नव्या दोस्तीची अमेरिकेला धास्ती

प्रा. जयसिंग यादव


डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ नीतीमुळे चीन, भारत, रशिया अमेरिकेची व्यूहनीती झुगारून एकत्र आले. अमेरिकन तज्ज्ञांकडून तसेच परराष्ट्र व्यवहारातील जाणकारांकडून त्याबाबत ट्रम्प यांना इशारे दिले जात होते. शांघाय सहकार्य परिषदेनंतर त्याची जाणीव व्हायला लागल्यामुळे ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. हे तीन देश एकत्र येण्याची अमेरिकेला धास्ती का आहे, याचा हा लेखाजोखा.


चीनने गेल्या आठवड्यात आपल्या शक्तीचं प्रदर्शन केले. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीला ८० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित लष्करी परेडमध्ये हे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. हजारो किलोमीटर अंतरावर वॉशिंग्टन डीसीमध्ये उपस्थित असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील यावर लक्ष ठेवून होते. ते म्हणाले, की मी ते पाहावे अशी त्यांची इच्छा होती आणि मी ते खरोखर पाहत होतो. तियानमेन चौकात झालेल्या या भव्य समारंभाबद्दल अमेरिकन अध्यक्षांनी तपशीलवार काहीही सांगितले नाही; परंतु त्यांनी ‘खूप, खूप प्रभावी’ असे वर्णन केले. दुसरीकडे, ट्रम्प आणि उर्वरित जगासाठी चीनचा संदेश अगदी स्पष्ट होता. तो संदेश असा होता की, जगात एक नवीन शक्ती केंद्र तयार होत आहे. ते शंभर वर्षे जुन्या अमेरिकन वर्चस्व व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी सज्ज आहे. ही लष्करी परेड आयोजित केली जात होती, त्या दिवशी ट्रम्प ओव्हल ऑफिसमध्ये पोलंडच्या राष्ट्राध्यक्ष कॅरोल नवरात्स्की यांना भेटत होते. त्या वेळी ते चीनच्या या लष्करी परेडबद्दल जास्त काही बोलले नाही. चीनसोबतच्या ‘टॅरिफ वॉर’ दरम्यान घडलेल्या घटनांबद्दल ट्रम्प यांच्या विधानांमध्ये उदासीनता, तक्रार आणि चिंता यांचे मिश्रण स्पष्टपणे दिसून येत होते. परेडबद्दल ट्रम्प निष्काळजी दिसले. त्यांनी सांगितले, की दोन डझनहून अधिक राष्ट्रप्रमुखांसमोर चीन करत असलेल्या शक्तिप्रदर्शनाची चिंता नाही. तथापि, चीन दुसऱ्या महायुद्धातील योगदानाचे श्रेय अमेरिकेला देत नाही, याबद्दल त्यांनी तक्रार केली. तुम्ही अमेरिकेविरुद्ध कट रचत असताना कृपया पुतीन आणि किम जोंग उन यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा कळवा, असे ते उपहासाने म्हणाले. एकंदरीत, इतर राष्ट्रांचे एकत्र येणे ट्रम्प यांना अस्वस्थ करत आहे.


ट्रम्प यांना परेड आणि लष्करी शक्तीच्या प्रात्यक्षिकांबद्दल विशेष प्रेम आहे. गेल्या महिन्यात त्यांनी अलास्कामध्ये पुतीन यांचे लाल कार्पेटवर स्वागत केले. त्यांच्या डोक्यावरून स्टेल्थ बॉम्बर आणि अमेरिकन जेट उडत होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी अमेरिकन सैन्याच्या २५०व्या वर्धापन दिनानिमित्त वॉशिंग्टनमध्ये लष्करी परेडचे आयोजन केले होते. चीनची नवीनतम लष्करी परेड उच्च तंत्रज्ञानाची शस्त्रे आणि शिस्तबद्ध मार्चिंगसाठी ओळखली गेली. त्या तुलनेत अमेरिकेच्या लष्करी इतिहासाची आठवण करून देणारी अमेरिकन परेड ही एक सामान्य घटना होती. तिथे दुसऱ्या महायुद्धात वापरले जाणारे टँक आणि क्रांतिकारी काळातील सैनिक व्हाईट हाऊसजवळील कॉन्स्टिट्यूशन अव्हेन्यूवर आरामात फिरताना दिसले. ट्रम्प यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या घोषणेवर आधारित ही एक प्रकारची आठवणींना उजाळा देणारी घटना होती. अमेरिकेच्या गौरवशाली इतिहासाकडे मागे वळून पाहताना आणि या कार्यक्रमाद्वारे ट्रम्प १९व्या शतकातील त्या काळाची आठवण करताना दिसले. त्याला ते ‘अमेरिकन इतिहासातील सर्वात महान युग’ म्हणतात.चीनच्या लष्करी परेडमध्ये त्याची भविष्यातील शस्त्रे प्रदर्शित करण्यात आली आणि तेथील कम्युनिस्ट सरकारने हेदेखील दाखवण्याचा प्रयत्न केला की दुसऱ्या महायुद्धात फॅसिझम आणि साम्राज्यवादाला पराभूत करण्यात चीनने मोठी भूमिका बजावली. त्या युद्धाने तथाकथित ‘अमेरिकन शतका’ची सुरुवात केली असेल, तर चीन आता नवी जागतिक व्यवस्था निर्माण करण्यात यशस्वी होईल, असा त्यांचा दावा आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांचे सहाय्यक असलेले रिचर्ड विल्की म्हणाले की दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवात चिनी राष्ट्रवादी आणि अमेरिकन सैन्याचे योगदान चिनी कम्युनिस्ट सैन्याच्या योगदानापेक्षा जास्त होते. तथापि, या आठवड्यात चीनची लष्करी परेड हे अमेरिकेला चिंता करण्याचे एकमेव कारण नव्हते. याशिवाय अमेरिकन धोरणकर्त्यांना चिंता वाटावी, अशी आणखी बरीच कारणे होती. तियानजिनमधील शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दरम्यान, चीन आणि भारतातील संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचे एक मोठे कारण म्हणजे ट्रम्प यांनी भारतावर लादलेले शुल्क. त्याचा भारत आणि अमेरिकेतील मैत्रीवर विपरीत परिणाम झाला आहे. ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणामुळे जगाचे आर्थिक आणि राजकीय ध्रुवीकरण बिघडले आहे. प्रतिस्पर्धी मानले जाणारे चीन, रशिया आणि भारत हे देश बदललेल्या परिस्थितीत एकत्र कसे येऊ शकतात याचे एक उत्तम उदाहरण आहे.


