने मतदान करतील असा दावा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला होता. प्रत्यक्षात सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना केवळ ३०० मते मिळाली. विरोधकांची उर्वरित मते फुटली. ही मते एनडीएच्या उमेदवाराच्या पारड्यात पडली. राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाल्यामुळे त्यांच्या बाजूने विरोधी खासदारांनी क्रॉस-व्होटिंग केल्याचे निष्पन्न झाले आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीत व्हिप जारी केला जात नाही, त्यामुळे खासदार स्वतंत्रपणे मतदान करू शकतात. या निकालामुळे एनडीएच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कोण आहेत सी.पी. राधाकृष्णन ?
भारताचे १५ वे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे पूर्ण नाव चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन असे आहे. त्यांचा जन्म ४ मे १९५७ रोजी तत्कालीन मद्रास प्रांतातल्या तिरुपूरमध्ये झाला. ते उपराष्ट्रपती होण्याआधी महाराष्ट्राचे २४ वे राज्यपाल होते.
राधाकृष्णन हे आधी भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते आणि कोइम्बतूर येथून लोकसभेवर दोनदा निवडून आले होते. ते तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष देखील होते. नंतर ते पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य म्हणून कार्यरत होते. पक्षाने त्यांच्याकडे केरळ भाजपचे प्रभारी ही मोठी जबाबदारी सोपवली होती. ते २०१६ ते २०१९ पर्यंत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या अखिल भारतीय कॉयर बोर्डाचे अध्यक्ष होते . राधाकृष्णन हे १९९८ आणि १ ९९९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक जिंकले होते. ते १९९८ च्या निवडणकीत दीड लाखांपेक्षा जास्त मतांनी तर १९९९ च्या निवडणुकीत ५५ हजारांपेक्षा जास्त मतांनी जिंकले होते. भाजप आणि अण्णाद्रमुक यांच्यातील राजकीय संबंध सुधारावेत तसेच दोन्ही पक्षांत समन्वय राहावा यासाठी त्यांनी भाजपच्यावतीने काही वर्षे काम केले होते. ते दक्षिण भारतातले तसेच तामीळनाडूतले एक ज्येष्ठ आणि आदरणीय नेते म्हणून ओळखले जातात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भाजप असा त्यांचा प्रवास आहे. त्यांना १८ फेब्रुवारी २०२३ रोजी झारखंडचे दहावे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले. काही महिन्यांनी त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ते प्रभावी कामगिरी करत होते. याच काळात त्यांची एकमताने एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवड झाली.