
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय व्यापार, प्रामुख्याने तेलाशी संबंधित व्यापार अमेरिकन डॉलरमध्ये होत होता. पण भारताने मित्र देशांशी स्थानिक चलनात व्यापार करण्याचे करार केले आहेत. या करारांमुळे भारत आणि भागीदार देश आपापसांत चलनाचा विनिमय दर ठरवून त्याआधारे व्यापार करतात. डॉलरचा विचार केला जात नाही तसेच डॉलरचा वापर कटाक्षाने टाळला जातो. यामुळे दोन्ही देशांना व्यापारातून फायदा होतो. भारताने गुरुवारी ११ सप्टेंबर रोजी मॉरिशससोबत स्थानिक चलनात व्यापार करण्याचा करार केला. या करारामुळे भारत आणि मॉरिशस यांच्यातील व्यापारावरील अमेरिकन डॉलरचे वर्चस्व संपणार आहे.
भारत आणि मॉरिशसच्या नेत्यांनी द्विपक्षीय बैठकीत अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. महत्त्वाच्या विषयांवर सहकार्यासाठी करार झाले. अनेक कागदपत्रांची देवाणघेवाण झाली. पंतप्रधान मोदी म्हणाले, 'आम्ही चागोस मरीन प्रोटेक्टेड एरिया, एसएसआर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा एटीसी टॉवर आणि महामार्ग आणि रिंग रोडचा विस्तार या प्रकल्पांवर वेगाने काम करू. हे पॅकेज केवळ मदत नाही तर आमच्या सामायिक भविष्यातील गुंतवणूक आहे. गेल्या वर्षी मॉरिशसमध्ये यूपीआय आणि रुपे कार्ड लाँच करण्यात आले होते. आता आम्ही स्थानिक चलनात व्यापार सक्षम करण्यासाठी काम करू.' भारत आणि मॉरिशस हे केवळ भागीदार नाहीत तर कुटुंब आहेत. मॉरिशस हा भारताच्या 'नेबरहूड फर्स्ट' धोरणाचा आणि 'व्हिजन ओशन'चा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे; असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारताने देशाबाहेरील पहिले जनऔषधी केंद्र मॉरिशसमध्ये स्थापन केले. लवकरच मॉरिशसमध्ये भारत आयुष सेंटर ऑफ एक्सलन्स हे ५०० खाटांचे सर सीवूसागुर रामगुलाम राष्ट्रीय रुग्णालय (एसएसआरएन) आणि पशुवैद्यकीय शाळा आणि प्राणी रुग्णालय या प्रकल्पात सहभागी होणार आहे. मॉरिशसच्या पायाभूत आणि आरोग्य सुविधा मजबूत करण्यासाठी भारत महत्त्वाचे योगदान देत आहे.