Saturday, October 25, 2025
Happy Diwali

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता करून देण्याच्या उद्देशाने शासनाने ‘मिशन वात्सल्य योजना’ यशस्वीपणे राबविली. या योजनेची व्याप्ती वाढवून राज्यातील सर्व विधवा, एकल, परित्यक्त्या महिलांना 'शासन आपल्या दारी' या संकल्पनेनुसार या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

कोविड काळात सुरू केलेल्या ‘मिशन वात्सल्य योजने’ची अंमलबजावणी करण्यासाठी तालुका स्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. अनाथ मुले, विधवा व एकल महिलांना त्यांना लागू होणाऱ्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला.

या योजनेअंतर्गत दोन्ही पालकांचे निधन झालेल्या अनाथ मुलांना शासकीय मदत, मृत्यू दाखला, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, विधवा पेन्शन, रेशनकार्ड, निवारा व इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ, अत्यावश्यक कागदपत्रे शिबिरांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहितीही महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी दिली.

आता याच योजनेत सर्व विधवा महिलांचा समोवश करण्यात आला असून, जिल्हास्तरावर विविध शिबीरे व मेळावे आयोजित करून समितीच्या माध्यमातून महिलांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. राज्यातील सर्व एकल महिलांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment