
वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न
भाईंदर (वार्ताहर) : दहिसर चेक नाक्यावरील टोल नाक्यामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लहान वाहनांना टोल माफीसह अनेक उपाय योजना करूनही वाहतूक कोंडीत फरक पडला नाही त्यामुळे इंधनाचा अपव्यय, वाहनांच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची होणारी हानी यावर आता दहिसर टोल नाका तेथून २ किलोमीटर पुढे स्थलांतरित करण्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची तसेच सदर प्रस्तावाला केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून मंजूरी मिळाल्यानंतर स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
टोल नाक्यामुळे रोज दिवसभर तर सकाळ संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. लहान वाहनांना टोल माफीसह अनेक उपाय योजना केल्या परंतु काहीच फरक पडला नाही. त्यामुळे सदर टोल नाका दोन किलोमीटर पुढे नेण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती. बैठकीत दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सुहास चिटणीस, मीरा-भाईंदर, वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक, टोल ठेकेदार विरेंद्र म्हैसकर इतर अधिकारी उपस्थित होते त्यात टोल नाका वर्सोवा पुलासमोरील नर्सरीजवळ स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर प्रस्तावाला केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून मंजूरी मिळाल्यानंतर टोलनाका स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे.