सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट टेस्टिंग लॅब ही ऊर्जा मीटर्स ट्रान्सफार्मसी ऑइल इन्सुलेशन प्रयोग शाळा, केबल, एनर्जी मीटर यांसारख्या इलेक्ट्रिकल उपकरणांच्या चाचण्या आणि प्रमाणासाठी उभारण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकला इलेक्ट्रिक हब म्हणून ओळखणार आहे. नाशिकमध्ये ८०० हून अधिक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांना याचा मोठा फायदा मिळणार आहे.
नाशिकमधील शिलापूर येथे १०० एकर जागेवर सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या भारतातील तिसऱ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या सीपीआरआय (सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट) टेस्टिंग लॅबचे केंद्रीय ऊर्जामंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. लॅबचा महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थानमधील इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांना फायदा होणार आहे, तर नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार असून, इलेक्ट्रिकल हब म्हणून चालना मिळणार आहे. देशातील तिसरी प्रयोगशाळा असून, तीन राज्यातील शेकडो उद्योजकांना लाभ मिळेल. यापूर्वी ग्राफाईट इंडिया लिमिटेड, व्हर्चु ओसो ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, एपिरॉक एबी, महिंद्रा अँड महिंद्रा या चार कंपन्या सुमारे १५ हजार ९११ कोटींची नाशिकमध्ये गुंतवणूक करणार आहेत. त्यामुळे दोन दशकानंतर नाशिक आता इंडस्ट्रियल डेस्टिनेशनकडे वाटचाल करत आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक संघटना असलेल्या नाशिक इंडस्ट्रिज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमा या औद्योगिक संघटनेच्यावतीने २०१३ साली पहिले इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स या औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यात निमा पदाधिकाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधत नाशिकला आवश्यक असलेली विद्युत उपकरण चाचणी प्रयोगशाळा आणि क्लस्टरची मागणी केली होती. महाराष्ट्र शासनाने या मागणीची दखल घेतली होती. शिलापूर येथील सुमारे १०० एकर शासकीय जागा देण्याबरोबरच पहिल्या टप्प्यासाठी १०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा सीपीआरआय नागपूरचे प्रमुख राजेश रंजन यांनी केली होती. २०१९ साली प्रत्यक्षात या कामाचे भूमिपूजन झाले होते. २०२० मध्ये ही लॅब कार्यान्वित होईल अशी अपेक्षा होती; परंतु प्रत्यक्षात सुरू होण्याकरिता २०२५ ची वाट बघावी लागली .
आता लॅबची उभारणी पूर्ण झाली असून, विविध यंत्रसामग्री, तपासणी उत्पादने यांचे इंस्टॉ लेशन, चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. विविध तपासणीसाठी स्वतंत्र इमारती आहेत. तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांच्या काळात तत्त्वतः मान्यता मिळाली होती. त्यानंतर भू-संपादनासह लॅबच्या उभारणीसाठी माजी खासदार हेमंत गोडसे यांनीही भक्कम पाठपुरावा केला होता. इलेक्ट्रिक उत्पादनाच्या तपासण्या संशोधन आणि प्रमाणनाकरिता पश्चिम भारतातील उद्योगांना त्यांचे उत्पादने बंंगळूरु किंवा भोपाळला पाठवण्याची गरज नाही. ही उत्पादने पाठविण्यासाठी वाहतुकीचा मोठा खर्च जर लागतो, शिवाय दीर्घकाळ प्रतीक्षाही करावी लागत होती. तपासणीसाठी लागणारा तीन ते सहा महिन्यांचा मोठा वेळ वाहतुकीचा खर्च यांचा भार उद्योगांना सहन करावा लागत होता; परंतु ही लॅब सुरू झाल्यामुळे हे सर्व खर्चाची बचत होणार आहे. पहिल्या टप्प्यात दहा एमव्हीएमपर्यंतचे परीक्षण होणार असून, स्मार्ट ऊर्जा मीटर परीक्षण, ८० केव्ही उच्च व्होल्टेज परीक्षण सुविधा ट्रान्सफॉर्मर इन्सुलटिंग ऑइल इंजी मीटर आणि तपासण्या होतील. १०० एकरवरील या लॅबच्या प्रकल्पात सुमारे २ हजार रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. नाशिक जिल्ह्यात लवकरच चार उद्योग सुरू होणार असून, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे. हे चारही उद्योग पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर याचा फायदा आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर शहरातील इतर व्यवसायांमध्येही मोठ्या प्रामाणावर रोजगार निर्मिती होईल, असे या क्षेत्रातील अभ्यासक सांगत आहेत. ग्राफाहीट इंडिया लिमिटेड ही कंपनी इगतपुरी तालुक्यातील मंढेगाव येथे सुरू करण्यात येणार असून, येथे सिंथेटीक ग्राफाहीट अॅनोड मटेरियलचे उत्पादन करणार आहे. नाशिकच्या या प्रकल्पात ही कंपनी ४ हजार ७६१ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर एक हजार १६६ लोकांना रोजगार मिळणार आहे. व्हर्चुओसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडही कंपनी ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात सुरू होणाऱ्या या प्रकल्पातून इलेक्ट्रॉनिक्स आणि मोटारीचे सुटे भाग तयार केले जाणार आहेत. त्यातून ५०० जणांच्या हाताला काम मिळणार आहे. एपिरॉक एबी कंपनी ही खाणकाम आणि पायाभूत सुविधा उपकरणांची स्वीडिश उत्पादक कंपनी आहे. तिचे मुख्यालय स्टॉकहोम, स्वीडन येथे असून, गोंदे दुमाला येथे ४२ एकर जागेवर प्रकल्प सुरू करणार आहे. त्यासाठी ३५० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. येथे खाण आणि बांधकाम उपकरणे तयार केली जाणार असून, २०० जणांना रोजगार मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यात प्रकल्प सुरू करणाऱ्या कंपन्यांपैकी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी सर्वात मोठी गुंतवणूक करणार आहे. या कंपनीचा प्रकल्प इगतपुरीजवळ प्रस्तावित असून, येथे इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन केले जाणार आहे. त्यासाठी १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. तसेच ५ हजार जणांना रोजगार मिळणार आहे. आगामी काळात नाशिक इंडस्ट्रियल डेस्टिनेशन होईल असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करू या!
- धनंजय बोडके