ट्रम्प यांनी अमेरिकन उद्योगाचे संरक्षण करण्यासाठी आणि सरकारसाठी नवीन महसूल उभारण्यासाठीच्या योजनेचा एक भाग म्हणून शुल्कांचे समर्थन केले आहे. ट्रम्प समर्थित ‘अमेरिका फर्स्ट फॉरेन पॉलिसी इन्स्टिट्यूट’मधील अमेरिकन सिक्युरिटीचे सह-अध्यक्ष रिचर्ड विल्की म्हणतात, कोरियन, जपानी, फिलिपिन्स आणि व्हिएतनामी लोकांना हे चांगलेच ठाऊक आहे की खरा धोका त्यांच्या अमेरिकेसोबतच्या व्यापार भागीदारीतील किरकोळ अडथळे नसून चीनच्या वाढत्या लष्करी सामर्थ्याचा आहे. ट्रम्प अनेकदा इतर देशांमधील संघर्ष आणि चिंतांबद्दल उदासीन राहिले आहेत. त्याबाबत मदत करत नाही. त्याऐवजी ते ग्रीनलँड, पनामा आणि कॅनडासारख्या भौगोलिकदृष्ट्या अमेरिकेच्या जवळ असलेल्या देशांमधील समस्यांबद्दल उत्सुकता दाखवत आहेत. विजय दिनाच्या परेडमध्ये चीनने जगाला आपले लष्करी सामर्थ्य दाखवले. त्यातून लक्षात आले की, ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांमुळे अमेरिकेचा विजय होण्याऐवजी अपयश येण्याचा धोका आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या अमेरिका केंद्रित व्यापार व्यवस्थेचा भाग म्हणून लादलेले शुल्क अमेरिकन न्यायालये रद्द करू शकतात. नव्हे, तशी चिन्हे वाढत आहेत. गेल्या आठवड्यात एका अपील न्यायालयाने निर्णय दिला, की ट्रम्प यांचे बरेच शुल्क संघीय कायद्याच्या चुकीचा अर्थ लावण्यावर आधारित होते; पण ट्रम्प यांनी या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात ट्रम्प यांचे समर्थक मानले जाणारे रूढीवादी न्यायाधीशांचे वर्चस्व असले, तरी काँग्रेसच्या परवानगीशिवाय प्रमुख धोरणे अमलात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रपतींविरुद्ध त्यांनी खूप कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या शुल्कांवर ते सौम्य भूमिका घेतील, अशी शक्यता कमी आहे. व्यापाराच्या बाबतीत ट्रम्प नेहमीच त्यांच्या मनाचे ऐकत आले आहेत. त्यांनी अनेक पारंपरिक धोरणे बदलली असून नवीन व्यापारी भागीदार बनवले आहे. ट्रम्प यांनी दावा केला आहे, की त्यांचे व्यापार धोरण अमेरिकेला ‘दुसऱ्या सुवर्णयुगाकडे’ घेऊन जाईल; पण तियानमेन चौकातील चिनी लष्करी परेड असो किंवा अमेरिकन न्यायालये; ट्रम्प यांच्या शुल्कामुळे निर्माण झालेला धोका काल्पनिक नाही, तर वास्तविक आहे. भारताच्या वृत्तीबद्दल ट्रम्प यांची चिडचिड वाढत असल्याचे दिसून आले. एकीकडे भारत अमेरिकेच्या दबावापुढे झुकला नाही, तर दुसरीकडे अमेरिका आपल्या देशातच अनेक समस्यांनी वेढली गेली आहे. असे असूनही, ट्रम्प यांची हेकेखोरी कायम होती; परंतु आता त्यांना वास्तवाची जाणीव झाली असावी. त्यामुळे अगोदर त्यांनी चीनमुळे भारत, रशियासारखे मित्र आम्ही गमावले, असे म्हटले होते. त्यानंतर दोनच दिवसांमध्ये त्यांनी भारताचे आणि मोदी यांचे कौतुक केले. भारत आणि अमेरिका यांच्यात एक विशेष संबंध आहे. इतकेच नाही, तर त्यांनी आपण नेहमीच मोदी यांचे मित्र राहू असे म्हटले. ते एक महान पंतप्रधान आहेत, अशीही पुस्ती जोडली. ट्रम्प यांचे बदललेले सूर पाहता भारताच्या दबावाच्या परराष्ट्रनीतीचा परिणाम झालेला दिसतो.

Comments
Add Comment

निकोबार द्वीप समूहाचा व्यूहात्मक विकास

केंद्र सरकारने अंदमान निकोबार बेट समूहाचा विकास करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. या बेटाचे भौगोलिक स्थान लक्षात

बालेकिल्लाही भाजप विचारांचा होतोय

तरुण मतदारांच्या अपेक्षा रोजगार, शिक्षण व उद्योजकतेशी निगडित आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी अजूनही पारंपरिक

विद्युत वाहनांस प्रोत्साहन

मुंबईतील सूक्ष्मकण प्रदूषण (पीएम २.५ आणि पीएम १०) हा वायू प्रदूषणाचा मुख्य घटक आहे, जो सार्वजनिक आरोग्यासाठी

विद्यार्थ्यांची प्रगती कशी होणार?

विद्यार्थ्यांची प्रगती होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेऊन अध्यापकांनी योग्य मार्गदर्शन करणे

चौकटीपलीकडचा शिक्षकी पेशा...

आधुनिक युगात शिक्षकांची भूमिका अधिक आव्हानात्मक झाली आहे. सध्याच्या तंत्रबदलत्या युगात शिक्षणाच्या कल्पना

भविष्याचे सांगता येत नाही...!

काही दिवसांपूर्वी मुंबई नगरीचे एक वेगळेच रूप बघायला मिळाले. गेल्या आठवड्यात गाजला तो मराठा आरक्षणाचा भगवा